प्रतिभारंग-प्रा. प्रतिभा सराफ एक गमतीशीर घटना सांगते. एक अमेरिकन बाई पायऱ्या उतरत होती. पायऱ्या अतिशय निमुळत्या होत्या याशिवाय त्या एका कोनातून वळून खाली येणाऱ्या होत्या. उंच टाचेच्या सँडल, घट्ट ड्रेस, हातात सामानांचे ओझे याशिवाय नेहमीसारखेच प्रत्येक माणसाच्या मनावरसुद्धा प्रचंड ओझे आणि डोक्यात तणाव असतोच, तो सांभाळत ती उतरत होती. अशात तिचा तोल गेला आणि तिचा एक पाय वाकडा झाला. दोन-तीन पायऱ्यांवरून ती खाली घसरत असताना, एक डिलिव्हरी बॉय मानवतेच्या हेतूने पटकन पुढे सरकून तिला सावरतो. त्यामुळे ती अधिक उलटीसुलटी खाली पडत नाही. आता हे वाचल्यावर आपल्यापैकी प्रत्येक जण असाच विचार करत असेल की तिने त्याला नम्रपणे धन्यवाद दिले असणार! परंतु आपल्याला नेहमी वाटते तसेच घडते असे नाही. त्या बाई त्या डिलिव्हरी बॉयवर प्रचंड रागावल्या. त्यांनी त्या माणसाविरुद्ध कोर्टात केस दाखल केली. कारण काय तर, मी पडताना पाहून त्यांनी मला पकडले तेव्हा त्याची पद्धत किंवा स्पर्श मला भावला नाही. याचा मला प्रचंड मानसिक त्रास झाला इतके सांगून ही बया थांबली नाही, तर तिने चक्क त्याच्याकडून ‘दोन लाख अमेरिकी डॉलर’ इतकी नुकसान भरपाईची मागणी केली. तो डिलिव्हरी बॉय अत्यंत गरीब माणूस होता. तो दोन लाख काय दोन हजार डॉलरसुद्धा देऊ शकत नव्हता. बरं त्याचा गुन्हा काय तर त्याने एका बाईला पडताना सावरले होते. शेवटी न्यायालयात धाव घेणारा चांगला माणूस असो किंवा वाईट न्याय हा सत्यालाच मिळतो. त्याप्रमाणे न्यायालयाने त्या भागातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले आणि त्यांच्या लक्षात आले की केवळ मानवतेच्या हेतूने पडणाऱ्या व्यक्तीला त्याने मदतीचा हात देऊन सावरले होते त्यामागे त्याचा कोणताही वाईट उद्देश नव्हता. त्या बाईने या माणसावर जो गुन्हा दाखल केला होता आणि त्याला भरपाई मागितली होती, तीच रक्कम म्हणजे दोन लाख अमेरिकी डॉलर त्या बाईला या डिलिव्हरी बॉयला देण्यास भाग पाडले. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तिने त्याच्यावर दाखल केलेला गुन्हा हा चुकीचा होता, म्हणून! हिंदीत म्हटले जाते की भगवान के घर देर है, अंधेर नही है! त्यानुसार गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंतच्या ज्या मानसिक अवस्थेतून हा गरीब डिलिव्हरी बॉय गेला असेल त्याची आपण कोणी कल्पनाच करू शकणार नाही. जर असा न्याय लागला नसता तर जगात कोणीही चांगल्या वृत्तीचा माणूस गरजवंताला, पीडिताला, अपघातग्रस्तमाणसांना मदत करावयास स्वतःहून पुढे येण्यासाठी कधीच धजावला नसता!
लहान मुलांच्या हातून एखादी वस्तू तुटते, फुटते किंवा हरवते तेव्हा ते जोराजोराने रडायला सुरुवात करतात. आपल्या सोबतीच्या बहीण-भावांचा किंवा मित्रमैत्रिणीच्या हाताने ते घडले हे सांगण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला कोणी ओरडू किंवा मारू नये यासाठी ते आधीच कातडीबचाव धोरण अवलंबतात. हे फारसे कोणी त्यांना शिकवलेले नसते; परंतु त्यांचा जो थोडाफार अनुभव असतो की आपल्या हातून काही तुटले-हरवले तर आपल्याला या आधी मार मिळालेला असतो हे लक्षात ठेवून ते रडण्याची कृती अवलंबतात आणि दुसऱ्यांवर नाव ढकलण्याचा प्रयत्न करतात म्हणजे आपले पूर्वानुभव व्यवस्थित गाठीशी बांधून पुढे वाटचाल करतात. तर अशा ‘चोराच्या उलट्या बोंबा’ हे आपण नेहमीच अनुभवतो.
अलीकडेच एक वास्तववादी घटना घडली. एका सिग्नलवर एक बाई दुचाकीवरून सिग्नल मोडून विरुद्ध दिशेने येत असताना ती एका वाहतूक पोलीसला धडकली. तो पोलीस खाली पडला इतकेच नव्हे तर त्याला व्यवस्थित मार लागला तशातही तो उठून उभा राहिला आणि त्याविषयी त्या बाईला ओरडू लागला. या बाईबरोबर डबल सीट मागे बसलेली बाई जिने या भांडणाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्या व्हिडीओमध्ये पोलीस या बाईला ओरडतोय असे चित्र सर्वांच्या डोळ्यांसमोर उभे केले. त्या बाईचे व्हिडीओ पाहून आणि एकंदरीतच जमावाचा आयडाओरडा ऐकून पोलिसालाच अटक करण्यात आली. पोलीस स्टेशनवरही बाई कांगावा करत होती. तिची तक्रार लिहून घेतली जात होती. जखमी अवस्थेतील पोलिसाला काय करावे सुचत नव्हते इतक्यात त्या सिग्नलवरील सीसीटीव्हीचा रेकॉर्ड हाती आला. तिथे संपूर्ण चित्र स्पष्ट झाले, की बाई वाहतुकीचे नियम मोडून विरुद्ध दिशेने आली इतकेच नाही तर तिने पाठीमागून आपली ड्युटी प्रामाणिकपणे करणाऱ्या त्या पोलिसाला धडक दिली. त्या धडकेने तो पडला आणि जखमी झाला. त्या बाईवर गुन्हा दाखल झाला. व्हिडीओमध्ये केवळ एकतर्फी आणि चुकीची माहिती रेकॉर्ड करणाऱ्या त्या दुसऱ्या बाईवरही गुन्हा दाखल झाला. त्या दोघींना दंड द्यावा लागला, याशिवाय त्यांना या पोलिसाची माफी मागायला लावण्यात आले. त्या पोलिसाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन दोन दिवस त्याची सेवा करण्याची कामगिरीही या दोघींवर सोपवण्यात आली. या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांवर दाखवण्यात आले, जेणेकरून अशा तऱ्हेने माणसे वागणार नाहीत. ‘चोराच्या उलट्या बोंबा’ या म्हणीचा अनुभव कधीतरी आपल्यालाही आलाच असणार! तो नक्की शेअर करा जेणेकरून असे वागणाऱ्यांना निश्चितपणे एक धडा मिळेल! pratibha.saraph@ gmail.com






