वीण लिखाणाशी ही तुटेना...

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल 


मुग्धा गोडबोले - रानडे

मुग्धा गोडबोले-रानडे सध्या अभिनयासोबत लेखनाची बाजू सांभाळत आहे. वीण दोघांतली ही तुटेना, सनई चौघडे, मी जिंकून घेईन सारं या तिन्ही मालिकेचे संवाद लेखन करीत आहे.मुग्धा मूळची पुण्याची. विमलाबाई गरवारे शाळेतून तिचे शिक्षण झाले. शाळेत असताना अभ्यासासोबत तिने सहशालेय कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. तिने वयाच्या पाचव्या वर्षी गोष्ट सांगण्याच्या स्पर्धेत बक्षीस मिळवले होते. तेव्हा ती पहिलीत होती. नाटकात, वक्तृत्व स्पर्धेत तिने भाग घेतला होता, त्यामुळे तिची स्टेजवरील भीती नाहीशी झाली होती. पुढे तिने फर्ग्युसन कॉलेजमध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर तिने पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. ‘आम्ही खरंच निष्पाप होतो’ ही एकांकिका अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने लिहिली होती व बसवली होती. त्या एकांकिकेमध्ये मुग्धाने काम केले. पुढे तिने कामगार कल्याण स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेतला. परिचय, समन्वय संस्थांमधील नाटकांमध्ये तिने कामे केली. संतोष पवारांनी लिहिलेल्या नाटकांमध्ये तिने कामे केली. विजय तेंडुलकरांच्या नाटकातील भूमिकेसाठी तिला विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

तिचं ग्रॅज्युएशन झालं त्यावेळी दिग्दर्शक संगीत कुलकर्णी 'थरार' नावाची मालिका करण्यासाठी पुण्याला गेले होते. तेव्हा अल्फा मराठी नवीन चॅनेल आले होते. त्याचे सर्व युनिट शूटिंगसाठी पुण्याला आले होते, जयवंत वाडकर, यतीन कार्येकर आले होते; परंतु मुख्य भूमिका करणारी अभिनेत्री आली नव्हती, कोणीतरी मुग्धाचा रेफरन्स त्यांना दिला होता. मुग्धा त्यांना भेटली व त्या मालिकेसाठी तिची निवड झाली. ही मालिका तिच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरली. संपूर्ण युनिट तिच्याशी घरच्याप्रमाणे वागले. तिला कसलाही त्रास झाला नाही. तिने मनोरंजनाच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. ती मध्यवर्ती भूमिकेत होती. कॅमेरासमोर ती पहिल्यांदाच अभिनय करीत होती. साऱ्यांनी तिला सांभाळून घेतले. थरार मालिकेचे ३ ते ४ भाग झाले होते, एकदा ती आईवडिलांसोबत रात्री आईस्क्रीम खायला गेले असताना तिथे काही जण होते, ते त्यांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की आम्ही थरार मालिकेत तुम्हांला पाहिले आहे. खूप छान काम झाले आहे. ही प्रेक्षकांची प्रतिक्रिया तिच्यासाठी नवीन होती. प्रेक्षकांना तिचे काम आवडू लागले होते. त्या प्रतिक्रियेने ती सुखावली गेली व तिला तिच्या कामाचा अभिमान वाटला.



नंतर तिला दिग्दर्शक जब्बार पटेल, स्मिता तळवलकर यांनी डॉक्युमेंटरीसाठी बोलावले होते. संजय पवारने ‘पळसाला पाने पाच’ या मालिकेत काम करण्यासाठी बोलावले. त्या वेळी ई टी.व्ही.वर ती मालिका होती, त्याचे शूटिंग हैदराबादला रामोजी फिल्म सिटीमध्ये होणार होते. तिचे ग्रॅज्युएशन झाले होते, त्यामुळे तिने शिक्षणाला थोडा ब्रेक घेत अभिनयाच्या क्षेत्रात काम करण्याचे निश्चित केले. तिनेबी. एस्सी. केमिस्ट्री केले.तिने हैदराबादहून घरी पुण्याला फोन केला होता, तेव्हा तिला सांगण्यात आले की 'आभाळमाया' मालिकेसाठी बोलावले आहे, सुरुवातीला सुधा जोशीच्या मधल्या टप्प्याच्या भूमिकेसाठी बोलावले होते, परंतु ते काही जमले नाही. त्यावेळी तिची 'भूमिका' नावाची मालिका सुरू होती. आभाळमाया मालिकेत सुधाच्या पुढील टप्प्याचे काही महिन्यात शूटिंग होणार होते, त्या भूमिकेसाठी तिची निवड झाली. त्या वेळी काही कलावंत मुंबईला जायला निघत होते. त्यामध्ये मुग्धाने देखील मुंबई गाठली. आभाळमायाचे शूटिंग मुंबईत सुरु झाले होते. दिग्दर्शक विनय आपटेनी तिला मुंबईत काम करण्याचा सल्ला दिला, मुंबईत कोणताही वाईट अनुभव येणार नाही याची खात्री दिली. मंदार देवस्थळी तेव्हा एपिसोड दिग्दर्शन करायचा.




तेव्हा अल्फा गौरव पुरस्कार सुरू झाले होते. पहिल्या वर्षी ती मुंबईत नव्हती. दुसऱ्या वर्षी अल्फा गौरव जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मिळणार होता, त्याचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करीत होते. त्याच्यासोबत निवेदन करण्यासाठी मुग्धाला महत्त्वाची संधी मिळाली. नंतर म. टा. सन्मानसाठी श्रेयस तळपदे सोबत तिला सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. त्यानंतर देबू देवधर यांनी तिला ‘दौलत’ मालिकेसाठी बोलावले.तिचं लग्न झाल्यानंतर तिने अभिनयातून ब्रेक घेतला. तिला मुलगी झाली. मुलीला वेळ देण्यासाठी तिने घरी राहणे पसंत केले. २०१४ ला तिला मंदार देवस्थळीचा प्रोडक्शन मॅनेजर तेजाचा फोन आला, त्यांनी तिला लिखाणासाठी बोलावले. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेच्यासंवाद लिखाणासाठी तिला बोलावले गेले. मंदार देवस्थळीला तिच्याबद्दल आत्मविश्वास होता. मुग्धाची नवीन इनिंग सुरू झाली, तिने लेखनाची जबाबदारी स्वीकारली. या अगोदर तिने माहेर मासिकासाठी थोडं लिखाण केलं होतं.तिने ‘आई कुठे काय करत’, ‘अजूनही बरसात आहे' ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेसाठी लिखाण केले. सध्या ती ‘वीण दोघांतली ही तुटेना’, ‘सनई चौघडे’, ‘मी जिंकून घेईन सारं’ या मालिकेसाठी लिखाण करीत आहे. तिला मानाची लेखक संघटनेचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. ‘आर पार’ या यूट्युब चॅनेलसाठी ती मान्यवर व्यक्तीच्या मुलाखती घेत आहे.अशी चतुरस्त्र अभिनेत्रीची नाळ लिखाणाशी जोडलेली आहे. तिने लिहिलेल्या संवादातून मालिका रंजक, प्रेक्षणीय होत आहे.

Comments
Add Comment

रंगभूमीवरचं पहिलंवहिलं पाऊल...

प्रत्येक रंगकर्मी कधी ना कधी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकतोच आणि तिथून त्याचा नाट्यावकाशातला प्रवास सुरू होतो. पुढे

व्यावसायिकतेवर नव्या पिढीचे-शिक्कामोर्तब’

भालचंद्र कुबल-पाचवा वेद आत्ता कुठे नव्या पिढीचे, नव्या दमाचे मराठी दिग्दर्शक हळूहळू सावरून चालायचा प्रयत्न

अभिनयाचा मुसाफिर

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल  पंकज विष्णू सध्या अभिनयाच्या हिंदोळ्यावर झुलत आहे. ‘श्री बाबा नीब करोरी महाराज' या

कलावंतांच्या चौकडीचे पंचरंगी ‘शिक्कामोर्तब’

आयुष्यातली महत्त्वाची परीक्षा असो की महत्त्वाच्या ठिकाणी नोकरी असो; नवरा-बायकोचे नाते असो की कोर्ट केसचा निकाल

एका निरीक्षणाची प्रस्तावना

भालचंद्र कुबल-पाचवा वेद एकांकिका स्पर्धांना परीक्षक म्हणून काम करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रंगभूमीवरील

Entertainment : मनोरंजन विश्वात ऐन उन्हाळ्यात गारवा...

सध्या उष्णतेच्या लाटेमुळे सर्वत्र होरपळ सुरू असताना, मनोरंजनाच्या माध्यमातून चार घटका करमणूक करणाऱ्या