Thursday, June 4, 2026

FIFA World Cup 2026 : अर्जेंटिना-ऑस्ट्रिया एकाच गटात, फ्रान्ससमोर नॉर्वेचं आव्हान; व्हायरल गटवारीने फुटबॉल विश्वात खळबळ

FIFA World Cup 2026 : अर्जेंटिना-ऑस्ट्रिया एकाच गटात, फ्रान्ससमोर नॉर्वेचं आव्हान; व्हायरल गटवारीने फुटबॉल विश्वात खळबळ

सोशल मीडियावर FIFA 2026 ची गटवारी तुफान व्हायरल

Mumbai : FIFA World Cup 2026 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ११ जून २०२६ पासुन फिफा वर्ल्ड कपची सुरुवात होणार आहे. यात फिफा फेडरेशनने वर्ल्ड कप ग्रुपची गटवारी जाहिर केली आहे. ग्रुप स्टेजची गटवारी सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल पोस्टरमध्ये जगातील 48 संघांची A ते L अशा 12 गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. अनेक दिग्गज संघांना कठीण गट मिळाले आहे. त्यामुळे फुटबॉल चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

A गट : मेक्सिकोसमोर आशिया-आफ्रिकेचे आव्हान

A गटात यजमान मेक्सिकोसोबत दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया आणि झेकिया (Czechia) यांचा समावेश करण्यात आला आहे . हा गट तुलनेने संतुलित मानला जात आहे.

B गट : कॅनडासाठी कठीण परीक्षा

यजमान कॅनडासोबत बोस्निया, कतार आणि स्वित्झर्लंड आहेत. स्विस संघामुळे कॅनडासाठी साखळी सामने अत्यंत कठीण ठरू शकतात.

C गट : ब्राझीलची स्कॉटलंड आणि मोरोक्कोशी लढत

पाच वेळा विश्वविजेता ब्राझील, मोरोक्को, हैती आणि स्कॉटलंडसोबत हे देश एकाच गटात आहेत. मोरोक्कोने 2022 विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरी प्रवेश करत इतिहास घडवला होता, त्यामुळे हा गट आता चर्चेत आहे.

D गट : अमेरिकेसमोर तुर्किये आणि ऑस्ट्रेलिया

यजमान अमेरिका, पराग्वे, ऑस्ट्रेलिया आणि तुर्किये यांचा समावेश असलेला हा गट तुलनेने सोपा मानला जात आहे.

E गट : जर्मनीला आफ्रिकन संघांचे आव्हान

जर्मनी, कुरासाओ, आयव्हरी कोस्ट आणि इक्वाडोर या संघांचा समावेश एकाच गटात करण्यात आले आहे. आयव्हरी कोस्ट जर्मनीसाठी धोकादायक ठरू शकतो असं मानलं जात आहे.

F गट : नेदरलँड्स विरुद्ध जपान?

नेदरलँड्स, जपान, स्वीडन आणि ट्युनिशिया यांचा गट हा सर्वाधिक संतुलित गटांपैकी एक मानला जात आहे.

G गट : बेल्जियमचा इराण आणि इजिप्तशी सामना

बेल्जियम, इजिप्त, इराण आणि न्यूझीलंड यांचा समावेश असलेला हा गट आशिया आणि आफ्रिकेच्या संघांमुळे रंजक ठरू शकतो.

H गट : स्पेनसाठी सोपा की कठीण?

स्पेन, केप व्हर्डे, सौदी अरेबिया आणि उरुग्वे हे संघ या गटात दाखवण्यात आले आहेत. उरुग्वेमुळे स्पेनची परीक्षा होऊ शकते.

I गट : फ्रान्स-नॉर्वे महामुकाबला

गतविजेता फ्रान्स, सेनेगल, इराक आणि एर्लिंग हालांडचा नॉर्वे यांचा समावेश असलेला हा गट 'ग्रुप ऑफ डेथ' ठरू शकतो.

J गट : मेस्सीच्या अर्जेंटिनासमोर ऑस्ट्रिया

विद्यमान विश्वविजेता अर्जेंटिना, अल्जेरिया, ऑस्ट्रिया आणि जॉर्डन यांच्यासोबत एकाट गटात आहे. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना पुन्हा एकदा जेतेपदासाठी उतरणार आहे.

K गट : रोनाल्डोच्या पोर्तुगालसमोर कोलंबिया

पोर्तुगाल, काँगो डीआर, उझबेकिस्तान आणि कोलंबिया यांचा गट देखील चर्चेत आहे. रोनाल्डोचा संभाव्य अखेरचा विश्वचषक असल्याने या गटाकडे सर्वांचे लक्ष असेल.

L गट : इंग्लंड-क्रोएशिया पुन्हा आमनेसामने?

इंग्लंड, क्रोएशिया, घाना आणि पनामा यांचा समावेश असलेला हा गट अत्यंत रोमांचक दिसत आहे. इंग्लंड आणि क्रोएशियामधील लढत चाहत्यांसाठी विशेष आकर्षण ठरू शकते.

यावेळी नॉकआउट स्टेजमध्ये मोठे बदल

फिफा वर्ल्ड कप २०२६ च्या नॉकआउट स्टेजमध्ये बदल करण्यात आले आहे. आता नॉकआउट 16 ऐवजी 32 संघांचे असेल. याचा अर्थ असा की, जो संघ ट्रॉफी जिंकेल, त्याला 8 सामने खेळावे लागतील .याधी विजेता संघाला सात सामने खेळावे लागायचे.

चार देशांचे वर्ल्ड कप पदार्पण

या वर्ल्ड कपमध्ये चार देश पहिल्यांदाच विश्वचषक खेळणार आहेत. केप वेर्डे (68 वे स्थान), कुराकाओ (82 वे स्थान), जॉर्डन (66 वे स्थान), उझबेकिस्तान (50 वे स्थान) पहिल्यांदाच विश्वचषकात खेळतील.प्रत्येक गटात रोमांचक लढती पाहायला मिळणार आहे . मेस्सीची अर्जेंटिना, रोनाल्डोची पोर्तुगाल, एमबाप्पेची फ्रान्स आणि यमालचा स्पेन... 2026 विश्वचषक फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक ठरणार हे मात्र निश्चित!

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >