मराठवाडा हा एकेकाळी ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा असणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात होता आणि त्यामध्ये मराठवाड्यातील शिवसैनिकांचा मोठा वाटा होता. मात्र कालांतराने ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेला अनेक नेत्यांचा वर्ग त्यांच्यापासून दूर गेला.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा चांगलीच रंगली असून, मराठवाड्यातील घडामोडींमुळे या चर्चेला अधिक वेग आला. मराठवाड्यातील तीन खासदारांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने या प्रदेशातील ठाकरे गटाचा बालेकिल्ला ढासळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे तिघेही ठाकरे यांचे विश्वासू समर्थक मानले जात होते. मात्र, त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने मराठवाड्यात उबाठा पक्षाचे अस्तित्व कमकुवत झाल्याचे मानले जात आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर प्रतिकूल राजकीय परिस्थितीतही या तिन्ही खासदारांनी ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अखेर त्यांनी वेगळी भूमिका स्वीकारत बंडाचा झेंडा उभारला. विशेषतः धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची भूमिका राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. ते एकदा आमदार आणि दोनदा खासदार म्हणून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले.
TET Exam 2026 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) यंदा अधिक कडक नियमांसह घेतली जाणार आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेने ...
चार वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीतही त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उल्लेखनीय कामगिरी केली. मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांत विरोधी पक्षाचे आमदार असतानाही त्यांनी तब्बल ३ लाख २९ हजार मतांच्या विक्रमी आघाडीने विजय मिळविला. त्यामुळे मतदारसंघातील जनतेचा त्यांना भक्कम पाठिंबा असल्याचे सिद्ध झाले. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या राजे निंबाळकर यांनी यापूर्वी आपल्या जनाधाराच्या विरोधात जाण्याचा धोका पत्करलेला नव्हता. मात्र, विरोधी पक्षात राहून मतदारसंघाचा अपेक्षित विकास साधणे कठीण जात असल्याची भावना त्यांच्या निर्णयामागे कारणीभूत ठरल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहे. सत्तेच्या केंद्राशी जवळीक राखल्यास विकासकामांना गती देता येते आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावता येतात, हे राजकारणातील सर्वमान्य गणित मानले जाते. त्यामुळेच मतदारसंघाच्या विकासाला प्राधान्य देत ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी ठाकरे गटाशी फारकत घेतल्याची चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे.
नाशिक : जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त भागातील नागरिकांना नियमित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व ग्रामीण ...
मराठवाड्यातील ठाकरे समर्थक नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडू लागल्याने राज्यातील राजकारणाची समीकरणे बदलत गेली. यामागे उद्धव ठाकरे यांचे बिघडत गेलेले राजकीय गणित कारणीभूत असल्याची चर्चा मराठवाड्यात होत आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात पक्षांतर्गत बंडखोरी आणि पक्षांतराची परंपरा असल्याचे वारंवार दिसून आले. विद्यमान खासदार संजय जाधव यांनीही ही परंपरा कायम ठेवली आहे. १९८९ पासून परभणी जिल्ह्याने शिवसेनेला एक वेगळी राजकीय ओळख मिळवून दिली. मात्र यापूर्वी शिवसेनेचे खासदार राहिलेले दिवंगत अशोकराव देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे पाटील आणि गणेशराव दुधगावकर यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. या सर्व नेत्यांनी पुढे अन्य पक्षांमध्ये प्रवेश केला. त्याच पावलावर पाऊल ठेवत विद्यमान खासदार संजय जाधव यांनीदेखील उबाठा पक्षाची साथ सोडली. संजय जाधव यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर नगरसेवक, बाजार समितीचे सभापती आणि खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. २००९ आणि २०१४ मध्ये त्यांनी परभणी विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले. त्यानंतर २०१४ पासून ते परभणी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून सध्या त्यांची खासदारकीची तिसरी टर्म सुरू आहे. २०२२ मध्ये शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीला मोठा धक्का बसला.
त्या वेळी संजय जाधव हे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. मात्र महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले, तेव्हापासून संजय जाधव नाराज असल्याची चर्चा होती. अधूनमधून त्यांच्या पक्षांतराच्या चर्चाही मराठवाड्यात रंगत होत्या. सहा महिन्यांपासून संजय जाधव यांच्या भाषणांमधून तसेच उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकींना त्यांची अनुपस्थिती यामधून त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती. त्यांच्या पक्षांतराची चाहूल उद्धव ठाकरे यांना लागल्याने जाधव समर्थकांची पक्षातील उचलबांगडी करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर संजय जाधव यांनी आपले राजकीय ‘ऑपरेशन टायगर’अधिक वेगाने राबविल्याची चर्चा मराठवाड्यात सुरू झाली. परभणी जिल्ह्यात सातत्याने विविध उपक्रम राबवून आणि थेट जनतेशी संपर्क ठेवून काम करणारे नेते म्हणून संजय जाधव यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक राजकीय निर्णयाकडे जिल्ह्यातील जनतेचे आणि राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष असते.
मराठवाड्यातील हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी चार दिवसांपूर्वी मोठी पत्रकार परिषद घेऊन आपण ठाकरेंचेच समर्थक आहोत, अशी आरोळी ठोकली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचे सुपुत्र कृष्ण हे नशीब आजमावत आहेत. त्यामुळे या निवडणुकीचे निमित्त समोर करून उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे बोलावलेली बैठक टाळली व त्यांनी उबाठांसोबत व्हिडीओ कॉलवर चर्चा केल्याचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल केला. आपण किती एकनिष्ठ आहोत हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न आष्टीकर यांनी केला होता. हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा उबाठाचा बालेकिल्ला मानला जात होता. यापूर्वी या मतदारसंघात विलास गुंडेवार, शिवाजी माने, सुभाष वानखेडे, हेमंत पाटील यांनी शिवसेनेकडून प्रतिनिधित्व केले. यातील विलास गुंडेवार वगळता इतरांची खासदारकी गेल्यानंतर त्यांनी ठाकरेंची साथ सोडली. ज्यांनी साथ सोडली ते पुन्हा कधीच राजकारणात स्थिर झाले नाहीत, हा या हिंगोली जिल्ह्याचा इतिहास आहे. मराठवाड्यात गेल्या काही वर्षांत ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. शिंदे सेनेच्या रणनीतीमुळे उबाठाला धक्का बसल्याची चर्चा आहे. उबाठातील सहा खासदारांनी शिंदे गटाची साथ दिल्याचे सांगितले जाते, त्यात मराठवाड्यातील तीन खासदारांचा समावेश आहे. यामुळे मराठवाड्यात ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे. राजकीय बदलांमागे भाजपची भूमिका असल्याची चर्चा आहे. संबंधित खासदारांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली असून, त्यांच्या निर्णयावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.






