Tuesday, June 2, 2026

KERALA : मान्सून केरळच्या उंबरठ्यावर

KERALA : मान्सून केरळच्या उंबरठ्यावर

पुढील २४ ते ४८ तासांत धडकणार, महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा 'यलो अलर्ट' पुणे : कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांसाठी अखेर दिलासादायक बातमी आहे. संपूर्ण देश ज्या क्षणाची चातकासारखी वाट पाहत होता, तो क्षण आता अगदी जवळ आला असून पुढील २४ ते ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या आगमनासाठी केरळमध्ये सध्या परिस्थिती अत्यंत पोषक बनली आहे.

गेल्या महिन्यात १६ तारखेला अंदमानमध्ये पोहोचल्यानंतर, तब्बल १८ दिवसांचा प्रवास करून मान्सून आता केरळ किनारपट्टीवर धडकेल. यंदा मान्सून आपल्या नियमित वेळेपेक्षा सुमारे ४ दिवस उशिराने दाखल होत असला, तरी त्याच्या आगमनामुळे बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल होत असला, तरी महाराष्ट्रात मुख्य मान्सून पोहोचण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मात्र, मान्सून केरळच्या उंबरठ्यावर असतानाच महाराष्ट्रात मान्सूनपूर्व (प्री-मान्सून) पावसाचा जोर वाढणार आहे. सध्या राज्याच्या अनेक भागांत ढगाळ वातावरण तयार झाले असून, लवकरच दमदार पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

यंदा देशात किती पाऊस पडणार? भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदा देशात ८६ ते ९४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांच्या मते, दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत हा पाऊस सुमारे ९० टक्के असू शकतो. सद्यस्थितीत अरबी समुद्रासह लक्षद्वीप आणि तामिळनाडूच्या काही भागांतही मान्सून पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल झाले आहे. साधारणपणे मान्सून १ जून रोजी केरळमध्ये येतो, मात्र यंदा तो ४ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज आहे.

विजांच्या कडकडाटासह पाऊस हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना मान्सूनपूर्व पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मुख्य मान्सून येण्यापूर्वीच राज्याच्या विविध भागांत पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे राज्यातील उष्णतेची लाट ओसरण्यास मोठी मदत होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा