Friday, June 5, 2026

Retire Players Strict Policy : परदेशी लीगसाठी 'निवृत्ती' घेणाऱ्या खेळाडूंवर बीसीसीआयची करडी नजर; कठोर धोरण आखण्याच्या तयारीत

Retire Players Strict Policy : परदेशी लीगसाठी 'निवृत्ती' घेणाऱ्या खेळाडूंवर बीसीसीआयची करडी नजर; कठोर धोरण आखण्याच्या तयारीत

BCCI : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एका नवीन ट्रेंडने बीसीसीआयची (BCCI) चिंता वाढवली आहे. अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत क्रिकेटमधून मुदतपूर्व निवृत्ती जाहीर करून परदेशी टी-२० लीगमध्ये खेळण्याला पसंती देत आहेत. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी बीसीसीआय आता एक अत्यंत कठोर 'निवृत्ती धोरण' (Retirement Policy) तयार करण्याच्या विचारात आहे.

५ वर्षांचा 'कूलिंग-ऑफ' कालावधी?

गुरुवारी (४ जून २०२६) पार पडलेल्या बीसीसीआयच्या 'अपेक्स कौन्सिल'च्या (Apex Council) बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली. परदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी जे खेळाडू भारतीय क्रिकेटला रामराम ठोकतात, त्यांच्यासाठी ५ वर्षांचा बंदी कालावधी (Cooling-off period) लागू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. जर संबंधित खेळाडूने निवृत्तीनंतर कोणत्याही क्रिकेट लीगमध्ये सहभाग घेतला नसेल, तर हा कालावधी कमी करून १ वर्ष केला जाऊ शकतो. खेळाडूंनी आपल्या निर्णयाबाबत गंभीर असावे आणि घाईघाईने निर्णय घेऊ नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

विजय शंकर आणि अलीकडील उदाहरणे

अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याने गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीनंतर लगेचच त्याने 'लंका प्रीमियर लीग' (LPL 2026) साठी स्वतःला उपलब्ध करून दिले आणि कँडी रॉयल्स (Kandy Royals) संघाने त्याला करारबद्ध केले. विजय शंकरच्या आधीही अनेक खेळाडूंनी परदेशी लीगमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय क्रिकेट सोडण्याचा मार्ग निवडला आहे.

बीसीसीआयच्या सध्याच्या नियमांनुसार, कोणताही सक्रिय भारतीय क्रिकेटपटू बीसीसीआयच्या चौकटीबाहेरील परदेशी लीगमध्ये भाग घेऊ शकत नाही. या नियमाची अंमलबजावणी अधिक कडक करण्याचा बोर्डाचा प्रयत्न आहे.

मालदीव आणि फिजी क्रिकेट बोर्डांना मदतीचा हात

खेळाडूंच्या निवृत्तीच्या मुद्द्याव्यतिरिक्त, बीसीसीआयने जागतिक क्रिकेटच्या विकासासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय आता मालदीव आणि फिजी क्रिकेट बोर्डांना मदत करणार आहे. या देशांमध्ये क्रिकेटचा विस्तार करण्यासाठी बीसीसीआय आपले प्रशिक्षक तिथे पाठवणार असून इतर तांत्रिक मदतही पुरवणार आहे. आयसीसीच्या (ICC) उपक्रम अंतर्गत या विकसनशील देशांमधील क्रिकेटला बळकटी देणे, हा यामागचा हेतू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >