Friday, June 26, 2026

The India Story: Slow Poison in Progress' : द इंडिया स्टोरी'चा टीझर प्रदर्शित, 'या' दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

The India Story: Slow Poison in Progress' : द इंडिया स्टोरी'चा टीझर प्रदर्शित, 'या' दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

दैनंदिन जीवनात आपण खात असलेल्या अन्नातून शरीरात जाणाऱ्या रसायनांमुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा मुद्दा आता रुपेरी पडद्यावर मांडला जाणार आहे. 'द इंडिया स्टोरी : स्लो पॉइझन इन प्रोग्रेस' (The India Story: Slow Poison in Progress') या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, त्यामध्ये कीटकनाशकांच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री काजल अग्रवाल प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

टीझरमध्ये शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषतः लहान मुले आणि तरुणांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न या कथेत मांडले गेले आहेत. अन्नातून शरीरात जाणाऱ्या रसायनांमुळे भविष्यात कोणते धोके निर्माण होऊ शकतात, याकडे चित्रपट लक्ष वेधतो.

या चित्रपटात श्रेयस तळपदे एका वडिलांची भूमिका साकारत आहे. आपल्या मुलीला गमावल्यानंतर तो या समस्येविरोधात लढा देताना दिसणार आहे. या भूमिकेबद्दल बोलताना श्रेयसने सांगितले की, ही कथा केवळ मनोरंजनासाठी नसून समाजात महत्त्वाच्या विषयावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. (Bollywood News)

अभिनेत्री काजल अग्रवालनेही या चित्रपटाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. आई म्हणून ही कथा स्वतःला जवळची वाटल्याचे सांगत, अन्नाच्या सुरक्षिततेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल, अशी आशा तिने व्यक्त केली.

चित्रपटाचे दिग्दर्शक चेतन डीके यांच्या मते, हा चित्रपट केवळ एक कथा नसून प्रत्येक कुटुंबाशी संबंधित असलेल्या विषयावर विचार करायला लावणारा प्रयत्न आहे. लोकांनी आपल्या ताटात येणाऱ्या अन्नाबद्दल अधिक जागरूक व्हावे, हा या चित्रपटाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

'द इंडिया स्टोरी : स्लो पॉइझन इन प्रोग्रेस' हा चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >