Monday, June 15, 2026

Sakshaym Tate Murder Case : त्याने माझ्यासोबत नको ते.....; सक्षम ताटेच्या प्रकरणात वेगळे वळण

Sakshaym Tate Murder Case : त्याने माझ्यासोबत नको ते.....; सक्षम ताटेच्या प्रकरणात वेगळे वळण

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) गेल्या वर्षी घडलेल्या सक्षम ताटे (Sakshaym Tate Murder Case) ऑनर किलिंग प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. सक्षमच्या हत्येनंतर त्याच्या मृतदेहाशी विवाह करून चर्चेत आलेली आंचल आता सक्षमचे घर सोडून परत गेली असून तिने सक्षमच्या भावावर गंभीर आरोप केले आहेत.

२५ नोव्हेंबर रोजी आंतरजातीय प्रेमसंबंधातून १९ वर्षीय सक्षम ताटेची निर्घृण हत्या करण्यात आली होती. मुलीच्या वडिलांनी आणि भावांनी लग्नाची चर्चा करण्याच्या बहाण्याने सक्षमला घरी बोलावून गोळ्या झाडत त्याची हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते.

सक्षमच्या मृत्यूनंतर आंचलने त्याच्या मृतदेहाशी विवाह करून न्यायाची मागणी केली होती. तसेच ती सक्षमच्या कुटुंबासोबतच राहणार असल्याचेही तिने जाहीर केले होते. मात्र काही महिन्यांनंतर ती अचानक ते घर सोडून गेल्याने चर्चांना उधाण आले.

यापूर्वी सक्षमच्या आईने, आजी आजारी असल्याचे कारण सांगून आंचल घरातून गेली आणि परत आली नाही, असा दावा केला होता. तसेच या धक्क्यामुळे सक्षमच्या वडिलांचेही निधन झाल्याचे सांगितले होते.

मात्र आंचलने हे सर्व दावे फेटाळून लावत सक्षमच्या भावावर गंभीर आरोप केले आहेत. "मी प्रामाणिकपणे त्या घरात राहण्यासाठी गेले होते. सक्षमसोबतचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र सक्षमचा भाऊ माझ्याशी अयोग्य वर्तन करत होता. तो मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता. याबाबत मी कुटुंबीयांना सांगितले, पण कुणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही," असा आरोप आंचलने केला.

तिने पुढे सांगितले की, "जेव्हा एवढ्या गंभीर गोष्टीवरही माझ्यावर विश्वास ठेवला जात नव्हता, तेव्हा भविष्यात काही घडले असते तरी माझी बाजू कोणी ऐकली नसती. त्यामुळेच मी ते घर सोडण्याचा निर्णय घेतला. मी कोणाच्या दबावाखाली नाही. मी सज्ञान असून माझे निर्णय स्वतः घेऊ शकते."

आंचलने दावा केला की, पोलिसांनाही संपूर्ण प्रकाराची माहिती होती आणि त्यांच्या मदतीनेच तिला तिच्या आजीकडे सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले.

या नव्या आरोपांमुळे सक्षम ताटे हत्याकांड पुन्हा एकदा चर्चेत आले असून प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >