Friday, August 7, 2026

Pratap Sarnaik : गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

Pratap Sarnaik : गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई :  श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सज्ज झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने यंदा ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत ५,२२० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या जादा वाहतुकीच्या नियोजनासंदर्भात एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच एसटीचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले, "गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या भावविश्वाशी घट्ट जोडलेला सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा, कोकणातील रहिवासी आणि एसटी यांचे अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही नफा-तोट्याचा विचार न करता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी सज्ज आहे. यंदा सुमारे ५,२२० जादा बसेस कोकणातील विविध मार्गांवर धावणार आहेत."

या जादा बसेसचे आरक्षण npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून, प्रवाशांना बसस्थानकांवर तसेच MSRTC Bus Reservation या अधिकृत मोबाईल ॲपद्वारेही आरक्षण करता येणार आहे.

मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, नुकत्याच पार पडलेल्या आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळाने ५,२०० जादा बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. त्या सेवेला भाविक व प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्याच धर्तीवर गणेशोत्सवासाठीही मोठ्या प्रमाणावर जादा बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१० ऑगस्टपासून गट आरक्षणास प्रारंभ

किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी १० ऑगस्टपासून गट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गट आरक्षणामध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के भाडे सवलत लागू राहणार आहे.

गणेशोत्सवानिमित्त ७ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील प्रमुख बसस्थानकांतून या जादा बसेसचे संचालन करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात एसटीची वाहतूक सुरळीत राहावी यासाठी सर्व प्रमुख बसस्थानके आणि बसथांब्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहतील. तसेच कोकणातील प्रमुख महामार्गांवर आवश्यक त्या ठिकाणी वाहनदुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार असून, प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि अखंड सेवा देण्यासाठी सर्वतोपरी व्यवस्था करण्यात आली आहे.

(अभिजीत भोसले) जनसंपर्क अधिकारी मा. मंत्री परिवहन

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >