Wednesday, June 3, 2026

IND vs AFG : टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद सिराज कसोटीला मुकणार ? गिलच्या लाडक्या गोलंदाजाला मिळू शकते सुवर्णसंधी...

IND vs AFG : टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद सिराज कसोटीला मुकणार ? गिलच्या लाडक्या गोलंदाजाला मिळू शकते सुवर्णसंधी...

मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 6 जूनपासून न्यू चंदीगड येथे होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या गोलंदाजीला मोठा फटका बसण्याची शक्यता मानली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यादरम्यान सिराजला शारीरिक त्रास जाणवला होता. त्यानंतर त्याच्यावर फिजिओथेरपीही करण्यात आली होती. वैद्यकीय पथक त्याच्या फिटनेसवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पुढील 48 तासांत त्याच्या सहभागाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असं म्हटलं जात आहे.

गुरनूर ब्रारच्या पदार्पणाचा मार्ग मोकळा ?

सिराज या कसोटीत खेळू शकला नाही, तर पंजाबचा युवा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारला भारतीय कसोटी संघात पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. मुख्य निवडकर्त्यांनी त्याला संघात स्थान दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता सिराज बाहेर पडल्यास प्रसिद्ध कृष्णासोबत नवीन चेंडूची जबाबदारी गुरनूर ब्रारकडे येऊ शकते अशी चर्चा आहे.

आकिब नबी संघात पण... रणजी ट्रॉफीमध्ये 60 विकेट्स घेत चर्चेत आलेला जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी सध्या भारतीय संघासोबत राखीव खेळाडू म्हणून आहे. मात्र त्याचा मुख्य संघात समावेश नसून तो नेट गोलंदाज म्हणून संघासोबत सराव करत आहे. त्याच्यासोबत गुर्जपनीत सिंह आणि प्रिन्स यादव यांनाही नेट गोलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे.

मोहम्मह सिराजची दमदार कामगिरी

गुजरात टायटन्सकडून खेळताना मोहम्मद सिराजने आयपीएल 2026 मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. त्याने 17 सामन्यांत 19 विकेट्स घेत गुजरातचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज होण्याचा मान मिळवला. कगिसो रबाडानंतर सर्वाधिक विकेट्स घेणारा तो गुजरातचा गोलंदाज ठरला. यंदाच्या हंगामात त्याने सर्वधिक 172 डॉट चेंडू टाकले आहेत. गेल्या वर्षीही इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सिराजने सर्व पाच सामने खेळत भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व केले होते. निर्णायक क्षणी विकेट्स घेत त्याने भारताला महत्त्वाचे विजय मिळवून दिले होते. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार की नाही, याकडे आता सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

सहा जूनपासून कसोटीचा थरार

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना 6 ते 10 पर्यंत न्यू चंदीगड येथे खेळवला जाणार आहे. सिराजच्या फिटनेसवर अंतिम निर्णय झाल्यानंतर भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनचे चित्र स्पष्ट होईल

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >