Saturday, June 20, 2026

बाबा हा बाबाच असतो !

बाबा हा बाबाच असतो !

संवाद- निशा वर्तक

जबाबदार बाप होणं सोपं नसतं...बाप कळायला बाप व्हावं लागतं...पण मी बघितलंय आणि अनुभवलंय बापाला, मुलगी होऊन त्यांची जाणलयं मी बापाला...”पुरुष जेव्हा बाप होतो, तेव्हा त्याचा जणू पुनर्जन्मच होतो. त्या क्षणापासून तो केवळ एक व्यक्ती राहत नाही; तो ‘बाबा’ बनतो. आणि बाबा होणं खरंच सोपं नसतं. ती एक जबाबदारीअसते, एक व्रत असतं, एक अखंड चालणारी तपश्चर्या असते.एकदा बाबा झाल्यावर तो स्वतःसाठी जगतच नाही. त्याची प्रत्येक धडपड, प्रत्येक स्वप्न, प्रत्येक संघर्ष हा आपल्या मुलांसाठी असतो. स्वतःच्या इच्छा, अपेक्षा, हौसमौजा बाजूला ठेवून तो आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी झटत राहतो.मी एका साध्या, मनाने श्रीमंत असलेल्या शेतकरी कुटुंबात जन्मले. त्या काळात मी माझ्या आई-वडिलांची तिसरी मुलगी होते. त्यावेळेस जेव्हा मुलींबद्दल अनेक पूर्वग्रह होते, तेव्हाही माझ्या बाबांनी मला कधीच कमी लेखलं नाही. उलट अपार प्रेम दिलं, शिक्षण दिलं, मोठं केलं.रॉकेलच्या दिव्याच्या मंद प्रकाशात माझा अभ्यास घेणारे बाबा आजही डोळ्यांसमोर उभे राहतात. मी आजारी पडले की रात्रभर जागून माझ्या कपाळावर मिठाच्या घड्या ठेवणारे ते हात आठवतात. आयुष्यभर त्यांनी कधी माझ्यावर हात उचलला नाही. शिस्त होती, पण त्याहून मोठं प्रेम होतं. खरंच, बाप आणि लेकीचं नातं काहीसं वेगळंच असतं. शब्दांच्या पलीकडचं, हक्काचं आणि निस्सीम विश्वासाचं. कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता देण्यापासून ते मुलांच्या छोट्या-मोठ्या इच्छा पूर्ण करण्यापर्यंत बाबा अहोरात्र झटत असतात. ते वरून कदाचित कठोर, शिस्तप्रिय आणि रागीट वाटू शकतात; पण त्या कठोर चेहऱ्यामागे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीची काळजी आणि अथांग प्रेम दडलेलं असतं.मुलांच्या आनंदासाठी स्वतःच्या अनेक गरजा बाजूला ठेवणारा माणूस म्हणजे बाबा. घरावर संकट आलं की सर्वात आधी छाती पुढे करून उभा राहणारा बाबा असतो. वादळ असो की ऊन, संकट असो की संघर्ष – कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी तो हसत हसत पार पाडत असतो. म्हणूनच ज्या घरात वडील असतात, त्या घराकडे वाकडी नजर करून पाहण्याची कोणाची हिंमत होत नाही. कारण त्या घरातला कर्ता पुरुष अजून उभा असतो.आई होण्यालाही वडिलांमुळेच अर्थ प्राप्त होतो. आई मायेची सावली असेल, तर बाबा त्या सावलीला आधार देणारा वृक्ष असतो.आजचा बाबा मात्र अनेक वेगळ्या संघर्षांना सामोराजात आहे. खूप आधी ठरवूनही अचानक आलेल्या ऑफिसच्या कामामुळे मुलाच्या शाळेतील कार्यक्रमाला जाऊ न शकलेला बाबा... गाडीत बसून मोबाईलवर मुलाचं गाणं ऐकत एकटाच टाळ्या वाजवणारा बाबा...मुलीने मागितलेली भातुकली घेऊन वाढदिवसाला वेळेत पोहोचण्याची धडपड करणारा बाबा... ट्रॅफिकमुळे उशीर झाल्यावर झोपलेल्या मुलीच्या उशाशी बाहुली ठेवून तिच्याकडे पाहत अश्रू लपवणारा बाबा...दौऱ्यावर असताना दर काही तासांनी फोन करून सहा महिन्यांच्या बाळाशी “हॅलो... मी बाबा...” असं म्हणत बोलण्याचा प्रयत्न करणारा बाबा...घरापासून शेकडो किलोमीटर दूर राहून, “माझी आठवण काढतात ना मुलं?” या एका प्रश्नाच्या उत्तरासाठी आसुसलेला बाबा...मुलीचं लग्न ठरल्यानंतर “डोळ्यांत कचरा गेला म्हणून पाणी आलं” असं म्हणत भावना लपवणारा बाबा...कार्यालयात अत्यंत कडक असलेला पण घरी मुलीबरोबर शाळा-शाळा खेळताना तिच्या हातचा धपाटा आनंदाने खाणारा बाबा... रात्री उशिरा घरी आल्यावर झोपलेल्या मुलांच्या केसांतून हात फिरवत त्यांच्याशी एकटाच बोलणारा बाबा... परदेशात शिकणाऱ्या मुलीशी व्हिडीओ कॉलवर बोलताना, “खूप त्रास होत असेल तर परत ये गं” असं काळजीने म्हणणारा बाबा... हे सगळे बाबा एकाच धाग्याने बांधलेले असतात – प्रेमाच्या धाग्याने. हे सगळं लिहिताना बाबावरची हळवी करणारी सर्व गाणी आठवत राहतात. थकलेल्या बाबाची कहाणी ऐकताना डोळे पाणावतात तसेच ‘मेरा नाम करेगा रौशन... जग मे मेरा राज दुलारा’ हे ऐकूनही डोळे भरतात. बाबा या शब्दाची महती आकाशाहून विशाल आणि सागराहून गहिरी आहे. बाप समजायला खरोखर बाप व्हावं लागतं असं म्हणतात; पण मुलगी होऊनही मी माझ्या बाबांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि जाणवलं की बाप कधी रडत नाही असं आपण म्हणतो, पण तो रडतो... फक्त इतरांना दिसणार नाही इतकं आतल्या आत रडतो. बाप कधी खचत नाही, कधी हार मानत नाही. मुलं घरटं सोडून नवी क्षितिजं शोधत असतात, पण बाप मात्र घरट्याची प्रत्येक काडी जपून ठेवत असतो. मुलांच्या यशाने तो अभिमानाने हसत असतो आणि त्यांच्या दूर जाण्याने एकटेपणात हळूच डोळे पुसत असतो. आज मी माझ्या घरात माझ्या मुलांचा एक असाच बाबा अनुभवते, सतत मुलांसाठी अस्वस्थ असलेला... दोन्ही मुलं लांब असल्याने हळवा झालेला बाबा... मुलांशिवाय घराला काही अर्थच नाही असं वाटणारा बाबा... मुलं मोठी झाली तरी अजूनही त्यांना लहानच समजणारा बाबा आणि भरपूर खूप काही. बाबांचं ऋण कधीही फेडता येत नाही. ते वटवृक्षासारखे असतात – स्वतः उन्हात उभं राहून आपल्या कुटुंबाला प्रेमाची, सुरक्षिततेची आणि विश्वासाची सावली देणारे. म्हणूनच...बाबा, बाप, वडील, पप्पा, डॅडी अशी कितीही नावं असली, तरी शेवटी...“बाबा हा बाबाच असतो!”
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा