स्मृतीगंध-लता गुठे
आषाढी एकादशी जवळ आली की, महाराष्ट्रातील असंख्य वारकऱ्यांच्या मनात पंढरपूरची आस जागते. प्रत्येक वर्षी वारीला जाणारे वारकरी आधीपासूनच तयारीला लागतात. हातात टाळ आणि मुखात विठ्ठलाचे नाव, गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळाला गंध, टिळा, पांढरी वस्त्रं परिधान केलेली ही वारकऱ्यांची ओळख. एकदा तरी पंढरीला वारीमध्ये जाण्याची तीव्र इच्छा असते आणि ती कधीतरी पूर्ण होते तेव्हा ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशी अवस्था होते. या पालखी परंपरेला ७०० ते ८०० वर्षांचा इतिहास आहे. तुकाराम महाराज पहिली ज्ञानेश्वर माऊलीची पालखी आळंदीहून सुरुवात करून पायी पंढरपूरला निघाले. त्यांच्यासोबत काही संत मंडळी होती. अशा प्रकारे पालखीची सुरुवात झाली. संत ज्ञानेश्वरांच्या बरोबर संत तुकारामांच्या नावाचा जयघोष करत मोठ्या उत्साहात हजारो भाविकांच्या साक्षीने आजही आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघते, देहूहून संत तुकाराम महाराजांची पालखी आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून विविध संतांच्या पालख्या हजारो वारकऱ्यांसह पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात. मोठा सुखाचा सागर ओसंडून वाहत असतो. विठ्ठल नामाचा गजर करत टाळ-मृदंगाचा नाद, हातात भगव्या पताका, अभंग ओव्या गात, डोईवर तुळशी वृंदावन घेऊन माय माऊल्या सर्व संसाराचा व्याप-ताप विसरून विठुरायाच्या दर्शनाची मनी आस निर्माण झालेली असते. त्यामुळे कित्येक मैल चालूनही ना कंटाळा येत ना थकवा जाणवत, चेहऱ्यावर आनंद असतो. वारीचा मार्ग हा फक्त पायांनी चालण्याचा नसतो; तो मनाला शुद्ध करणारा प्रवास असतो. उन्हाची तमा नसते, पावसाची पर्वा नसते, थकव्याचे भान नसते. प्रत्येक पाऊल विठ्ठलाच्या भेटीच्या आनंदाने पुढे पडत असते. “ज्ञानोबा-तुकाराम”चा अखंड जयघोष मनातील सर्व दुःख, चिंता आणि अहंकार दूर करत जातो.
वाटेत लागणाऱ्या गावांनी चहा-नाष्टा जेवणाची सोय केलेली असते. ज्या गावात मुक्काम असतो त्या गावांमध्ये रात्री भोजन, कीर्तनाचा कार्यक्रम असतो. मी लहान असताना आमच्याही गावी भगवान बाबाची पालखी यायची. पालखीबरोबर गडावरील बाबा असायचे. त्यांना गावामध्ये घेऊन येण्यासाठी शिवारावर गावकरी जाऊन त्यांचं स्वागत करायचे आणि मोठ्या आदराने त्यांना गावामध्ये घेऊन यायचे. सर्व वारकऱ्यांची भोजनाची सोय केलेली असायची. “चला जाऊया पंढरी!” हा शब्द कानावर पडला की आजही मनात एक वेगळीच ओढ जागी होते. पायांना चालण्याचे बळ येते, ओठांवर विठ्ठल नामाचा गजर सुरू होतो आणि हृदय भक्तिभावाने भरून येते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील सर्वांत श्रेष्ठ आणि लोकमान्य असा हा वारीचा सोहळा म्हणजे केवळ धार्मिक यात्रा नाही, तर समता, बंधुता, प्रेम, सेवा आणि मानवतेचा चालता-बोलता उत्सव सोहळा आहे.
संत ज्ञानेश्वर यांनी भागवत धर्माची स्थापना केली आणि एका भगव्या झेंड्याखाली सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. ती आजतागायत चालू आहे. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला समतेचा अमूल्य संदेश दिला आहे. वारीत श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष, लहान-मोठे, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, अधिकारी - सर्वजण एका रांगेत चालतात. येथे जाती-पातीचा भेद नाही, उच्च-नीचतेचा प्रश्न नाही. हीच खरी संतांनी शिकवलेली मानवधर्माची शिकवण आहे.एकाच विचाराने भरलेली ही वारकरी मंडळी असतात. त्यामुळे कोणाच्याही मनामध्ये द्वेष भावना नाही, कोणाशी स्पर्धा नाही, त्यांच्यातील पवित्र विचारामुळे दिंडीतील शिस्त आणि सामूहिक जीवनाचे भान ते पाळतात. रिंगण धरून फुगड्या खेळतात, नृत्य करतात, त्यात लय असते, ताल असतो त्यामुळे ते पाहायलाही खूप छान वाटते. वारकऱ्यांमध्ये आणखी एक स्तुत्य गोष्ट म्हणजे ते वेळेचे काटेकोर पालन करतात. जिथे मुक्कामाला असतील तिथे वारीतील बायका स्वयंपाक करायला मदत करतात. त्यांच्यामध्ये एक सेवावृत्ती असते. सर्वांबरोबर भोजन घेण्यातला आनंद म्हणजे प्रसाद. वेळप्रसंगी आबालवृद्धांची सेवा करतात. एकमेकांविषयीचा आदर यातून अधोरेखित होतो. वारी माणसाला फक्त भक्ती शिकवत नाही, तर शिस्त, संयम, सहकार्य आणि समाजशीलतेचे संस्कारही घडवते.
आजूबाजूचा परिसर हिरव्यागार झालेला असतो. डोंगरदऱ्यांतून भगव्या पताकांनी रस्ते सुशोभित होतात. अभंगांच्या स्वरांनी भारलेले वातावरण आणि टाळ-मृदंगाचा मंजुळ नाद त्या वातावरणाला आणखी प्रसन्न करतो. हे दृश्य मनाला विलक्षण आनंद देऊन जाते. त्या क्षणी निसर्गही जणू विठ्ठलनामात रंगून जातो. पंढरपूर जवळ येऊ लागले की, प्रत्येक वारकऱ्याच्या डोळ्यांत भेटीची आस दाटून येते. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी पवित्र तन-मनाने थकलेली पावले कितीतरी वेळ ताटकळत उभी असतात. तसाच विठ्ठलही भक्तांना भेटण्यासाठी विटेवर ताटकळत उभा असतो, हे भक्तीचे अनोखे रूप आहे. विठ्ठलाशी जेव्हा नजर भेट होते तेव्हा वारकऱ्यांचा सगळा क्षीण नाहीसा होतो. ही अद्वैत भेट शब्दांच्या पलीकडची असते.
फक्त महाराष्ट्रातच नाही तर, देश-विदेशातही या वारीचे खूप कौतुक केले जाते. यावर्षी तर परदेशातूनही वारकरी महाराष्ट्रात विठ्ठल दर्शनासाठी येऊ लागले आहेत तेवढ्याच उत्साहाने. ते पाहून असे म्हणावेसे वाटते की, वारी हा केवळ धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा आत्मा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत सावता माळी आणि अनेक इतर संतांनी रुजवलेली भक्तीची परंपरा आजही लाखो वारकऱ्यांच्या पावलांनी जिवंत ठेवली आहे. अभंग, भारूड, कीर्तन आणि हरिपाठ यांच्या माध्यमातून अध्यात्म आणि लोकजीवन यांचा सुंदर संगम येथे अनुभवायला मिळतो.आजच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या आणि स्पर्धेच्या युगात वारी जरा उसंत घ्यायला शिकवते आणि जणू काही ती सांगते - जीवनाचा खरा अर्थ संपत्तीमध्ये नसून प्रेम, सेवा, समता आणि ईश्वरनिष्ठेत आहे. वारी म्हणजे चालत चालत माणुसकी शिकण्याचा प्रवास आहे.“चला जाऊया पंढरी!” ही केवळ एक हाक नाही, तर ती मनाला पावन करणारी, आत्म्याला प्रसन्न करणारी आणि जीवनाला नवी दिशा देणारी प्रेरणा आहे. विठ्ठलाच्या भेटीची ओढ, संतांच्या विचारांचा वारसा आणि मानवतेची शिकवण यांचे अद्वितीय मिश्रण म्हणजे पंढरीची वारी. म्हणूनच प्रत्येक वर्षी लाखो पावले एकाच दिशेने चालत राहतील अखंड अव्याहत...






