महाभारतातील मोतीकण-भालचंद्र ठोंबरे श्री मद्भागवत व विष्णुपुराणात वर्णन केल्यानुसार पावसाळा संपून शरद ऋतूला सुरुवात झाली होती. सगळीकडे उत्साह व आनंदी वातावरण होते. इंद्रदेव हा पावसाचा अधिपती असून त्याच्यामुळे पाऊस पडून जीवनावश्यक गोष्टी प्राप्त होतात. यामुळे व्रजवासी इंद्राचा उत्सव दरवर्षी साजरा करीत असत तो याही वर्षी साजरा करण्याची तयारी करू लागले. हे पाहून भगवान बाल श्रीकृष्णानी हा उत्सव कशासाठी व ही तयारी कशाची आहे म्हणून पिता नंदाला विचारले. पावसामुळे आपली शेती पिकते. आपल्याला अन्नधान्य मिळते. पाऊस ढगांमुळे पडतो व इंद्र पावसाचा अधिपती आहे. म्हणून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी हा उत्सव साजरा करतात असे कृष्णाला नंदाने सांगितले. हे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, “पिताजी, आपण पशुपालक आहोत. पशुपालन हा आपला व्यवसाय आहे त्यामुळे गाय हेच आपले दैवत आहे. त्यांचेच पूजन आपण करावे तसेच पर्वतामुळे गाईंना अन्नधान्य मिळते त्यामुळे पर्वत पूजन करून आपण उत्सव साजरा करू. सर्वांना कृष्णाचे म्हणणे पटले. यांनी इंद्रपूजन न करता गिरी यज्ञ करून पर्वताची पूजा केली तसेच गाय व पर्वतांना प्रदक्षिणा केली.आपल्यासाठी करण्यात येणारा यज्ञ गोकुळवासीयांनी न करून पर्वतासाठी केल्याचे पाहून इंद्राला अत्यंत राग आला. तू स्वतःलाच त्र्यैलोक्याचा स्वामी समजत असे. त्याचा अहंकार दुखावल्या गेला. त्याने व्रजवस्तीवर मुसळधार वर्षाव करण्याची आज्ञा ढगांच्या सांवर्तक नावाच्या गणाला दिली व तो स्वतःही ऐरावतावर बसून ढगांना पाणी पुरवू लागला. मोठमोठ्या मेघगर्जनांसह वस्तीवर मुसळधार पाऊस पडू लागला. सर्व जनजीवन विस्कळीत झाले. गुरे-ढोरे आपल्या लहान वासरांना पोटाखाली घेऊन मोठमोठ्याने हंबरू लागले, तर इतक्या वर्षात असा भयंकर पाऊस न पाहिलेले सगळे गोकुळवासी भयभीत झाले. तेव्हा कृष्णाने संपूर्ण गोवर्धन पर्वत उचलून आपल्या करंगळीवर तोलून धरला व सर्वांना आपल्या मुलाबांसह, गुराढोरांसह पर्वताखाली येण्याचे सांगितले. चौताळलेल्या इंद्राने सतत सात दिवस सात रात्री ढगांच्या माध्यमातून गोकुळावर पाऊस व गारांचा सतत भयंकर वर्षाव केला; परंतु सर्वजण गोवर्धन पर्वताच्या आश्रयाखाली सुरक्षित राहिले. अखेर इंद्राला भगवान कृष्णाच्या अवताराची खात्री पटली व तो ऐरावतावर बसून कामधेनू व देवतागणासह श्रीकृष्णाला शरण आला. इंद्राने बाल भगवान श्रीकृष्णाची स्तुती करून म्हटले, “आपण या ठिकाणी पृथ्वीवरील संकट दूर करण्यासाठी अवतार घेतला हे मला कळून चुकले आहे. आपण एकाच हातावर कळंगळीवर गोवर्धन पर्वत तोलून आपल्या समर्थांची चुणूक दाखविली आहे. हे प्रभो! ऐश्वर्याच्या घमेंडीत दंग होऊन मी आपला अपराध केला आहे. आपला प्रभाव मला माहीत नव्हता. आपण माझ्या अपराधाची मला क्षमा करावी. मी आपला सत्कार करतो तसेच आपला उपेंद्र पदावर अभिषेकही करू इच्छितो. आपण गाईंचे स्वामी इंद्र आहात म्हणून आपण गोविंद आहात.” असे म्हणून इंद्राने सर्व ठिकाणावरून तीर्थजल बोलावून सर्व देव- देवतांच्या उपस्थितीत श्रीकृष्णाचा अभिषेक केला तसेच श्रीकृष्णाला विनंती केली की माझ्या अंश रूपाने अर्जुन या भूतालावर जन्मला आहे. आपण त्याला आपल्या कार्यात सहभागी करून घ्यावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले “अर्जुन तुझा अंश आहे हे मला माहिती आहे. मी जोपर्यंत या भूतालावर असेल तोपर्यंत त्याचे रक्षण करीन व तोपर्यंत तो नेहमी अजिंक्य राहील याबद्दल तू निश्चिंत राहा. हे ऐकून इंद्रदेव सर्व देवदेवतांसह समाधानाने निघून गेले.गोवर्धन पर्वत उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात वृंदावनपासून २२ किलोमीटर अंतरावर आहे. गौ म्हणजे गाय व वर्धन म्हणजे राहण्याचे स्थान म्हणून “गोवर्धन” असे मानले जाते.






