Monday, August 17, 2026

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे जिओच्या अधिकाऱ्यांना निर्देश

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे जिओच्या अधिकाऱ्यांना निर्देश

नव्या टॉवर्ससह सेवा सक्षम करण्यावर भर

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम भाग आणि पर्यटन स्थळांवर सातत्याने जाणवणाऱ्या मोबाईल नेटवर्क तसेच इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्यांवर आता कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत रिलायन्स जिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन जिल्ह्यातील डिजिटल पायाभूत सुविधा तातडीने सक्षम करण्याचे निर्देश दिले.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या ‘सुवर्णगड’ या शासकीय निवासस्थानी ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील नेटवर्कची सद्यस्थिती, कॉल ड्रॉप्स, इंटरनेटचा मंद वेग आणि भविष्यातील वाढत्या डिजिटल गरजांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सिंधुदुर्गातील ज्या-ज्या भागात नागरिकांना आणि पर्यटकांना नेटवर्कची अडचण भासत आहे, तेथे तातडीने नवीन मोबाईल टॉवर्स उभारण्यात यावेत, अशी मागणी पालकमंत्र्यांनी या वेळी केली.

जिल्ह्याची विशिष्ट भौगोलिक रचना, डोंगरी भाग आणि सागरी किनारपट्टी लक्षात घेऊन नेटवर्क सेवेची क्षमता वाढवण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आणि दूरवरच्या गावांना दर्जेदार इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळावी, यासाठी आवश्यक त्या सर्व तांत्रिक उपाययोजना करण्याचे निर्देश नितेश राणे यांनी कंपनी प्रशासनाला दिले. या बैठकीस रिलायन्स जिओचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सुनील गोसावी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी राजीव अमिदवार उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >