भालचंद्र कुबल-पाचवा वेद
नाटक उजळवणाऱ्या प्रत्येक प्रकाशयोजनाकारास मी नेहमी पहिलं वाक्य ऐकवतो, "रिस्पेक्ट टू डार्कनेस". जर तुम्हाला काळोख कळला नाही तर प्रकाशाची एकही शेड कळू शकत नाही, कारण प्रत्येक शेडमध्ये काळोख असतो. त्याची इंटेन्सिटी म्हणजे भाव आणि स्थैर्य किंवा ठहराव म्हणजे रस. भाव आणि रस यांना बांधतो तो विचार. म्हणूनच जर विचार व्यक्त व्हावा असं वाटत असेल तर त्यातील भावाची इंटेन्सिटी प्रथम आजमावावी. पण मग आपण विचार जर वाट्टेल तसा फेकू लागलो तर त्यास मुळात आधी विचार म्हणावा का ? समाज माध्यमे व्यक्तिसापेक्ष झाली, समाज माध्यमांनी व्यक्तींमधल्या प्रकृतींचा ताबा घेतला आणि विचारांची आदळआपट, फेकाफेक सुरु झाली. तिथेच प्रकृती विकृतीच्या नादी लागली. एखादे नाटक, त्या नाटकातील पात्रांचे भाव आणि मग त्यातून निर्माण होणारे विचार हे मूलतः लेखकाने संशोधित करावेत आणि नंतरच प्रसूत करावेत. म्हणजे लेखनावर केवढी मोठी जबाबदारी असते, याचा विचार न करता स्टेटमेंट्स करणे म्हणजे लेखन, मग ते समाज माध्यमावरील थुकरट पोस्ट्सद्वारा केलेले असो वा स्वातंत्र्य उपभोगत केलेले कायमस्वरुपी लिखाण. असा समज पसरलाय त्याचं काय करायचं? त्यातही ते लिखाण जर चुरचुरीत असेल तर मग त्या विधानाचा प्रसार मराठीच्या कानाकोपऱ्यात झाल्याने धन्यता पावणारी लेखक जमात विचारांच्या डार्कनेसने जन्माला आलेली मी पहातोय. एवढं वाचल्यावरही मला नेमकं काय म्हणायचंय, हे वाचकांच्या लक्षात नक्कीच आलेले नसणार..! तर समाज माध्यमांवर नाटकाच्या अानुषंगाने लिहिणाऱ्यांचा सुळसुळाट झाल्याने त्या विधानांचा थोडा समाचार घ्यावा म्हणतो. हल्लीच एका रंगकर्मीनी "सुमार नाटकाचा बेसुमार भरणा सद्यस्थितीत मराठी नाटकांच्या जीवावर" उठल्याची खंत व्यक्त केली आहे. अर्थात ही जी काही काळजीवजा खंत व्यक्त केलीय ती एका पाॅडकास्टमधून. काहीही असो. ते ही एक समाजमाध्यमच आहे.
तर मग प्रत्येक जण (रंगकर्मी) प्रत्येक नाटकाकडे ‘सुमार’ म्हणून पाहू लागला. आता अशी नाटकं बेसुमार म्हटल्यावर, तुम्ही सुमार की दर्जेदार या वादाला तोंड फुटलं. आता एखादे नाटक दर्जेदार आहे की नाही? हे ठरवायचं कुणी? तर रंगभूमीला विनाशापासून रोखणारे, सोशल वाॅचमन, विधानावर आपली मतं मागू लागले. मग कमेंटीवर कमेंटी भरभरुन वाहू लागल्या. थोड्या वेळाने लक्षात आले की अरे ह्या विधानकर्त्यांचा आणि मराठी व्यावसायिक नाटकांचा सुतराम संबंध नाही. पुण्यातून वर्षाकाठी दोन-तीन प्रायोगिक सदृष नाटकांचे ठेकेदार आता वैश्विक भाष्य करु लागलेत? मग आमच्या सारख्या अल्पमती- अल्पशिक्षितांनी स्वतःचीच समजूत काढून घेतली की, त्यांना कदाचित सुमार प्रायोगिक नाटकांबद्दल बोलायचे असावे. पण मग अशी कितीशी नाटके २०२५-२६ मध्ये प्रदर्शित झाली? तर त्यांची अखिल महाराष्ट्रातील अंदाजे संख्या होती ३३ (तेहतीस). नाटका-नाटकांमधे प्रायोगिकता शोधायची म्हटल्यास ती कुठल्या निकषांवर शोधावी? मराठी रंगभूमीवरील सामाजिक-राजकीय वक्रता (Social & Political Satire) हा प्रकार मराठी नाटकांच्या इतिहासातील सर्वात प्रभावी व प्रभावशाली प्रवाहांपैकी एक आहे. या प्रकारातील नाटके सत्ता, भ्रष्टाचार, वर्गसंघर्ष, जातिभेद, लिंगभेद, राजकीय संधिस्थिती यांवर तीव्र भाष्य करतात. पण मग त्यातून प्रायोगिकता कशी अधोरेखित करायची? आता त्यातून सुमार दर्जा ठरवणार कोण?
कुठले नाटक दर्जेदार आणि कुठले सुमार, हे प्रेक्षकच ठरवीत असतात. त्यातही सुमार नाटक प्रेक्षक कसे काय चालवतात? असा सवाल करणारेही आहेतच की, मराठी नाटके मग ती हौशी असो वा व्यावसायिक, सुमार असो वा दर्जेदार, निर्मात्याकडचा पैसा संपला की बंद पडतात. पण मग एखाद्या नाटकाचा दर्जा उच्च आहे; परंतु ते चालविण्याचे भांडवल जमा केल्याने नाटकातून कमाई होऊ शकते याची हमी 'सुमार' म्हणून नाटकांची हेटाळणी करणारे ठेकेदार घेतील का? नाहीतर आपण असे करुयात किंवा शासनाला असे सुचवूयात की ज्या पद्धतीत रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र प्रत्येक नाटकाला बहाल केले जाते, तसेच नाटकाला अनुदान मिळवून देणाऱ्या कमिटीकडून सुमार आणि दर्जेदार नाटकांचे रेटींग ठरवून ते जाहिरातीत छापणे आवश्यक करावे. जेणेकरुन नाटकांच्या सुमार दर्जावर परिणाम होऊन निर्माते ‘दर्जेदार’ नाटकांकडे आपला मोर्चा वळवतील. दर्जेदार साहित्य पुण्यातून निर्माण होतेय अशी चाहूल जरी लागली तरी मुंबईतल्या सुमार निर्मात्यांना मी पुण्यात पिटाळीन म्हणतो...! माफ करा गाॅसिपकारांनो, मला फक्त सुमार नाटकांची व्याख्या हवी होती, त्या शोधात मी अद्यापही आहे...!