Tuesday, June 16, 2026

Gold-Silver Price Today : सोनं-चांदी आणखी महागणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या आजचे नवे दर

Gold-Silver Price Today : सोनं-चांदी आणखी महागणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या आजचे नवे दर

मुंबई : सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या बेस इम्पोर्ट प्राइस (आयात मूल्य) मध्ये वाढ केली असून त्याचा परिणाम आगामी काळात बाजारभावांवर दिसून येण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे मौल्यवान धातूंच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Gold-Silver Price Today)

सरकारने सोन्याच्या आयात मूल्यामध्ये प्रति १० ग्रॅम ५ डॉलरची वाढ केली आहे. त्यानुसार सोन्याचा बेस इम्पोर्ट प्राइस आता १,३४८ डॉलर प्रति १० ग्रॅम झाला आहे. दुसरीकडे, चांदीच्या आयात मूल्यामध्ये प्रति किलो ८३ डॉलरची वाढ करण्यात आली असून त्याचा दर २,१७५ डॉलर प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांपूर्वीच सरकारने सोन्याच्या आयात मूल्यामध्ये ८० डॉलर आणि चांदीच्या आयात मूल्यामध्ये २७६ डॉलरची कपात केली होती. मात्र आता अचानक करण्यात आलेल्या वाढीमुळे बाजारात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Gold-Silver Price Today)

जाणून घ्या सोन्या-चांदीचा नवीन भाव :

मंगळवार १६ जून २०२६ रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५१,५३० रुपये, २२ कॅरेटसाठी १,३८,९०० रुपये आणि १८ कॅरेटसाठी १,१३,६५० रुपये इतका आहे. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५१,६८० रुपये असून चेन्नईमध्ये तो सर्वाधिक १,५३,४९० रुपये प्रति १० ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,५१,५६० रुपये, २२ कॅरेटचा १,३८,९३० रुपये आणि १८ कॅरेटचा १,१३,६८० रुपये इतका आहे. (Gold-Silver Price Today)

चांदीच्या दरातही वाढ कायम आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, नागपूर आणि नाशिकमध्ये एक किलो चांदीचा भाव २,६५,००० रुपये इतका आहे. तर चेन्नई, हैदराबाद, केरळ आणि कटकमध्ये चांदीचा दर २,८०,००० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. (Gold-Silver Price Today)

दरम्यान, परकीय चलन साठा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि व्यापार तूट नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने सोने-चांदीच्या आयात नियमांमध्येही काही महत्त्वाचे बदल केले आहेत. ९९.९ टक्के किंवा त्याहून अधिक शुद्धतेच्या चांदीला ‘फ्री’ श्रेणीतून काढून ‘प्रतिबंधित’ श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच सोने आणि चांदीवरील आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. (Gold-Silver Price Today)

नव्या नियमांनुसार, चांदीची आयात आता केवळ अधिकृत बँका किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मंजुरी मिळालेल्या संस्थांमार्फतच करता येणार आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलरच्या विनिमय दरातील बदल आणि सरकारच्या आयात धोरणांमुळे आगामी काळात सोने-चांदीच्या दरांमध्ये आणखी चढ-उतार होऊ शकतात. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांनी खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी बाजारातील ताज्या दरांची माहिती घेणे आणि योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. (Gold-Silver Price Today)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >