Thursday, June 4, 2026

French Open 2026 : वर्ल्ड नं. 1 आर्यना सबालेंका स्पर्धेबाहेर; डायना श्नाइडरची ऐतिहासिक कामगिरी

French Open 2026 : वर्ल्ड नं. 1 आर्यना सबालेंका स्पर्धेबाहेर; डायना श्नाइडरची ऐतिहासिक कामगिरी

Paris: फ्रेंच ओपन 2026 मध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. महिला एकेरीतील विजेतेपदाची प्रबळ दावेदार आणि जागतिक क्रमावारील अव्वल खेळाडू आर्यना सबालेंका हिला उपांत्यपूर्व फेरीत धक्कादायक पराभव झाला आहे. रशियाच्या डायना श्नाइडर हिने दमदार पुनरागमन करत सबालेंकाला 3-6, 7-5, 6-0 अशा फरकाने पराभूत केले आहे. रशियाच्या डायना श्नाइडर हिने प्रथमच ग्रँडस्लॅम उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

4-1 आघाडीनंतरही सबालेंकाचा पराभव

सामन्याच्या सुरुवातीला सबालेंकाने आपला दबदबा दाखवत पहिला सेट 6-3 ने जिंकला होता. दुसऱ्या सेटमध्येही ती 4-1 ने आघाडीवर होती आणि विजयापासून अवघ्या काही गुणांच्या अंतरावर उभी होती. मात्र, डायना श्नाइडरने हार न मानता शानदार पुनरागमन केले. तीने सलग गेम जिंकत दुसरा सेट 7-5 ने आपल्या नावावर केला आणि सामना निर्णायक सेटमध्ये नेला. निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये सबालेंकाचा खेळ पूर्णपणे कोलमडल्याच दिसून आले. यानंतर डायनाने आक्रमक फटकेबाजी करत सबालेंकाला एकही गेम जिंकू दिला नाही. अखेर 6-0 अशा फरकाने सेट जिंकत तिने तब्बल 2 तास 12 मिनिटे चाललेल्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या पराभवामुळे सबालेंका स्पर्धेतून बाहेर झाली आहे.

उपांत्य फेरीत जोरदार चुरस

या विजयासह डायना श्नाइडरने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता तिचा सामना पोलंडच्या माजा ख्वालिंस्का हिच्याशी होणार आहे. ख्वालिंस्काने उपांत्यपूर्व फेरीत अन्ना कालिंस्कायाचा पराभव करून शेवटच्या चारमध्ये स्थान मिळवले. विशेष म्हणजे, सबालेंकाने याआधीच्या फेरीत चार वेळची ग्रँडस्लॅम विजेती नाओमी ओसाका हिचा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे तिच्याकडून विजेतेपदाची मोठी अपेक्षा होती. मात्र डायना श्नाइडरने तीचे अपेक्षांवर पाणी फेरले आहे.

सबालेंकाचा दमदार करियर

28 वर्षीय आर्यना सबालेंका महिला टेनिसमधील सर्वात यशस्वी खेळाडूंमध्ये गणली जाते. तिच्या नावावर 24 एकेरी विजेतेपदे आहेत. सप्टेंबर 2023 मध्ये ती प्रथमच जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचली होती. कारकिर्दीत तिने 500 हून अधिक सामने जिंकले असून कोट्यवधी डॉलर्सची बक्षीस रक्कमही मिळवली आहे. सबालेंकाच्या अनपेक्षित पराभवानंतर फ्रेंच ओपन महिला एकेरी स्पर्धेचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. डायना श्नाइडरच्या ऐतिहासिक विजयामुळे आता विजेतेपदाच्या शर्यतीत नव्या दावेदारांना संधी मिळाली आहे. त्यामुळे आता पुढील सामने अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >