Saturday, June 13, 2026

शाळेचा पहिला दिवस

शाळेचा पहिला दिवस

स्मृतीगंध - लता गुठे शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत जाणारी छोटी-छोटी मुलं पाहिली आणि मला शाळेचा पहिला दिवस आठवला. आजही त्या दिवसाची आठवण झाली की मन नकळत बालपणाच्या गोड विश्वात हरवून जाते. शाळेचा पहिला दिवस ज्याला शाळा, अभ्यास आवडतो त्यांच्यासाठी अतिशय उत्सुकता निर्माण करणारा आणि ज्याला शाळा आवडत नाही त्यांच्यासाठी नकोसा वाटणारा प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा शाळेतील पहिला दिवस. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्या दिवसाचे वेध लागतात. शाळा सुरू व्हायच्या आधीच आठ दिवस पालकांची तयारी सुरू होते. वह्या, पुस्तकं, शाळेचे सामान, दप्तर, गणवेश अगदी वाटर बॉटल आणि टिफिन बॉक्ससहित मुलांना नवीन हवे असते आणि पालकही आता हौसेने घेऊन देतात. वह्या, पुस्तकं आणली की त्यांना कव्हर लावा, त्याला स्टिकर्स चिटकवा ही आईची कामे सुरू होतात आणि एकदाचा शाळेचा पहिला दिवस उजाडतो. मुलं नवीन गणवेश घालून तयार होतात. नवीन दप्तरात नवीन पुस्तकं, वह्या, पेन, पेन्सिल हे आठवणीने टाकलं आहे का आई चार-चारदा तपासून पाहते. खरं तर मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत जायचं जीवावरच येतं; परंतु शाळेत गेल्याशिवाय पर्याय नसतो. शाळेतून मुलं घरी आली की त्यांना किती बोलू आणि किती नको असं होतं; परंतु त्यांचं ऐकायला कोणालाच वेळ नसतो, प्रत्येक जण मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. मला शाळेचे पहिले दिवस आजही आठवतात. एक पहिलीचा आणि दुसरा पाचवीचा. त्यावेळी म्हणजे ऐंशीच्या दशकात ग्रामीण भागांमध्ये आताच्यासारखे मुलांच्या शाळेचे घरच्यांना अजिबात कौतुक नसायचे; परंतु मला खूप उत्सुकता असायची. आपण आता वरच्या वर्गात जाणार याची एक वेगळीच मजा असायची. एका वर्षांनी मोठे झालो याचा सार्थ अभिमान वाटायचा.दोन महिने उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी राहून कंटाळा यायचा. त्यामुळे कधी एकदाची शाळा सुरू होते असे वाटायचे. मराठी शाळेतील पहिलीचा शाळेचा पहिला दिवस अजूनही आठवतो. शाळा सकाळी ७ वाजता असल्यामुळे आदल्या दिवशी रात्रीच आईकडून वेणी घालून घेतली आणि केस विस्कटू नयेत म्हणून कपड्याने डोके बांधून झोपायचे. दुसऱ्या दिवशी सकाळीच एरवीच्यापेक्षा लवकर जाग आली. हात-पाय, तोंड धुवून जरा व्यवस्थित असलेले कपडे घालून सर्वांच्या आधी शाळेसाठी तयार झाले. आदल्या दिवशी बॅग, पाटी, पेन्सिल एखादे पुस्तक त्यामध्ये ठेवून दप्तर तयार केले. त्या वेळेला आमची शाळा मारवाड्याच्या वाड्यामध्ये भरत असे. आमचे तुळशीराम गुरुजी अतिशय प्रेमळ असल्यामुळे त्यांनी सर्व मुलांच्या अंगावरून हात फिरवले. अतिशय प्रेमाने जवळ घेऊन विचारपूस केली. त्यामुळे शाळेची आणि गुरुजींची मनातून भीती नाहीशी झाली. शाळेत प्रार्थनेने पहिल्या दिवसाची सुरुवात झाली. नंतर गुरुजींनी सर्वांची ओळख करून द्यायला सांगितले. एकाएकाने समोर जाऊन हात बांधून आपले नाव सांगितले. काही घाबरलेली मुलं त्यांचं नाव विसरले. काहींनी ततमम करत आपले नाव सांगितले. नंतर गुरुजींनी छान हातात हात घेऊन नवीन कोऱ्या पाटीवर श्री गणेशा गिरवून घेतला. दोन-तीन वर्ग एकत्रच बसवल्यामुळे गुरुजींनी फळ्यावर बाराखडी उजळणी लिहून दिली आणि सर्वांनाच उजळणी, बाराखडी लिहायला सांगितली. मांडी घालून एका जागेवर बसायची सवय नसल्यामुळे पहिल्या दिवशी शाळेत बसूनही कंटाळा आला, कधी एकदाची शाळा सुटते असं झालं. शाळेची घंटा वाजली की पिशवीत पुस्तक, पाटी भरून पिशवी अडकून रांगेत उभे राहून एकापाठोपाठ एक गुरुजींनी वर्गाच्या बाहेर सोडले. अशाप्रकारे तो शाळेचा पहिला दिवस एक अविस्मरणीय दिवस ठरला. कारण शाळेची तोंड ओळख त्या दिवशी झाली. मग त्याच वस्तीत पहिली ते चौथी प्राथमिक शाळा पार पडली. यानंतर चौथीतून पाचवीत कधी एकदा जाईल असे झाले होते. मोठ्या भावंडाकडून हायस्कूलविषयी आधीच माहिती मिळाली होती.हायस्कूलला गेल्यानंतर सगळंच बदललेलं असणार. शाळेत बसायला बेंच, वेगवेगळ्या तासाला येणारे वेगवेगळे शिक्षक आमच्या गावी हायस्कूल असल्यामुळे आजूबाजूच्या शेजारच्या गावाचे नवीन मुलं-मुली प्रवेश घ्यायचे त्यामुळे नवीन मित्र-मैत्रिणी भेटणार. असं बरंच काही कल्पनेत असल्यामुळे पाचवीच्या पहिल्या दिवसाची उत्सुकता निर्माण झाली. हायस्कूलपासून गणवेश असल्यामुळे सर्व मुलं-मुली एकाच गणवेशात पाहायलाही छान वाटायचं. खरोखर आपण आता मोठे झालो आहोत याची जाणीव झाली. मला अजूनही पाचवीतील शाळेचा पहिला दिवस आठवतो. आधीच दोन-तीन दिवस एक छान कपड्याची बॅग शिवून घेतली. चौथीच्या वह्यांची कोरी राहिलेली पाने काढून रफ वही बनवली. एक पेन मात्र नवीन घेतला. त्या वेळेला साईचा पेन वापरणे सक्तीचे होते, त्याबरोबर साईची दौंत किंवा दुकानातून पाच पैशात शाई भरून मिळायची. साईच्या पेनामुळे हस्ताक्षर सुधारते असा समज होता; परंतु शाई इकडे तिकडे लागायची त्यामुळे हात, बॅग, कपडे यावर निळे डाग पडायचे. ते डाग काढता काढता नाकी नऊ यायचे . शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आदल्या रात्री मनात विचार यायला लागले. प्रत्येक तासाला नवीन शिक्षक, नवीन बसायला बेंच, नवीन मित्र-मैत्रिणी भेटणार. पहिल्या दिवशी शाळेत जाऊन पहिला बेंच पकडायचा ही मनात जिद्द निर्माण झाली. एकदाचा शाळेचा पहिला दिवस उजाडला आणि हायस्कूलची शाळा भरण्याची वेळ सकाळी अकराची असल्यामुळे काही गडबड नाही म्हणून आरामात आवरले तरी वेळ काही केल्या जाईना. १०.३० वाजता शाळेत जाऊन पोहोचले तेव्हा फक्त शिपाई आलेला होता.पहिल्या दिवशी शाळेत फारशे काही उत्साहाचे वातावरण नव्हते. एक एक करून दहा-बारा मुलं काही गावातले दोन-तीन परगावचे मुलं येऊन बसले. त्यातील फक्त दोन मुलं गणवेशात होती. शिक्षकांनी वर्गात येऊन हजेरी घेतली आणि प्रत्येकाची ओळख परेड सुरू झाली आणि सरांनी पाढे लिहायला सांगितले. नंतर एका पाठोपाठ एक तास त्यामध्ये गप्पा, गाणी, खेळ, ड्रॉईंग असेच झाले. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय ठरला. आज अनेक वर्षांनंतरही शाळेचा पहिला दिवस आठवला की मन आनंदाने भरून येते. जीवनाच्या प्रवासात ज्ञानाच्या मंदिरात टाकलेले ते पहिले पाऊल माझ्या आयुष्याला दिशा देणारे ठरले. त्या निरागस आठवणी आजही मनात ताज्या आहेत.

Comments
Add Comment