Saturday, June 20, 2026

स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी

स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी

आनंदी पालकत्व - डाॅ. स्वाती गानू ही वर्षांपूर्वीपर्यंत स्पर्धा परीक्षा म्हणजे शाळेतील चौथी आणि सातवीची स्कॉलरशिपची परीक्षा होती तसेच आठवी, नववीमध्ये मुलं एमटीएस व एनटीएस या परीक्षा देत असत.आता मात्र विशिष्ट प्रकारच्या क्षेत्रात करिअर करायचे असल्यास स्पर्धा परीक्षा द्यावी लागते त्यामुळे त्याची व्याप्ती खूप मोठी झाली आहे.पूर्वी स्पर्धा परीक्षांची तयारी शाळेतच करून घेतली जात असे जशी ती आजही करून घेतली जाते मात्र अलीकडे स्पर्धा परीक्षांकरिता स्वतंत्रपणे मार्गदर्शन केले जाते. त्याचे स्वतंत्र क्लासही असतात. काही मुलांना आठवीपासून अशा प्रकारचे फाउंडेशन कोर्सेस सुरू केले जातात; परंतु या वयात मुलं अद्याप तेवढी तयार झालेली नसतात. त्यामुळे मुलांवर शालेय अभ्यासाचा ताण तर असतोच त्याबरोबरच स्पर्धा परीक्षांच्या बाबतही मोठास्ट्रेस असतो. खरे म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या मागचा हेतू हा आहे की, तुमचे मूल जर भाषेत प्रवीण असेल तर आपली कल्पना मांडणे, स्पष्टपणे विचार मांडणे, कल्पनेचा विस्तार करणे, एखाद्या संकल्पनेला फुलवून, बहरवून कथा, कविता, लेख या माध्यमातून मांडणे या कौशल्याची ती परीक्षा असू शकते. तसेच जर तुमचे मूल गणित, शास्त्र यांसारख्या तार्किक विषयांमध्ये पारंगत असेल तर त्याची तर्कशुद्ध विचारसरणी, लॉजिकल थिंकिंग याबद्दलची परीक्षा जणू या स्पर्धा परीक्षेतून घेतली जाते. पालकांनो आपण जर लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षेच्या पद्धतीने मुलांचा अभ्यास होऊ दिला तर त्यांना त्यांची स्वतःची कौशल्ये लक्षात येतात आणि आपल्यालाही त्यांच्या आवडीच्या क्षेत्राबद्दल माहिती मिळते. मोठे झाल्यानंतर त्यांना स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत तणाव न वाटता, भीती न जाणवता आपण हे सहज करू शकू फक्त त्याकरता काही महत्त्वाच्या बाबी आचरणात आणाव्या लागतील, अशी मुलांची मानसिकता आपण तयार करू शकतो.आजच्या काळात स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर खालील गोष्टी करता येतील.मुलांनो... “तुम्ही रोज अभ्यास करता... नोट्स बनवता... क्लासलाही जाता... पण तरीही अपेक्षित यश मिळत नाही? स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणारे विद्यार्थी काही वेगळं करत नाहीत... ते फक्त काही गोष्टी योग्य पद्धतीने करतात!”आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याचं एक स्वप्न असतं. कोणाला अधिकारी बनायचं असतं, कोणाला डॉक्टर, इंजिनीअर किंवा स्वतःच्या क्षेत्रात मोठं यश मिळवायचं असतं. पण स्वप्न मोठं असलं तरी त्यासाठी योग्य तयारी, सातत्य आणि शिस्त आवश्यक असते. अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ज्या प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात ठेवायला हव्यात. १) ध्येय निश्चित करा सर्वप्रथम स्वतःला एक प्रश्न विचारा... “मला नक्की काय बनायचं आहे?” कारण ध्येय स्पष्ट नसेल, तर मेहनतीला दिशा मिळत नाही. जेव्हा तुमचं ध्येय स्पष्ट असतं, तेव्हा प्रत्येक दिवसाची मेहनत अर्थपूर्ण वाटू लागते. २) सातत्याची ताकद

अनेक विद्यार्थी एका दिवशी ८-१० तास अभ्यास करतात आणि नंतर दोन दिवस पुस्तकालाही हात लावत नाहीत. यश अशा पद्धतीने मिळत नाही. दररोज २ ते ३ तास मन लावून केलेला अभ्यास, अधूनमधून केलेल्या १० तासांच्या अभ्यासापेक्षा जास्त परिणामकारक असतो. लक्षात ठेवा... सातत्य हेच यशाचं खरं गुपित आहे. ३) वेळापत्रक आणि नियोजन

यशस्वी विद्यार्थ्यांकडे एक गोष्ट नक्की असते... ती म्हणजे योग्य नियोजन. कोणता विषय कधी अभ्यासायचा? पुनरावृत्ती कधी करायची? टेस्ट कधी द्यायची? यासाठी एक साधं आणि वास्तववादी वेळापत्रक तयार करा. ४) वेळेचं व्यवस्थापन शिकलात, तर अर्धी लढाई जिंकलीच समजा. कन्सेप्ट समजून घ्या. फक्त पाठांतर करून स्पर्धा परीक्षा जिंकता येत नाही. प्रश्न बदलू शकतो... पण कन्सेप्ट बदलत नाही. म्हणून प्रत्येक विषयातील “का?” आणि “कसे?” हे समजून घ्या. ज्याची कन्सेप्ट मजबूत असते, त्याला कोणताही प्रश्न कठीण वाटत नाही. ५) चुका सुधारण्याची सवय यशस्वी विद्यार्थी आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये एक मोठा फरक असतो.यशस्वी विद्यार्थी त्यांच्या चुका लिहून ठेवतात. Mock Test दिल्यानंतर फक्त गुण पाहू नका. कोणत्या चुका झाल्या? का झाल्या? त्या पुन्हा होऊ नयेत यासाठी काय करायचं? याचा विचार करा. कारण प्रत्येक सुधारलेली चूक तुम्हाला यशाच्या आणखी जवळ घेऊन जाते. ६) सोशल मीडिया कंट्रोल आजचा सर्वात मोठा टाइम किलर कोण? सोशल मीडिया! फक्त ५ मिनिटांसाठी मोबाईल उघडतो... आणि एक तास कधी निघून जातो ते कळतही नाही. मोबाईल वापरा... पण त्याचे गुलाम बनू नका.मोबाईल तुमच्यासाठी काम करायला हवा... तुम्ही मोबाईलसाठी नाही. ७) तुलना टाळा मित्रांना जास्त मार्क्स मिळाले... कोणाचा अभ्यास तुमच्यापेक्षा चांगला आहे... याचा विचार करत बसू नका. तुलना करायची असेल, तर स्वतःशी करा. कालचा तुम्ही आणि आजचा तुम्ही यामध्ये किती सुधारणा झाली हे महत्त्वाचं आहे.

८) करिअर रोडमॅप फक्त परीक्षा पास होण्याचा विचार करू नका. पुढे काय? कोणतं करिअर? कोणती परीक्षा? कोणत्या कौशल्यांची गरज आहे? याचा रोडमॅप तयार करा. कारण दिशा नसलेली मेहनत अनेकदा वाया जाते.यशस्वी होणारे विद्यार्थी हुशार जन्माला येत नाहीत. ते दररोज स्वतःला थोडं थोडं सुधारत राहतात. मोठी स्वप्ने पाहा. स्वतःवर विश्वास ठेवा. सातत्य ठेवा आणि हार मानू नका. कारण...आजची मेहनत उद्याचे यश ठरवते हेविसरू नका.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा