सिंधुदुर्ग जागतिक पर्यटन केंद्राच्या दिशेने

कोकण ही केवळ भौगोलिक ओळख नाही, तर निसर्ग, इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म यांचा संगम आहे. समुद्रकिनारे, किल्ले, कातळशिल्पे, मालवणी संस्कृती आणि समृद्ध परंपरा यांचा अमूल्य ठेवा लाभलेल्या या भूमीला विकासाच्या अनेक संधी उपलब्ध आहे. जागतिक पर्यटन स्थळाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यासमोर विकासाची नवी दारे खुली झाली आहेत.


कोकणाला निसर्गाची अनमोल देणगी लाभली आहे. इतिहासाचा समृद्ध वारसा, कातळशिल्पांचा अद्वितीय ठेवा, मालवणी संस्कृतीची रंगत, तसेच अध्यात्म आणि सांस्कृतिक परंपरांची झळाळी या सर्व गोष्टींनी हा प्रदेश समृद्ध झाला आहे. निसर्गाने इतके भरभरून दिलेले असतानाही या संपत्तीचा पर्यटन विकासासाठी अपेक्षित आणि नियोजनबद्ध वापर आजवर झालेला दिसत नाही. मात्र, या सहज सुंदर नैसर्गिक वैभवाच्या बळावर कोकणातील पर्यटन उद्योग अधिक व्यापक आणि दर्जेदार पद्धतीने विकसित करण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ घडविण्याच्या उपक्रमामुळे कोकणासाठी, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी, विकासाच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या आहे. आगामी काळात शासनाच्या माध्यमातून अनेक सुविधा, प्रकल्प आणि गुंतवणुकीच्या संधी या भागात उपलब्ध होणार आहे.



त्यांचा योग्य आणि दूरदृष्टीने लाभ घेण्यासाठी स्थानिक नागरिक, उद्योजक आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यथा, ही सुवर्णसंधी गमावणे हा आपलाच दूरदृष्टीचा अभाव ठरेल. नुकतीच दिल्लीत झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत २०४७ पर्यंतच्या भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा आराखडा चर्चिला गेला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक राज्य – एक जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ’ या संकल्पनेअंतर्गत महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि नाशिक या जिल्ह्यांचा पर्यटनदृष्ट्या विशेष विकास करण्याचा कृती आराखडा सादर केला. खरे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करून जवळपास तीन दशके उलटली आहेत. १९९७ मध्ये हा दर्जा मिळाल्यानंतरही जिल्ह्यातील पर्यटन विकासाला अपेक्षित गती मिळालेली नाही. त्यामुळे आता मिळालेली ही नवी संधी केवळ घोषणांपुरती न राहता प्रत्यक्ष विकासकामांमध्ये रूपांतरित होणे गरजेचे आहे. सिंधुदुर्गच्या नैसर्गिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संपदेचे जतन करत शाश्वत पर्यटनाचा आदर्श निर्माण करण्याची हीच योग्य वेळ आहे.



कोकणातील नैसर्गिक सौंदर्याचा योग्य आणि शाश्वत पद्धतीने वापर करून पर्यटन विकासाला चालना मिळत असेल, तर ते निश्चितच स्वागतार्ह आहे. आजवर एका मर्यादित चौकटीत असलेले कोकण पर्यटन आता खऱ्या अर्थाने विस्तारत असून देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनत आहे. कोकण पर्यटन जागतिक नकाशावर आपली ओळख निर्माण करताना त्याचा लाभ केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच नव्हे, तर रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांनाही होणार आहे. निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा दृष्टीकोन स्पष्ट करण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप मांडताना पर्यटन क्षेत्र राज्याच्या तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी देऊ शकते, यावर भर देण्यात आला. जगभरात पर्यटन उद्योग हा आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीचा प्रभावी स्रोत मानला जात असून अनेक देश पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी साधण्याचा प्रयत्न करत आहे. गोवा राज्याच्या सीमेलगत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पर्यटन व्यवसायात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्येही पर्यटन क्षेत्राचा विस्तार होताना दिसत आहे. कोकणातील निसर्गसंपदा, समुद्रकिनारे, ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये यामुळे या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पर्यटनाच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या.


मात्र, पर्यटन व्यवसाय वाढत असतानाही कोकणातील अनेक पर्यटनस्थळांवर आजही पायाभूत सुविधांची कमतरता जाणवते. दर्जेदार रस्ते, पुरेशी पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पर्यटकांसाठी माहिती केंद्रे तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा अनेक ठिकाणी अपुऱ्या आहेत. त्यामुळे पर्यटन विकासाचा वेग अपेक्षित प्रमाणात वाढू शकलेला नाही. याउलट, गोवा राज्याने पर्यटन व्यवसायाला सुरुवातीपासूनच मोठे महत्त्व आणि प्राधान्य दिले. तेथे पर्यटनासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, निवास व्यवस्था आणि पर्यटनपूरक धोरणे प्रभावीपणे राबविण्यात आली. त्यामुळे गोवा जागतिक स्तरावरील लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाला. कोकणातील पर्यटनाचा शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साधायचा असेल, तर शासनाने पायाभूत सुविधांच्या उभारणीवर विशेष भर देणे आवश्यक आहे. तसेच पर्यावरणाचा समतोल राखत स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे पर्यटन मॉडेल विकसित करणे ही काळाची गरज आहे. योग्य नियोजन, आवश्यक गुंतवणूक आणि प्रभावी अंमलबजावणी यांमुळे कोकण भविष्यात देशातीलच नव्हे तर जगातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून उदयास येऊ शकते.



गोव्याचे अर्थकारण मोठ्या प्रमाणावर पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. जगभरातील पर्यटक गोव्यात यावेत, त्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्या आणि त्यांचा मुक्काम सुखकर व्हावा यासाठी गोवा सरकारने सातत्याने आवश्यक पायाभूत सुविधा उभारल्या. त्याचाच परिणाम म्हणून गोव्याचा पर्यटन उद्योग आज देशातील सर्वाधिक यशस्वी पर्यटन मॉडेलपैकी एक ठरले. याउलट, महाराष्ट्रातील अनेक सत्ताधाऱ्यांनी कोकणातील पर्यटन क्षेत्र राज्याच्या अर्थव्यवस्थेला आणि महसुलाला किती मोठा हातभार लावू शकते, याचा पुरेसा गांभीर्याने विचार केला नाही. यामागे विविध कारणे असली तरी कोकणाकडे पाहण्याचा संकुचित दृष्टिकोन हे त्यातील एक महत्त्वाचे कारण मानावे लागेल. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने ‘एक राज्य, एक जागतिक पर्यटन स्थळ’ या संकल्पनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केली. नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि समुद्रकिनाऱ्यांची समृद्धी यामुळे सिंधुदुर्गला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची क्षमता आधीपासूनच आहे.


या उपक्रमाअंतर्गत अनेक महत्त्वाचे प्रकल्प आकार घेत आहे. कोकणातील पहिले अंडरवॉटर म्युझियम निवती रॉक येथे उभारले जात असून, त्याचा पर्यटन व्यवसायाला मोठा फायदा होणार आहे. तसेच सिंधुदुर्गमधील विमानसेवेला अधिक बळ देत कोकणातील हवाई संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे नियोजन करण्यात आले. यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना कोकणात पोहोचणे अधिक सुलभ होईल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे संवर्धन करून पर्यटन अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. कोकणातील पर्यटन विकासाला आता खऱ्या अर्थाने गती मिळण्याची अपेक्षा आहे. जागतिक पर्यटनस्थळांच्या निकषांनुसार विकास होत असताना सिंधुदुर्गसाठी आवश्यक निधी आणि पायाभूत सुविधांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटन विकासाच्या व्यापक आराखड्यात सिंधुदुर्गचा समावेश हा केवळ जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण कोकणाच्या विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.


____संतोष वायंगणकर

 
Comments
Add Comment

बेस्ट-एसटी संघर्ष गडद

मुंबई आणि महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आर्थिक व प्रशासकीय तणावाखाली आहे. दोन्ही संस्थांमध्ये

दुर्घटनेचे गूढ कायम

बोईंगचे फ्लाइट १७१ सुमारे २६० प्रवाशांना घेऊन आकाशात झेपावले; मात्र काही क्षणांतच ते कोसळले. या भीषण दुर्घटनेत

सामूहिक शेती गरजेची

ग्रामीण भागातील वाढते स्थलांतर, शेतीकडे होणारे दुर्लक्ष आणि ओसाड पडणाऱ्या सुपीक जमिनी ही चिंतेची बाब बनली आहे.

विदर्भात महायुतीचीच आघाडी

महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील १७ जागांसाठी निवडणूक

कोणाला घाई आहे?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली

भारताचे नवे स्टील धोरण

रेल्वेपासून महामार्ग, बंदरे, मेट्रो, संरक्षण, ऊर्जा आणि गृहनिर्माणापर्यंत सर्वच पायाभूत क्षेत्रांचा पाया