एका निरीक्षणाची प्रस्तावना

भालचंद्र कुबल-पाचवा वेद

एकांकिका स्पर्धांना परीक्षक म्हणून काम करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रंगभूमीवरील विविध प्रयोगांचे डेटा कलेक्शन. अमर कुलकर्णी या गोव्यातील माझ्या विद्यार्थी मित्राने काही वर्षांपूर्वी फोबिया नामक एकांकिका अनेक स्पर्धांमधून सादर केली होती. लग्नाच्या पहिल्या रात्रीची एका जोडप्याची ती कथा होती. त्या नवजात वधूचा तिच्या आधीच्या प्रियकराबरोबरचा लॉजवरचा व्हिडीओ लिक झालेला असतो आणि पुढे तो व्हायरल देखील होतो. त्या वधूला ही गोष्ट आपल्या नुकतेच लग्न झालेल्या नवऱ्याला सांगायची आहे आणि मग तिच्या मनातील भाव भावनांचा फोबिया सादर करण्यात एकांकिका कमालीची यशस्वी ठरली होती. फक्त काही परीक्षकांच्या मते शेवट, नवरा आपल्या पत्नीचे जे प्रत्यक्ष लाईव्ह चुंबन घेतो, ते नसते तर एकांकिका चांगली होती. मला त्या वादात पडायचे नाही, फक्त हा उल्लेख एवढ्याचसाठी होता की सोशल मिडीयाने उभे केलेले प्रॉब्लेम्स "थांबवायचे कसे?" हे विचारणाऱ्या अनेक नाट्याकृती या अगोदरही येऊन गेल्यात. युनिव्हर्सिटी युथ फेस्टिवलमधे कॉलेज ग्रुपमधील एका मुलीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे मुलीने केलेल्या आत्महत्येच्या कथानकाची एकांकिका पाहिल्याचे आठवतेय. पण मग अशा कथानकांची बीजे कुठल्या कुठल्या कलाकृतींमधे मला जाणवली त्यासाठीचा हा अट्टहास...!

अल्फ्रेड हिचकॉकचा ब्लॅकमेल (१९२९) हा जुन्या पिढीच्या प्रेक्षकांना आठवत असेल. त्यावेळी अर्थातच सोशल मिडीयाचा संबंध नव्हता, परंतु लपून छपून फोटो काढण्याच्या विकृतीचा नक्कीच होता. नंतर काही वर्षांनी "रेअर विंडो" (१९५४), "द कॉन्व्हर्सेशन" (१९७४), "बॉडी डबल" (१९८४), "सिल्व्हर" (१९९३), "डिस्क्लोजर" (१९९४), "अनफेथफुल" (२००२), "द गर्ल विथ ड्रॅगन टॅटू" (२०११), "गॉन गर्ल"(२०१४) अशी गुप्तता, मॅनिप्युलेशन, ब्लॅकमेल, भूतकाळ उघड होण्याची भीती आणि सामाजिक दबाव आदी विषयांनी प्रेरित असलेल्या कथानकांवर जागतिक सिनेसृष्टी उभी आहे. मग आपले भारतीय लेखक इकडचं थोडं, तिकडचं थोडं करत मराठी रंगभूमीवर "पहिल्यांदाच" सादर करीत असल्याचा खोटा आव आणत असतात. ८०% कलाकारांचे अवांतर वाचन आणि प्रयोगाकृती बघणे फारच अत्यल्प असते. त्यामुळे त्यांना स्वतःचा वाव अथवा वावर दिसणाऱ्या कलाकृतींमधे इंटरेस्ट असतो हे अलिकडच्या नाटकांवरुन सिद्ध झालेले आहेच.



मागील वर्षीच्या आय.एन.टी. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत "हॅश टॅग इनोसंट" नावाची एकांकिका पहायला मिळाली. एकांकिकेत व्यावसायिक नाटकाची बीजे होती. पण एकांकिका त्यातील कलाकारांमुळे पार विस्कटली होती. परीक्षकांपैकी मी आणि डाॅ. श्वेता पेंडसे यांनी स्पर्धकांशी चर्चाही केली होती. त्यातही पेंडसे मॅमनी अनेक सुधारणा सुचवल्या होत्या. पुढे त्या सुधारणा अमलात आणल्याने पनवेलच्या अटल करंडकमधे ती एकांकिका पहिली आणि सवाई स्पर्धेत प्रेक्षकप्रिय ठरली. आणि तिथूनच त्या एकांकिकेचे नाटक आणि हौशीचे व्यावसायिक बनवण्याची प्रक्रिया सुरु झाली. अर्थातच ही प्रक्रिया काही पहिल्यांदाच होत नव्हती. पाल ओढून ओढून तिची मगर आजवर अनेकदा केली गेली आहे. मात्र त्यातील नाट्यबीजाचे पाल्हाळीक स्वरुप बघावे लागते. मी हे "आता थांबवायचं कसं?" या नाटकाचे निरीक्षण लिहिण्यापूर्वीची प्रस्तावना मांडतोय असे समजण्यास हरकत नाही. या नाटकाचा लेखक संदीप दंडवतेचा या विषयासंबंधीचा खयाल अगदी ओरीजिनल, प्युअर आणि ट्रान्स्परंट असेलही परंतु नाट्यअभ्यासकांसाठी नाही. एखाद्या शायरचा खयाल दुसऱ्या एखाद्या शायराशी मिळता जुळता असल्यास त्या शेरांना "टकराव" म्हणायची रीत आहे, पण नाटकाच्या विषयांना ती मुभा नाही. मुद्दामहून "पुरीयथा पुथीर" (२०१७) चा तामिळ चित्रपट पहावा. या चित्रपटाची आणि "आता थांबवायचं कसं ?"ची कथा सेम आहे. पण तरीही मी बेनेफिट्स आॅफ डाऊट्स देऊन संदीप दंडवते या नवलेखकाला प्रोत्साहन म्हणून यास "टकराव" म्हणतो. स्त्री शोषणाच्या वेबसिरीज तर ढिगांनी असाव्यात असा माझा अंदाज आहे. काय असतं ना, नाटकाचा विषय कालातीत असावा या मताचा मी निश्चित आहे पण त्याचा डोलारा कधीही आऊट डेटेड होणारा नसावा. उदा. सतीश आळेकरांचे नाटक नाव "अतिरेकी" असूनही त्यातील कंटेटमुळे आऊट डेटेड आहे. सांगायचा मुद्दा असा की उद्या स्त्री शोषण कालबाह्य होणार नाही; परंतु फसवून केलेली व्हिडीओग्राफी नक्कीच आऊट डेटेड होईल. त्या ऐवजी गुन्हेगारीची आणखी एखादी नवी पद्धत जन्माला घातली जाईल, मग तुम्ही लेखक म्हणून स्त्री शोषणावर ठळकपणे भाष्य करणार की नाही? असो. माझ्या मते नाटक एकदा का एखाद्या व्यक्तिरेखेलाच फाॅलो करायला लागलं की व्यक्तिकेंद्री होत जातं आणि या नाटकाचा विषय सामाजिक आहे. सामाजिक नाटकं व्यक्तिकेंद्री नसतात का ? तर नसतात कारण प्लाॅटची प्रायॉरीटी थॉट असते. पुन्हा असो.

या नाटकाबाबत फेसबुकवर मला मृदुला राजवाडे यांची एक पोस्ट वाचायला मिळाली. त्यात त्यानी दुसऱ्या प्रयोगात जाणवलेल्या उणिवा व्यक्त केल्यात. नाटक न बघता या नाटकाच्या पार्श्वभागी असलेल्या कलाकृतींच्या आधारे माझे विवेचन आहे. कदाचित नाटक बघितल्यावर ते अधिक प्रगल्भ होत जाईल; परंतु आपल्या पोस्टमधे त्या म्हणतात, "नाटकाचा ‘विषय’ स्पष्ट करणारे बेडरूमच्या नेपथ्यावरील आजी आणि नातीचे संवाद पुनर्लिखित व्हावेत. मागच्या पिढीबाबत अत्यंत चुकीची प्रतिमा समाजात जातेय.पू्र्वीच्या स्त्रियांच्या दमनाचा किंवा शोषणाचा मुद्दा या नाटकाचा मुळात विषय नाही. यामुळे नाटक काही वेळासाठी ऑफ ट्रॅक होते. आणि एका गंभीर विषयाचं साधारणीकरण होण्याची शक्यता बळावते. यावर जरूर विचार व्हावा." मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय, मराठी प्रेक्षक जर नाटक या माध्यमाबाबत एवढी प्रगल्भता व्यक्त करू शकतो, तर मग प्रेक्षकांना गृहित धरून रटाळ विषय माथी मारणाऱ्या निर्मात्यांना सांगा थांबवायचं कसं ?

Comments
Add Comment

अभिनयाचा मुसाफिर

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल  पंकज विष्णू सध्या अभिनयाच्या हिंदोळ्यावर झुलत आहे. ‘श्री बाबा नीब करोरी महाराज' या

कलावंतांच्या चौकडीचे पंचरंगी ‘शिक्कामोर्तब’

आयुष्यातली महत्त्वाची परीक्षा असो की महत्त्वाच्या ठिकाणी नोकरी असो; नवरा-बायकोचे नाते असो की कोर्ट केसचा निकाल

Entertainment : मनोरंजन विश्वात ऐन उन्हाळ्यात गारवा...

सध्या उष्णतेच्या लाटेमुळे सर्वत्र होरपळ सुरू असताना, मनोरंजनाच्या माध्यमातून चार घटका करमणूक करणाऱ्या

Vaishnavi Kalyankar : वैष्णवीची पुढील चाल ‘घबाडकुंड’ !

घबाडकुंड’ हा रहस्यमय चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये एका महत्त्वपूर्ण

Case Study : बदल घडवणारी केस स्टडी ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’ !

आम्हां जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या मुलांना व्यसनाधिनता म्हणजे काय? हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ऐंशीच्या दशकात

पुस्तकांनी असे घडवले

स्मृतीगंध : लता गुठे नुकताच पुस्तक दिन सर्वांनी साजरा केला. १९७२ ची गोष्ट. मी बालवाडीत जात होते. त्यावेळी