Friday, June 5, 2026

Mumbai Andheri Subway Waterlogging : प्रत्येक पावसात अंधेरी सबवे होणार जलमय; पुढील काही वर्ष ही समस्या राहणार कायमच

Mumbai Andheri Subway Waterlogging : प्रत्येक पावसात अंधेरी सबवे होणार जलमय; पुढील काही वर्ष ही समस्या राहणार कायमच

मुंबई : पावसाचा पहिल्याच कोसळलेल्या सरिंमुळे अंधेरी सबवे परिसर पुन्हा एकदा पाण्याखाली गेला. काही मिनिटांच्या पावसामुळे वाहतूक ठप्प झाली आणि पूर्व-पश्चिम मुंबईला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग बंद करावा लागला. या घटनेमुळे मुंबई महापालिकेच्या पावसाळापूर्व तयारी बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असले तरी थोड्याशाही पावसात हा परिसर कायमच जलमय होणारच आहे. मोगला नाल्यावरील पंपिंग स्टेशन आणि या परिसरात पावसाचे पाणी पंपिंग करून साठवण्याच्या टाक्या नसल्यामुळे या भागातील पाण्याचा निचरा करण्यात अडचणी येत आहेत. मात्र यासाठीसाचलेले पाणी पंपिंग करून टाक्यांमध्ये ठेवण्यासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. या नवीन जागेवर टाक्या बांधेपर्यंत आणि मोगला नाला पंपिंग स्टेशन होईपर्यंत अंधेरी सबवे कायमच पाण्याखाली राहणार आहे.

महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, अंधेरी सबवे येथे पाणी साचताच तातडीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून डी-वॉटरिंग पंप सुरू करण्यात आले. यावर्षी सबवे परिसरात सुमारे २,५०० घनमीटर प्रतितास क्षमतेचे तीन पंप तैनात करण्यात आले असून, शहरभरातील ५४७ पोर्टेबल पंपांचे आयओटी (IoT) प्रणालीद्वारे केंद्रीय नियंत्रण कक्षातून निरीक्षण केले जात आहे. मात्र, यामुळे पाऊण तास वाहतूक बंद करावी लागली होती.

तसेच, महापालिकेने नालेसफाईचे काम १०० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. याशिवाय, अंधेरी सबवेतील कायमस्वरूपी पाणी साचण्याची समस्या सोडवण्यासाठी "वॉटर होल्डिंग पाँड" उभारणे आणि विद्यमान पर्जन्यजल वाहिनीचे पुनर्रचना करण्याचा पर्यायही विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे. या कामासाठी तज्ज्ञ संस्थांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे.

मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती पाहता महापालिकेच्या उपाययोजनांमध्ये अनेक त्रुटी असल्याचे स्पष्ट होत आहे. अंधेरी सबवे हा परिसर नैसर्गिकरित्या सखल भागात असून आसपासच्या उंच भागातील सर्व पाणी येथे जमा होते. त्याचबरोबर मोगरा नाल्याचा प्रवाहही या भागातून जात असल्याने मुसळधार पावसात सबवे काही मिनिटांत भरून जातो. दीर्घकालीन उपाययोजना अद्याप प्रत्यक्षात न आल्याने दरवर्षी हीच परिस्थिती उद्भवत आहे.

तात्पुरते पंप लावणे किंवा पाणी उपसणे हा कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही. अंधेरी सबवेची रचना, पर्जन्यजल वाहिनी आणि नाल्यांचे जाळे यामध्ये व्यापक बदल केल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. त्यामुळे महापालिकेने केवळ आपत्कालीन व्यवस्थेवर अवलंबून न राहता दीर्घकालीन आणि शाश्वत उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांचे म्हणणे आहे.

त्यामुळे मोगला नागावली पंपिंग स्टेशनचे बांधकाम आणि वॉटर होल्डिंग पाँड" उभारणे तसेच विद्यमान पर्जन्यजल वाहिनीची सुधारणा करेपर्यंत ही समस्या पुढील काही वर्षे मुंबईकरांना भेडसावणारच आहे, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. पूर्वी अशा प्रकारची समस्या हिंदमाता येथे असायची. पण हिंदमाताला येथे पाण्याची उपाययोजना करण्यात आली असली, तरी अंधेरी सबवे परिसरातील तुंबणाऱ्या पाण्याची समस्या निकालात काढण्यासाठी अजून काही वर्षे लागणार असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >