Case Study : बदल घडवणारी केस स्टडी ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’ !

आम्हां जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या मुलांना व्यसनाधिनता म्हणजे काय? हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ऐंशीच्या दशकात ब्राऊन शुगर, चरस, गांजा, मॅडी सारखी ड्रग्ज फुटपाथच्या पलीकडे अगदी सहज उपलब्ध असायची. आमच्या काही मित्रांची त्या विक्रेत्यांशी एवढी ओळख होती की पुढे पुढे त्यांची उधारीही चालायची. या धंद्यात फक्त रोकड्याचा हिसाब चालतो. स्कूल ऑफ आर्ट्सच्या गेट समोर चार मुस्लीम बायका त्यातली एक डोळ्याने तिरळी आणि दुसरी पांढरं बुब्बुळ असलेली डेंजर दिसायची. दहा रुपयाला दोन चरसच्या गोळ्या बिनदिक्कत पुरचुंडीतून काढून हातावर ठेवत ओळखीचे हास्य दाखवत पैसे घ्यायच्या. कधीमधी “जॉन नही आया?” असं रेग्युलर गिऱ्हाईकाची चौकशी देखील करायच्या. सांगायचा मुद्दा असा की त्या शैक्षणिक पाच वर्षांत व्यसनाधीन जग आम्ही जवळून बघितलं. आता सारखं काऊंन्सिलिंग तर सोडा पण त्या ड्रग विक्रेत्यांवर बडगा उगारलेला माझ्या तरी पहाण्यात आणि ऐकिवात नाही. समोर सी.आय.डी. ऑफिस, मागे पल्टन रोड पोलीस स्टेशन, बाजूला पोलीस कमिशनर बिल्डिंग असलेल्या ट्रँगल मधला राजरोस अमली पदार्थांची विक्री म्हणजे दिव्याखाली अंधार होता. पुढे पुढे ह्या ड्रग्जचं नेटवर्क आमच्या वांद्रे हॉस्टेलपर्यंत जाऊन पोचलं होतं आणि त्या नेटवर्कला साथ होती धारावीच्या “काळ्या सोन्याची”.



नुकतंच रंगभूमीवर प्रकाशित झालेलं “पुढच्या शुक्रवारी सात वाजता” पाहिलं आणि अख्खा फ्लॅशबॅक समोर आला. नैराश्येच्या गर्तेत भरकटलेले अनेक तरुण मित्र या ड्रग्जनी गिळंकृत केलेले पाहिले. भाल्या आपटेची बॉडी खार रेल्वे स्टेशनच्या पुलाखाली घोंघावणाऱ्या माश्यांखाली बघून काळजाचा ठोका चुकला होता. अशा असंख्य उदाहरणाच्या अंगाखांद्यावर खेळत बऱ्यावाईटाची समज आलेलं आमचं तरुणपण नाटकातल्या डॉ. अतुल मांकडच्या मानसिकतेचं बनलं होतं. राधिका जोशी आणि मंगेश गायकवाड यांच्या समावेत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अतुलच्या संघर्षाची ही गोष्ट आहे. उपदेशाचे डोस न पाजता तीनही पात्रांची मानसिकता हाताळणारी ही केस स्टडी आहे. या केस स्टडीला कॉर्पोरेट जगात हाताळतात तशी त्रयस्थ मानसिकता असूनही रिझल्ट ओरीएंटेड अप्रोच आहे. त्यामुळे हे कथानक केवळ मनोरंजनाच्या पातळीवर न रहाता जाता जाता अनेक प्रश्न निर्माण करतं. राधिका जेव्हा धारावी झोपडपट्टीत रहाणाऱ्या मंगेश या हुषार तरुण आणि जिनियस मुलाची अॅडीक्शन केस डॉ. अतुल नामक मानसोपचार तज्ज्ञाकडे सोपवते तेव्हाच खरंतर पुढल्या नाट्याचं अँटिसिपेशन मराठी प्रेक्षकवर्गाने लावायला सुरुवात केलेली असते. असं नाही तर तसं तरी, होणार इतपर्यंत आपण आपल्या अंदाजांच्या शिड्या चढत असतो आणि जवळपास अंदाजही काही वेगळे सिद्ध होत नाहीत, परंतु घडामोडींचा आलेख थोडा वेगळ्या स्केलच्या ग्राफपेपरवर मांडलाय. आम्ही कॉलेजमधे असताना या ड्रग अॅडिक्शनचे सिमटम्स, त्या व्यसनी मित्राना येणाऱ्या ‘टर्कीज’ अगदी जवळून बघितल्या आहेत. एक गोळी दिली की तो व्यसनी शांत किंवा नॉर्मल झालेला मी तरी पाहिलेला नाही. चित्रपटांमधून आदळआपट करणाऱ्या वेड्याना इंजेक्शन देऊन झोपवल्याचे अनेक सीन्स पाहिलेत, पण ते चित्रपटात...! हे नाटक असल्याने रिअल टायमिंगचा सेन्स असणं, हे प्रेक्षकांच्या लॉजिकशी जुळणारं असतं, त्यामुळे अशा दोन तीन गोष्टी या नाटकात खटकतात. मुळात संहिता हाती पडल्यावर ती केवळ चटपटीत, वेगवान आणि वेगळ्या पार्श्वभूमीशी संलग्न आहे म्हणून करायची तर मग आमच्या सारखे प्रेक्षक त्यात चूका शोधत राहतात. मला राधिकाच्या नोकरीचा आणि मंगेशच्या व्यसनाधिनतेचा इनर करंट काय असावा ? हा अद्यापही पडलेला प्रश्न आहे. डॉ. अतुलने, बास झाली प्रॅक्टिस आता अज्ञातस्थळी जाऊन जीवन व्यतित करायचे ठरवल्यावर मंगेशवर ट्रिटमेंट करायला दिलेला होकाराचे कारण फारच तकलादू वाटते, अर्थात ते मला वाटले, बाकी प्रेक्षकांना तसेच वाटायला हवं अशी काही सक्ती नाही. असो, परंतू लेखक म्हणून सुदीप मोडक यांनी रचलेला स्टोरी प्लॉट दिग्दर्शक नीरज शिरवईकरांनी साधलेल्या वेगाला सलाम करावा लागेल. शिरवईकरांचे नाव गेल्या चार पाच वर्षात निर्माते विश्वासाने घेऊ लागले आहेत. त्यांची डिरेक्टोरीयल मेथड (दिग्दर्शकिय तंत्र) फारच सिमलिफाईड (सुबोध) असावी.



कारण आजवर मी पाहिलेल्या त्यांच्या नाटकातील पात्रांच्या स्वभावात सहजता जाणवते, अट्टाहास कधीच दिसत नाही. त्यामुळे नाटकाचा कॅनव्हास कुठलाही असो त्यावरची पात्रे आपल्या आजुबाजूची वाटतात. तीन वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरील तीन व्यक्तिरेखा एकमेकांशी रिलेट होताना जो संघर्ष आणि परीवर्तनाचा डोलारा उभारतात तो नाटक म्हणून प्रेक्षणिय आहे. फक्त एकच गोष्ट खटकत राहते लेखक म्हणून मी भूमिका स्वीकारल्यावर धारावी परिसरातील मंगेश हा ‘गायकवाड’च का असावा ? आणि कॉर्पोरेट विश्वात ‘जोशी’ आडनावालाही पर्याय आहे की..! असो पण चैत्राली गुप्ते आणि सतीश राजवाडे यांना सुदीप मोडक अभिनयात भारी पडतो. बाकी तांत्रिक अंगांबद्दल बोलायचे म्हणजे तीच ती दोन नावे नेपथ्यात संबे आणि प्रकाशयोजनेत शित इथेही आहेत आणि दोघेही आपापली कामे चोख वाजवतातच. एक विचारप्रवर्तक आणि आशयघन नाटक वेगळ्या वाटेवरचं मराठी नाटक म्हणून
जरुर बघा.


-भालचंद्र कुबल 

Comments
Add Comment

Entertainment : मनोरंजन विश्वात ऐन उन्हाळ्यात गारवा...

सध्या उष्णतेच्या लाटेमुळे सर्वत्र होरपळ सुरू असताना, मनोरंजनाच्या माध्यमातून चार घटका करमणूक करणाऱ्या

Vaishnavi Kalyankar : वैष्णवीची पुढील चाल ‘घबाडकुंड’ !

घबाडकुंड’ हा रहस्यमय चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये एका महत्त्वपूर्ण

पुस्तकांनी असे घडवले

स्मृतीगंध : लता गुठे नुकताच पुस्तक दिन सर्वांनी साजरा केला. १९७२ ची गोष्ट. मी बालवाडीत जात होते. त्यावेळी

'देऊळ' पुन्हा उघडतंय...

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सतत काही ना काही घडत असते आणि त्यायोगे हे क्षेत्र कायम 'समथिंग हॅपनिंग' या पद्धतीत

इथे सगळेच रंगकर्मी...

राजरंग : राज चिंचणकर ट्यगृहात सर्वसाधारणतः रंगमंच आणि प्रेक्षागृह, असे दोन भाग असतात. रंगमंचावर रंगकर्मी नाटक

ग्रिप्समधल्या उत्क्रांतीवादाचे माकडचाळे

पाचवा वेद : भालचंद्र कुबल परीक्षा संपल्यात, सुट्ट्या सुरू झाल्यात आणि बालनाट्याचा सीझन सुरू झालाय. मे महिना आणि