Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका बेवारस मृतदेहाची दफनविधीसाठी चक्क कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाडीतून वाहतूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले आहे.
नेमकं प्रकरण काय ?
माहितीनुसार, शहरात आढळलेल्या एका बेवारस व्यक्तीच्या मृतदेहाचे अमळनेर ग्रामीण रुग्णालयात (Amalner Rural Hospital) शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेहाचा सन्मानपूर्वक दफनविधी करण्यासाठी स्वतंत्र वाहन उपलब्ध करून देण्याऐवजी तो थेट शहरातील कचरा संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या घंटागाडीत ठेवून दफनभूमीकडे नेण्यात आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, मृत्यूनंतरही व्यक्तीच्या सन्मानाची जपणूक करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीका होत आहे.
Ketan Agarwal Murder : लोहगड किल्ल्यावर पती केतन अग्रवाल (Ketan Agarwal) याला शेकडो फूट खोल दरीत ढकलून ठार मारल्याच्या आरोपामुळे सध्या चर्चेत असलेली सिया गोयल आणि तिचा कथित ...
मानवी मूल्यांचीही पायमल्ली
नगर परिषदेच्या नियमांनुसार बेवारस मृतदेहांच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करणे संबंधित कचरा संकलन ठेकेदारावर बंधनकारक आहे. मात्र या प्रकरणात सर्व नियमांना केराची टोपली दाखवत मृतदेहाची वाहतूक कचऱ्याच्या वाहनातून करण्यात आली. त्यामुळे केवळ नियमांचे उल्लंघनच नव्हे, तर मानवी मूल्यांचीही पायमल्ली झाल्याचा आरोप होत आहे.
सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला
घटनेचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. "मृत्यूनंतर प्रत्येकाला सन्मानाने अंतिम निरोप मिळायला हवा," अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला. विविध सामाजिक संघटनांनीही या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे. दरम्यान, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर (Dr. Parikshit Baviskar) यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. दोषींना कोणतीही माफी दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकमध्ये लाखो भाविक, पर्यटक येणार आहेत त्यादृष्टीने त्यांची येण्याजाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे विभागाने ...
सखोल चौकशीचे आदेश
नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनीही संबंधित ठेकेदाराकडून अक्षम्य चूक झाल्याचे मान्य केले आहे. नियमांनुसार स्वतंत्र वाहन उपलब्ध करून देणे बंधनकारक असतानाही त्याचे पालन झाले नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या घटनेनंतर नगर परिषदेच्या देखरेखीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ठेकेदार नियमांचे पालन करत आहेत की नाही, याची प्रभावी तपासणी करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीका होत आहे. त्यामुळे केवळ ठेकेदारच नव्हे, तर संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
शहर विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या प्रशासनाच्या कारभारावर या घटनेमुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मृत्यूनंतरही माणसाच्या सन्मानाची अशी विटंबना होणार असेल, तर ही केवळ निष्काळजीपणाची नव्हे तर संपूर्ण यंत्रणेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.






