संवेदनशील आठवणींची 'पंढरीची वारी'

राजरंग-राज चिंचणकर


पंढरीच्या रायाशी संबंधित अनेक कलाकृती विविध माध्यमांतून आतापर्यंत सादर झाल्या आहेत. रूपेरी पडद्यावरही विठ्ठलभक्तीचा महिमा काही चित्रपटांतून मांडला गेला आहे. याच मांदियाळीत, काही वर्षांपूर्वी रूपेरी पडद्यावर एक चित्रपट आला होता आणि तो म्हणजे 'पंढरीची वारी'! या चित्रपटाचे निर्माते होते अण्णासाहेब घाटगे. हा चित्रपट पडद्यावर यशस्वी झाला खरा; परंतु या चित्रपटाच्या निर्मितीमागे एक मोठी आणि संवेदनशील कथा दडलेली आहे. सर्वच कलाकृतींचा मार्ग काही सहजसाध्य नसतो; त्याप्रमाणे या चित्रपटाने विविध प्रसंगांना सामोरे जात, परिपूर्णतेकडे वाटचाल केली आणि त्यायोगे एक वेगळे उदाहरण मराठी चित्रपटसृष्टीत कायम झाले आहे.सन १९८४ च्या जून महिन्यात, आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होण्याच्या दिवशी या चित्रपटाचा मुहूर्त आळंदी येथे करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते रमाकांत कवठेकर आणि यात भूमिका करण्यासाठी रंजना, अशोक सराफ, अरुण सरनाईक, राजा गोसावी, राघवेंद्र कडकोळ, गोविंद कुलकर्णी, नंदिनी जोग, सुरेश विचारे आणि छोटा विठ्ठल म्हणून बकुल कवठेकर अशी कलाकारांची टीम ठरली होती. सोबत होते, आषाढी वारीसाठी आलेले असंख्य वारकरी...! या वारीमध्येच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ झाला. चित्रपटातील सर्व प्रमुख कलाकार पालखीसोबत वारीत सामील होतात, असा मुहूर्ताचा शॉट होता. दिग्दर्शकाकडून कॅमेरा, रोलिंग, ॲक्शन अशा सूचना मिळाल्या खऱ्या; पण काहीवेळातच त्यांच्याकडून 'कट' अशी सूचना आली. त्याचे कारणही तसेच होते.


ही सगळी घटना ज्यांनी प्रत्यक्षात अनुभवली; ते अण्णासाहेब घाटगे यांचे पुत्र, रंगकर्मी निशांत घाटगे याविषयी बोलताना म्हणतात, "त्यावेळी तिथे सर्व कलाकारांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. संपूर्ण यूनिट, माझे आई-बाबा, माझा भाऊ आणि मी सुद्धा रडत होतो. कारण घटनाच अत्यंत दुर्दैवी घडली होती. आमच्या सिनेमाचा नायक, मुहूर्ताच्या पहिल्याच दिवशी शूटिंगला येताना एका अपघातात हे जग सोडून गेला आणि जाताना सोबत पत्नी व मुलाला घेऊन गेला होता. हा नायक म्हणजे अभिनयाचा बादशहा अरुण सरनाईक...!या चित्रपटासाठी आळंदी ते पंढरपूर ही संपूर्ण वारी शूट करण्याचे ठरले होते आणि २५ दिवसांचे शेड्यूल होते. मुहूर्ताचा दिवस उजाडला. सगळी तयारी झाली होती. आम्ही अरुण सरनाईक यांची वाट पहात होतो. तेवढ्यात, ज्या हॉटेलमध्ये आम्ही होतो; तिथे काऊंटरला माझ्या बाबांसाठी कॉल आला. बाबांनी फोनवर काहीतरी ऐकले आणि त्यांच्या हातून रिसिव्हर खाली पडला. त्यांच्या अंगाला दरदरून घाम सुटला होता. मी जोरात ओरडत हॉलमध्ये गेलो. सगळे धावत माझ्या बाबांजवळ आले; तेव्हा त्यांनी सांगितले की अरुणजी गेले. हे ऐकून सगळेच सुन्न झाले. शूटिंग रद्द करता येत नव्हते. कारण ही जर वारी गेली; तर पुन्हा एक वर्ष थांबावे लागणार होते आणि ते शक्य नव्हते. त्यावेळी आमचे नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार म्हणाले, 'शो मस्ट गो ऑन. आज आपण मुहूर्त करू, तीच अरुणजींना खरी श्रद्धांजली असेल'.


पण आता अरुणजींची भूमिका करणार कोण, असा प्रश्न होता. ज्येष्ठ अभिनेते राजा गोसावी यांनी एक नाव सुचवले, पण त्या अभिनेत्याचे आणि रंजना यांचे पटत नव्हते. तरी रंजना यांनी तयारी दाखवली. आम्ही त्यांना विचारले, पण ते 'नाही' म्हणाले. मग ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांनी, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे यांचे नाव सुचवले. गरज पाहून ते पटकन तयारही झाले. त्या दिवशी आमच्या 'पंढरीची वारी' या चित्रपटाचा मुहूर्त झाला आणि चित्रीकरण सुरू झाले. पण त्या दिवशी हतबल झालेले माझे बाबा अजून माझ्या नजरेच्या समोरून जात नाहीत. निर्माता म्हणून त्यांची झालेली घालमेल मी विसरू शकत नाही. आळंदी ते पंढरपूर संपूर्ण वारी शूट झाली. सत्तर टक्के फिल्म तयार झाली. पण, पुढे हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्यात रंजना आणि श्रीकांत मोघे सुद्धा नव्हते. असे का...?कारण १० दिवसांचे शेड्यूल बाकी असताना एका शूटिंगच्या दरम्यान अभिनेत्री रंजना यांना अपघात झाला. त्या अपघाताने त्या स्वतः आणि त्यांच्यासोबत आम्हीही उद्ध्वस्त झालो. माझे बाबा त्यांच्यासाठी तीन वर्षे थांबले. पण त्या काही बऱ्या झाल्या नाहीत. माझ्या बाबांनी हा चित्रपट खूप जिद्दीने पुन्हा सत्तर टक्के 'री-शूट' केला. रंजना यांच्या ऐवजी जयश्री गडकर यांना घेऊन आणि श्रीकांत मोघे यांच्या ऐवजी बाळ धुरी यांना घेऊन...! त्यामुळे ज्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा असतो; त्या दिवशी मी अरुण सरनाईक यांना, त्यांच्या पत्नीला आणि मुलाला श्रद्धांजली वाहतो. कारण त्यांची वारी अर्धवट राहिली...!"या संवेदनशील आठवणींच्या पानांवरून वर्तमानकाळात येताना निशांत घाटगे पुढे सांगतात, "खरे तर पंढरीची वारी २१ दिवसांची असते. पण माझ्या बाबांची पंढरीची वारी पूर्ण व्हायला ४ वर्षे लागली. त्यावेळी मी लहान होतो, पण या चित्रपटाच्या निर्मितीचे दिवस आठवले की अंगावर काटा येतो. या क्षेत्रातल्या दिग्गजांना माझे एकच सांगणे आहे की ज्या काही चित्रपट माध्यमाच्या इन्स्टिट्यूट आहेत, तिथे या चित्रपटाच्या संपूर्ण निर्मिती प्रक्रियेचा अभ्यासक्रम ठेवावा. या क्षेत्रात येणाऱ्या नवीन पिढीला हा प्रवास समजणे आवश्यक वाटते".

Comments
Add Comment

आषाढीच्या महिन्यात पंढरपूर अप्रतिम

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल  सावळ्याची जणू सावली’ या झी मराठी चॅनेलच्या मालिकेतील सावलीची भूमिका साकारून

शेंगा, रानभाजी आणि बरंच काही...!

भालचंद्र कुबल-पाचवा वेद  काही वर्षांपूर्वी गजेंद्र अहिरेंचं शेवग्याच्या शेंगा नावाचं, संजय मोने आणि स्वाती

‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामुळे वेगळीच अनुभूती

  टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल    मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामध्ये अश्वत्थामाचा ज्वलंत जीवनपट

एका रंगकर्मीची 'विठ्ठल वारी'...

राजरंग-राज चिंचणकर   पंढरीच्या वारीत असंख्य वारकरी सामील होत आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी लीन होतात. या

उजळमाथ्याने फिरणाऱ्या प्रत्येक गॉसिपकारास...!

भालचंद्र कुबल-पाचवा वेद   नाटक उजळवणाऱ्या प्रत्येक प्रकाशयोजनाकारास मी नेहमी पहिलं वाक्य ऐकवतो, "रिस्पेक्ट

भारतातील पहिले एआय-आधारित तिकीट बुकिंग व्यासपीठ ‘थम्पएन’ सुरू

देशातील लाइव्ह मनोरंजन क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित पहिले डिस्कव्हरी आणि तिकीट बुकिंग