Friday, June 19, 2026

PM Narendra Modi : भारत-फ्रान्स संबंध अधिक मजबूत; पॅरिसमध्ये PM मोदींचे मोठे वक्तव्य

PM Narendra Modi : भारत-फ्रान्स संबंध अधिक मजबूत; पॅरिसमध्ये PM मोदींचे मोठे वक्तव्य

पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी फ्रान्स (France) दौऱ्यादरम्यान पॅरिस (Paris) येथे भारतीय समुदायाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत आणि फ्रान्समधील वाढत्या संबंधांबाबत तसेच गेल्या १२ वर्षांत भारताने केलेल्या प्रगतीबाबत माहिती दिली. फ्रान्समध्ये राहणाऱ्या भारतीयांनी दोन्ही देशांमधील मैत्री अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय समुदायाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, पॅरिस हे कला, नवकल्पना आणि सर्जनशीलतेचे शहर आहे. मात्र येथे राहणारे भारतीय या शहराचे सौंदर्य आणि विविधता आणखी वाढवतात. फ्रान्समध्ये राहणाऱ्या भारतीयांनी भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध अधिक दृढ केले असून हीच दोन्ही देशांच्या भागीदारीची मोठी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या कार्यकाळाला नुकतीच १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात भारताने अनेक क्षेत्रांमध्ये मोठी झेप घेतली आहे. देशाची अर्थव्यवस्था दुपटीने वाढली असून विमानतळ, विद्यापीठे आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महामार्ग बांधकामाचा वेग वाढला असून मेट्रो नेटवर्कही अनेक पटींनी विस्तारले आहे.

नरेंद्र मोदी यांनी भारतातील युवक, महिला आणि शेतकरी यांच्याही योगदानाचा उल्लेख केला. आजचा युवा मोठी स्वप्ने पाहत आहे, महिला विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्व करत आहेत आणि शेतकरी नव्या संधींचा लाभ घेत पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या काही वर्षांत कोट्यवधी नागरिक गरिबीतून बाहेर आले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा अधिक मजबूत होत असल्याचे सांगताना मोदी म्हणाले की, आज जगाला विश्वासार्ह भागीदारांची गरज आहे. व्यापारासोबतच विश्वासालाही तितकेच महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत भारत हा स्थिर, विश्वासार्ह आणि दीर्घकालीन भागीदारीसाठी सक्षम देश म्हणून जगासमोर उदयास येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >