भालचंद्र कुबल-पाचवा वेद
आज मला लिहायचेय ते एका नाट्य उपक्रमाबद्दल. मराठी नाटक जागतिक पटलावर इतर भाषांच्या तुलनेत पुढे का आहे? तर अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी मराठी नाटकाला अग्रेसर बनवण्याचे काम करतात. उदाहरणार्थ लोककलेचे सार्वत्रिकरण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आढळते. लोकनाट्य परंपरा पुढे राखायला एखादे घराणे कमी पडत असेल; परंतु महाराष्ट्रात लोकनाट्य विकास, स्वयंप्रेरित आहे. तीच बाब आधुनिक नाटकाबाबतही म्हणता येईल. महाराष्ट्र हे भारतभरातील एकमेव राज्य आहे ज्यात नाटक विकसित व्हावे याकरिता अगदी शैक्षणिक उपक्रमांपासून ते मानसिक जडण-घडणीला दिशा देणाऱ्या बालनाट्यांपर्यंत होत असते. यात अनेक अभ्यासक, संशोधक, साहित्यिक, प्राध्यापक मंडळी पडद्यामागे राहून नाट्यविकासाचे काम करीत असतात. नाटक हे लेखकापासून सुरू होऊन प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेवर संपते, असे विधान ढोबळपणे आम्ही अभ्यासक सतत करीत असतो. बाकी नाटकाची व्यावसायिकता, त्यातील घटकांचे मार्केटिंग इत्यादी बाबींचा विचार न करता त्याचे दृष्यात्मक रूप इतिहास घडवित असते. त्यामुळे नाटक चांगले किंवा वाईट अशा कॅटेगरीत विभागले न जाता, नाटक ही रंगावृत्ती आहे, असे म्हणावे लागते.
याच प्रक्रियेत लेखक हा निर्मितिशील कलावंत गणला जातो. त्याची निर्मिती मात्र त्याला तो लिहितो त्या पलीकडे बघायला लावते. या निमित्ताने तो त्याच्या आधीच्या काळाशी आणि जो त्याच्या कक्षेत येत नाही अशा काळाशीही जोडून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. एखाद्या नाटककाराच्या लेखनात समकालीन वास्तवाचे भान जेव्हा अधोरेखित होत असते तेव्हा तेच वास्तव ही त्याची स्थिती-गती आहे का? लेखक जर समकालीन वास्तवात रुतला असेल तर त्याने आपले पंख फेकून दिले आहेत का? त्याच्या समोरील समकालीन वास्तवाचे प्रश्न सोडविण्यासाठी तो लिहितो का? लेखक वा नाटककार काय समाजशास्त्रज्ञ आहे का? हे सारे प्रश्न उदाहरणे देत मांडायचे ठरविल्यास, "एकच प्याला" हे दारूच्या दुष्परिणामांचे नाटक आहे का? ती तर माणसाच्या तीव्र अहंकाराची कहाणी आहे..! सुधाकराइतकाच सिंधूचाही अहंकार तीव्र आहे. शारदा काय जरठ-बाल विवाहावरचे नाटक आहे का? देवलांनी माणसाचेच अंतरबाह्य दर्शन घडवले. शारदेचे आईवडील, घरचे दारिद्र्य, पैशाकरिता मुलगी विकण्याची वृत्ती, हळदी-कुंकवाच्या प्रवेशातून तरुण मुलींचे उत्सुक मन, सारे व्यक्त होत हे नाटक काळाच्या पुढे जाते. पण मो. ग. रांगणेकरांचे "कुलवधू" मात्र विशिष्ट प्रश्नाभोवती घुटमळते आणि प्रश्नाचे उत्तर मिळून संपते. ते धड समकालीन वास्तवाचे भानही देत नाही आणि काळाच्या पुढेही नेत नाही. हे सारे अभ्यासक म्हणून आम्ही लाख मांडू; परंतु त्यावर उपाय काय? यासाठी मानेवर जू ठेवून लिहायला भाग पाडणारा असा कुठला उपक्रम नाटककारांना निर्मिती करायला भाग पाडतो... तर गेली अनेक वर्षे पहिल्यांदा सुधीर दामल्यानी सुरू केलेला व पुढे रवी मिश्रा यांच्या अस्तित्वने सुरू ठेवलेला "कल्पना एक आविष्कार अनेक" हा उपक्रम. त्यात भर म्हणून आता मात्र ही स्पर्धा थोड्या रुंदावलेल्या स्वरुपात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धात्मक उपक्रमात ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांना एक भारताबाहेरचा व दुसरा भारतीय अशा दोन लेखकांच्या बहुचर्चित कथा देण्यात येतील. नाटककाराला आपल्या वाट्यास आलेल्या दोन्ही कथांपैकी एका कथेचे नाट्यरूपांतर घडवून ते रंगमंचावर सादर करायचे आहे.
एवढेच लक्षात असू द्यायचे आहे की भारताबाहेरील कथा सादरीकरणात ती शक्यतो भारतीयच वाटावी. कल्पना एकमध्ये एखादी कल्पना विस्तृत करायला लागायची त्यात बऱ्याचदा तोच तोचपणा किंवा कंटेट रिपीट व्हायची शक्यता असायची. या स्पर्धेत मात्र प्रत्येक स्पर्धकाला मिळणाऱ्या दोन्ही कथा निरनिराळ्याच असणार आहेत. त्यामुळे या कल्पकतेतून बऱ्याच लेखकांना त्यांची क्षितीजे रुंदावण्यास संधी मिळणार आहे. शिवाय पारितोषिकांची रक्कम देखिल घसघशीत लाखो रुपयांची असल्याने स्वतःला व्यावसायिक म्हणवणाऱ्या किंवा स्पर्धात्मक लिखाण डाऊन मार्केट समजणाऱ्या सो काॅल्ड नाटककारांनी हे चॅलेंज म्हणून स्विकारावे. अॅटीट्यूड सिंड्रोम कॅरी करणाऱ्या एक्सपरीमेंटल लेखकांनी तर परकिय भाषेतील कथेवर आपली रचना लिहून निदान सिद्ध करुन दाखवावी. स्पर्धा म्हटल्यावर त्यावर सकारात्मक कमी आणि नकारात्मक प्रतिक्रिया देऊन आपले वेगळेपण दाखवून देणारे, त्या स्पर्धेचे प्रयोग न बघताच त्यावर भाष्य करणारे, एखाद्या रंगकर्मीने विषय सुचवल्यावर त्यालाच व्हिजन नसल्यामुळे सुचवलेल्या विषयाचे तीन तेरा वाजणार हे भविष्य वर्तवणारे निंदक मात्र आता या स्पर्धेकडे कसे पाहतील ? हा मला पडलेला रंजक प्रश्न आहे. मी स्वतः कल्पना एक आविष्कार अनेकचा दोन वेळा विजेता लेखक आहे. एकदा नारायण सुर्व्यांच्या "कठीण होत आहे" या कवितेवरील एकांकिकेस आणि "ब्रेक के बाद" या विषयावरील एकांकिकेस केवळ वेगळा विचार केला म्हणून लेखनाचे पारितोषिक मिळाले होते. असो. तर असा वेगळाच विचार अनेक लेखक करीत असत फक्त ती एकांकिका याच स्पर्धेत उठून दिसायची. नंतर मात्र एकांकिका स्पर्धांच्या "प्रायजिंग स्ट्रॅटेजी" पुढे ती टिकत नसे. डाॅ. अनिल बांदीवडेकरांची "कृष्णछाया" कल्पनामध्ये एक नंबरात होती पण पुढे खुल्या एकांकिके स्पर्धेत तिचा निभाव लागू शकला नाही. या स्पर्धेबाबत मात्र असे होणार नाही याचे कारण प्रत्येक कथेचा विषय वेगळा आहे. स्पर्धेच्या माहितीबाबतची लिंक मी या लेखासोबत देत आहे. त्या माहिती आधारे किमान एका तरी नाट्यकृतीस जन्मास घालावे. रूपांतरण हे एक प्रकारचे समीक्षणच असते. समजून उमजून केलेल्या रूपांतरणास वाङ्मयीन व्हॅल्यू आहे. कारण चांगली समीक्षा सर्जनात्मक असते. कलाकृती आणि त्या कलाकृतीचा जाणकार यांचे नाते बरोबरीचे आहे, जे तुमची सर्जनशीलता जोपासते व वाढीस लावते. "कथाहोत्र" या नावाने येऊ घातलेल्या अनोख्या नाट्यउपक्रमात सहभागी होण्याची संधी प्रत्येक रंगकर्मीने साधावी ही विनंती..!