Monday, June 22, 2026

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज, सोमवारी दुपारी एक तीन मजली इमारतीला भीषण आग लागली. या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर कोचिंग सेंटर होते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी अडकले होते. मिळालेल्या माहितीनुसार या आगीत 1४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. यात बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फोनवरून बचाव कार्याची माहिती सातत्याने घेत आहेत. दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या कोचिंगमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून घेतले होते. एका मुलाने पहिल्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव वाचवला. पण तो खाली ग्रीलवर पडला आणि गंभीर जखमी झाला. अग्निशमन दलाच्या सुमारे 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीची मागची भिंत तोडली आहे, ज्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी सांगितले की, लखनौमधील आगीत एकूण 14 मुलांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. बचावकार्य पूर्ण झाले असून, संपूर्ण सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे. दरम्यान उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कोणालाही सोडले जाणार नाही आणि कठोर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीगढमधील आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. घटनास्थळी पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री योगी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल झाले. त्यांनी वाचलेल्यांकडून घटनेबद्दल विचारपूस केली. त्यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले.

लखनौमधील आगीच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

इमारतीत तळघर, तळमजला आणि पहिल्या मजल्यावर पेट शॉप आणि क्लिनिक आहे. दुसऱ्या मजल्यावर 'लर्निंग स्पेस' नावाचे ग्रंथालय (कोचिंग) आणि 'हेड हॉपर स्टुडिओ' आहे, जिथे 3D आर्ट प्रोडक्शन आणि गेम ॲसेट आउटसोर्सिंगचे काम होते. ही आग अचानक लागली. ते एक ॲनिमेशन केंद्र होते. येथे मुले ॲनिमेशन, म्हणजेच कार्टून बनवायला शिकायला येत होती. ही घटना नेमकी कशी झाली, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. जखमींना केजीएमसी ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवले जात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेसंदर्भात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रधान सचिव (गृह) आणि डीजीपी यांना घटनास्थळी बोलावून, घटनेच्या कारणांची चौकशी करण्याचे आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर कारवाई सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >