Amravati : १७ पैकी ४ मतदारसंघात 'मविआ' निवडणुकीआधीच स्पर्धेबाहेर

अमरावतीत शिवसेनेच्या बंडखोराचा अर्ज बाद; नाशिकमध्ये 'उबाठा'कडून शरणागती


मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ जागांसाठी जाहीर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (मविआ) असा सामना रंगणार असे चित्र असतानाच, मतदानापूर्वीच 'मविआ'ला धक्का बसला आहे. १७ पैकी ४ महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तांत्रिक त्रुटी आणि राजकीय माघारीमुळे निवडणुकीच्या मुख्य प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. सोलापूरमध्ये काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाला, यवतमाळमध्ये संख्याबळ नसल्याने 'मविआ'च्या उमेदवाराने स्वतःहून माघार घेतली, तर नाशिकमध्ये उबाठा गटाने उमेदवारच न दिल्याने त्यांनी एका प्रकारे शरणागती पत्करल्याचे समोर आले आहे. परिणामी, मतदानापूर्वीच महायुतीचे पारडे जड झाले असून, त्यांच्या उमेदवारांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.


सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीने भाजपचे राजेंद्र राऊत यांना मैदानात उतरवले आहे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर उमेदवारी अर्ज दाखल करून लढतीत होते. मात्र, अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान तांत्रिक कारणांमुळे फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. यामुळे मुख्य लढतीपूर्वीच महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार रिंगणातून बाद झाला आहे. सोलापुरात एकूण ६१४ मतदार असून, त्यापैकी भाजप महायुतीकडे ४२८ आमदारांचे भक्कम संख्याबळ आहे, तर मविआकडे केवळ ८१ मते आहेत. अशावेळी विरोधी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे राजेंद्र राऊत यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे.यवतमाळ मतदारसंघात महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का बसला आहे. येथील मविआचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. "निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असणारे मतदारांचे संख्याबळ आमच्याकडे जुळत नसल्यामुळे मी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत आहे," अशी उघड कबुली कांबळे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर दिली. काँग्रेसने उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले. यवतमाळमधील एकूण ४४६ मतदारांपैकी महाविकास आघाडीकडे केवळ १३१ मतदार होते, तर उर्वरित संख्याबळ महायुतीच्या बाजूने असल्याने मविआने मतदानापूर्वीच येथे शस्त्रे खाली टाकली आहेत.


अमरावतीत बजोरिया यांचा अर्ज बाद


अमरावतीत भाजपने माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी दिली असून, त्यांचा अर्ज भरताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतः उपस्थित होते. मात्र, शिवसेनेचे माजी आमदार विप्लव बजोरिया यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरल्यामुळे पोटे यांच्यासमोर डोकेदुखी निर्माण झाली होती. बुधवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत बजोरिया यांचा अर्ज बाद करण्यात आला. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनीच बजोरिया यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता, जो जिल्हाधिकार्‍यांनी ग्राह्य धरला. ४४९ पैकी २२२ चे संख्याबळ असलेल्या पोटे पाटील यांचा मार्ग या निर्णयामुळे सुकर झाला असला, तरी अर्ज बाद झाल्यामुळे विप्लव बजोरिया यांनी आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.


नाशिकमध्ये 'उबाठा'चा उमेदवार नाही


नाशिक विधानपरिषद मतदारसंघात महायुतीतर्फे शिवसेनेचे नरेंद्र दराडे मैदानात आहेत. महाविकास आघाडीत ही जागा उबाठा गटाला सुटली होती. मात्र, त्यांच्याकडून मुदतीत कोणालाही उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे येथे मविआचा अधिकृत उमेदवारच रिंगणात नाही. आता अपक्ष उमेदवारांपैकी कोणाला मविआ पाठिंबा देणार यावरच त्यांचे गणित अवलंबून आहे. नाशिकमधील ६०३ मतदारांपैकी ४५४ मतदार महायुतीचे असल्याने येथेही महायुतीचे पारडे जड आहे. एकूणच, अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीपूर्वीच या चारही मतदारसंघांमधील गणित पाहता महायुतीने निवडणुकीआधीच आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : २६/११ हल्ल्याबाबत आर. व्ही. एस. मणी यांचे दावे धक्कादायक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण

Chandrashekhar Bawankule : दुबार पेरणीचा खर्च आता सरकार उचलणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती; 'डीपीडीसी'मधून खर्चाची तरतूद करणार मुंबई : पावसाने ओढ दिल्याने आणि

Ashish Shelar : दरवर्षी नाट्यगृहांच्या भाड्यात केवळ 1 ते 2 टक्के वाढ

• कोविडपूर्वीचाच मूळ दर आधारभूत मानणार • नाट्यसृष्टीच्या गोडाऊन व वाहनतळाच्या प्रश्नासाठी महिनाभरात

Navnath Ban : संजय राऊत, इतरांकडे पाहण्यापेक्षा अडगळीत पडलेल्या उबाठाकडे लक्ष द्या - नवनाथ बन

मुंबई : नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले "जनाब संजय राऊत

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संप्रेषण व्यवस्था उभारणीसाठी शासन सकारात्मक – मंत्री नितेश राणे

खोल समुद्रातील संपर्कासाठी मच्छिमारांना सॅटेलाईट फोन उपलब्ध करण्यासाठी पुढाकार; बीएसएनएलसोबत समन्वय मुंबई, :

Vinayak Raut News : विनायक राऊतांची सून घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

राऊत कुटुंबियांचा पाय खोलात; फिरोज बाबा शेखच्या साथीदारालाही अटक मुंबई : उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत(Vinayak