Friday, June 19, 2026

Nashik : पाणीसंकट गडद ! 67 गावांना दिलासा देणारी योजना अडचणीत; येवल्यात चार दिवसांआड पाणीपुरवठा

Nashik : पाणीसंकट गडद ! 67 गावांना दिलासा देणारी योजना अडचणीत; येवल्यात चार दिवसांआड पाणीपुरवठा

Nashik : येवला तालुक्यातील ५४ गावे आणि १३ संस्था अशा एकूण ६७ गावांची तहान भागवणारी व आशिया खंडात नावाजलेली '३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना' सध्या पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर आहे. बाभुळगाव येथील साठवण तलावातील पाणीसाठा झपाट्याने खाली गेल्याने, आगामी २० जूनपासून योजनेअंतर्गत सर्व गावांना आता चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर समितीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, योजनेच्या लाभार्थी ग्रामपंचायतींकडे तब्बल ९८ लाख रुपयांची पाणीपट्टी थकल्याने योजनेच्या आर्थिक अडचणीत भर पडली आहे.

४६ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा

योजनेच्या बाभुळगाव येथील मुख्य साठवण तलावात सध्या केवळ १६ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, तो पुढील ४६ दिवस पुरू शकतो. याच पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर एक विशेष आढावा बैठक पार पडली. या बैठकीला प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, माजी मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, मुख्याधिकारी तुषार आहेर, ३८ गाव पाणी योजना समितीचे अध्यक्ष सचिन कळमकर आणि सचिव उमेश सूर्यवंशी यांच्यासह महसूल व ग्रामविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चार दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन निश्चित करण्यात आले.

पाणी चोरी केल्यास थेट गुन्हे दाखल होणार

योजनेची २८४ किलोमीटर लांबीची मुख्य जलवाहिनी असून, त्यावर २५० एअरव्हाल्व्ह बसवण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे होणाऱ्या गळतीचे पाणी जनावरांना पिण्यासाठी वापरले जात असल्यास त्याला समितीने हरकत घेतलेली नाही. मात्र, कोणीही मुद्दाम एअरव्हाल्व्ह किंवा पाईपलाईनची तोडफोड करून पाणी चोरी करण्याचा किंवा पाण्याचा अपव्यय करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा कडक इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. नागरिकांनीही वाहने धुणे किंवा इतर कामांसाठी पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

थकबाकी भरा, अन्यथा योजना चालवणे कठीण

मे २०२६ अखेरपर्यंत या योजनेतील गावांकडे सुमारे ९८ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. योजनेचे वीजबिल आणि पाणी आरक्षणाचे पैसे वेळेवर भरावे लागत असल्याने, ग्रामपंचायतींनी आपली पाणीपट्टी त्वरित भरून सहकार्य करावे, असे आवाहन योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर आणि उपाध्यक्ष मोहन शेलार यांनी केले आहे.

३८ गाव पाणी योजना' : एका नजरेत

एकूण लाभार्थी : ६७ (५४ गावे + १३ संस्था)

एकूण लोकसंख्या : १,२९,७५९

साठवण तलावातील एकूण साठा : १८.२३ दशलक्ष घनफूट

सध्याचा उपयुक्त साठा : १६ दशलक्ष घनफूट

पाणी पुरणारे अंदाजित दिवस : ४६ दिवस

वितरण पाईपलाईनचे जाळे : २८४ किलोमीटर

मे २०२६ अखेर एकूण थकबाकी : ९८ लाख रुपये

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा