Thursday, June 18, 2026

Operation Tiger in BMC : मुंबई महापालिकेतही लवकरच ऑपरेशन टायगर

Operation Tiger in BMC : मुंबई महापालिकेतही लवकरच ऑपरेशन टायगर

- तब्बल २१ नगरसेवक टप्प्यात?

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

उबाठाचे सहा खासदार फुटल्यानंतर याचे पडसाद आता मुंबईतील आमदार आणि नगरसेवकांमध्ये उमटू लागले आहेत. त्यामध्ये एकप्रकारची अस्थिरता नगरसेवकांमध्ये निर्माण झाली असून विशेषत: ईशान्य मुंबईतील नगरसेवकांमध्येच ही अस्थिरता स्पष्ट दिसून येत होती. मात्र, या ऑपरेश टायगरच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतील उबाठाचे तब्बल २१ हून अधिक नगरसेवक शिवसेना आणि भाजपच्या संपर्कात असल्याची दबक्या आवाजात चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ऑपरेशन टायगरची झलक मुंबई महापालिकेतही पहायला मिळणार आहे. त्यामुळे उबाठा आपल्या नगरसेवकांना कशाप्रकारे वाचवतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Operation Tiger in BMC)

मुंबई महापालिकेत उबाठाचे ६५ नगरसेवक असून विरोधी पक्षात असूनही त्यांचे महापालिकेत काही चालत नाही. उबाठाकडे विरोधी पक्षानेता पद आहे. परंतु विरोधी पक्षाची भूमिका सध्या उबाठा ऐवजी काँग्रेसच अधिकपणे मांडताना दिसत आहे. मात्र,उबाठाच्या एकूण ९ खासदारांपैंकी सहा खासदार फुटल्याने ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा आहे. या सहा खासदारांपैकी एक खासदार हे ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील हे आहेत. पाटील यांची कन्या राजुल पाटील ११४मधून विजयी होत नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत. परंतु या ऑपरेशन टायगर नंतर राजुल पाटील या बुधवारी पडलेल्या महापालिका सभेला गैरहजर राहिल्या. (Operation Tiger in BMC)

या ईशान्य मुंबईमध्ये भाजपचे १५ नगरसेवक आहेत, तर उबाठाचे ११ आणि शिवसेनेचे ०४, एमआयएमचे सहा तसेच इतर दोन अशाप्रकारे नगरसेवक संख्या आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईतील ११ नगरसेवकांवर संशयाची नजर फिरु लागली असून यातील एका नगरसेवकाचे सदस्यत्व जातप्रमाणपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरवले गेले आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरच महापालिका घेणार आहे. मात्र, ईशान्य मुंबईसोबतच संपूर्ण मुंबईतील उबाठाचे २१ पेक्षा अधिक नगरसेवक भाजप आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. येत्या १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन असून या दिवशी ऑपरेशन टायगरचा विस्तार मोठ्याप्रमाणात होण्याची शक्यता आहे. उबाठाचे काही नगरसेवक भाजप आणि शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये याचा परिणाम दिसून येईल असेही बोलले जात आहे. उबाठाच्या नगरसेवकांना निधी मिळालेला नसून निधी शिवाय कामे करणे नगरसेवकांना शक्य होत नाही. त्यामुळे काही नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असून काही नगरसेवक हे शिवसेनेत जाण्यास तयार नाहीत त्यांना भाजपात सामावून घेतले जाईल असेही बोलले जात आहे. त्यामुळे खासदारांनंतर आमदारांचे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात नगरसेवकांचे मिशन पूर्ण केले जाईल असेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे उबाठाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ज्याला जायचे त्यांनी खुशाल जावे असे म्हटले आहे, त्यामुळे उबाठाचे काही नगरसेवकही नाराज झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेत जाण्याच्या तयारीत काही नगरसेवक असून याचा परिणाम दिसून असेही दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे. (Operation Tiger in BMC)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा