Delhi's Malviya Nagar Fire : दिल्लीतील अग्नितांडवात एकाच कुटुंबातील ८ जणांचा दुर्दैवी अंत

नवी दिल्ली : दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील फ्लोरिश स्टे बी अँड बी हॉटेलमध्ये बुधवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राजधानी हादरली आहे. नातेवाईकांच्या उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या कुटुंबावर काळाने असा घाला घातला की, काही क्षणांत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले.


महावीर एन्क्लेव्हमध्ये राहणारे प्रेम बन्सल यांची मुलगी, जावई आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य या दुर्घटनेचे बळी ठरले. प्रेम बन्सल यांचे जावई विवेक अग्रवाल हे गुरुग्रामच्या सेक्टर ४६ येथे राहत होते. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या विवेक अग्रवाल यांच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वडिलांची विचारपूस करण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना घेऊन विवेक अग्रवाल बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास जवळील हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी गेले होते. मात्र काही क्षणांतच हॉटेलला आग लागली. आग इतकी वेगाने पसरली की अनेक नागरिक वरच्या मजल्यांवर अडकून पडले. जीव वाचवण्यासाठी काहींनी खिडक्यांमधून उड्या मारल्या. अनेकांच्या बरगड्या तुटल्या, तर काही जण गंभीर जखमी झाले. बचाव पथकांनी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र विवेक अग्रवाल, त्यांची पत्नी तर्जनी, मुलगी जीविशा, वारिया, आई प्रेमलता, मावशी कमला, काका अशोक गोयल आणि झिमरी अग्रवाल यांना वाचवता आले नाही. या दुर्दैवी घटनेनंतर विवेक अग्रवाल यांच्या कुटुंबात आता केवळ रुग्णालयात उपचार घेत असलेले त्यांचे वृद्ध वडीलच उरले आहेत. त्यांच्या देखभालीसाठीही घरातील कोणीच शिल्लक नसल्याने ही दुर्घटना अधिकच हृदयद्रावक ठरली आहे.


दिल्लीतील भीषण अग्निकांडांचा काळा इतिहास

दिल्लीत यापूर्वीही अनेक मोठ्या आगीच्या दुर्घटना घडल्या असून शेकडो नागरिकांनी त्यात जीव गमावला आहे.


उपहार चित्रपटगृह अग्निकांड (१९९७)


१३ जून १९९७ रोजी दिल्लीतील उपहार चित्रपटगृहात ‘बॉर्डर’ चित्रपटाचा शो सुरू असताना ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होऊन शॉर्टसर्किट झाले. त्यानंतर लागलेल्या आगीत ५९ जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जण जखमी झाले. दिल्लीच्या इतिहासातील हे सर्वात भीषण अग्निकांड मानले जाते.


अर्पित पॅलेस हॉटेल दुर्घटना (२०१९)


१२ फेब्रुवारी २०१९ रोजी करोल बाग येथील अर्पित पॅलेस हॉटेलला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर लाकडी साहित्य वापरण्यात आले होते. तसेच आपत्कालीन मार्ग बंद असल्याने अनेक जण अडकले. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला.


धान्य बाजार इमारत आग (२०१९)


डिसेंबर २०१९ मध्ये झांसी रोड परिसरातील धान्य बाजारातील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४५ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर ६० हून अधिक जण जखमी झाले.


मुंडका व्यावसायिक इमारत आग (२०२२)


१३ मे २०२२ रोजी पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्थानकाजवळील चार मजली व्यावसायिक इमारतीला आग लागली. बाहेर पडण्यासाठी केवळ एकच मार्ग असल्याने अनेक कर्मचारी आत अडकले. या दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला, तर ४० हून अधिक जण जखमी झाले.


मुखर्जी नगर कोचिंग सेंटर आग (२०२३)


जून २०२३ मध्ये मुखर्जी नगर येथील कोचिंग सेंटरमध्ये वीज मीटरला आग लागून संपूर्ण इमारतीत धूर पसरला. सुमारे २०० ते २५० विद्यार्थी इमारतीत अडकले होते. अनेकांनी तिसऱ्या मजल्यावरून उड्या मारून जीव वाचवला. ६१ विद्यार्थी जखमी झाले; मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.


अलीपूर पेंट कारखाना आग (२०२४)


उत्तर दिल्लीतील अलीपूर येथील पेंट कारखान्याला २०२४ मध्ये लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण गंभीर जखमी झाले. आग शेजारील दुकानांमध्येही पसरली होती.


बेबी केअर न्यूबॉर्न हॉस्पिटल अग्निकांड (२०२४)


२५ मे २०२४ रोजी विवेक विहार येथील बेबी केअर न्यूबॉर्न हॉस्पिटलमध्ये नियमबाह्यरीत्या ठेवलेल्या ऑक्सिजन सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली. या दुर्घटनेत सात नवजात अर्भकांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण देश हळहळला.


सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह


मालवीय नगरमधील ताज्या दुर्घटनेनंतर दिल्लीतील हॉटेल्स, रुग्णालये, व्यावसायिक इमारती आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अग्निसुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वारंवार होणाऱ्या अशा दुर्घटनांमधून प्रशासनाने धडा घेतला नसल्याची टीका होत असून, अग्निसुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी आणि नियमित तपासणीची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments
Add Comment

Rain Update : 'पश्चिमी विक्षोभा'मुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : हवामान विभागाने देशभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील

Liquor Ban : दारू मिळणारच नाही...ओल्ड मॉन्क सह 'या' प्रसिद्ध ब्रँड्सवर बंदी; प्रशासनाचा मोठा निर्णय!

नवी दिल्ली : मद्यप्रेमींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशातील लोकप्रिय आणि

Melody Tiramisu Flavour : 'मेलोडी'चा नवीन इटालियन ट्विस्ट! मोदींनी मेलोनींना दिलेल्या 'त्या' गिफ्टवरून पारलेने लाँच केला 'Melody Tiramisu'!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांच्यातील

NEET UG Counselling 2026 : नीट यूजी काऊन्सिलिंगचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून सुरू होणार नोंदणी प्रक्रिया!

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशाची वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

CJP Protest Case : 'गुन्हेगारांना सोडणार नाही'; CJP आंदोलन प्रकरणी केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट विधान

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी आणि शैक्षणिक सुधारणांविरोधातील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल करण्यात

Kangana Ranaut : "होय, मी मवाळ हिंदू होते; पण आता...भूतकाळातील टीकेवर कंगना रणौतचे टीकाकारांना चोख उत्तर

नवी दिल्ली : आपल्या बिनधास्त आणि रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना