Friday, May 29, 2026

जळगाव : यश जैनचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, तरुणीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी अन...

जळगाव : यश जैनचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, तरुणीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी अन...

जळगाव : अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीकडून लाखो रुपयांची रोकड आणि सोन्याची खंडणी उकळल्याप्रकरणी यश महेंद्रकुमार जैन या युवकाला अटक करण्यात आली होती. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपी यश महेंद्रकुमार जैन याचा जामीन अर्ज जळगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने (Jalgaon Additional Sessions Court) फेटाळून लावला आहे. प्रकरणाचे गांभीर्य आणि तपासाची आवश्यकता लक्षात घेऊन न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

नेमकं प्रकरण काय ?

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात (Chalisgaon City Police Station) दाखल गुन्ह्यानुसार, आरोपीने पीडित तरुणीशी मैत्री निर्माण करून व्हिडीओ कॉलद्वारे तिचे खाजगी फोटो व व्हिडीओ मिळवले. त्यानंतर हे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. आरोपीने पीडितेकडून सुमारे ८ लाख १२ हजार रुपये तसेच जवळपास ९० ग्रॅम सोन्याचे दागिने उकळल्याचा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

आरोपीच्या मोबाईलमध्ये ३३ महिलांचे फोटो

सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने न्यायालयात मांडले की, तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईलमध्ये ३३ महिलांचे फोटो आढळून आले असून, पीडितेला धमकावणारे आणि अश्लील स्वरूपाचे संदेश व चॅट्सही समोर आले आहेत. तसेच आरोपीने काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स (WhatsApp chats) डिलीट केल्याचेही तपासातून उघड झाले असल्याचा दावा करण्यात आला.

पीडितेच्या वतीने ऍडव्होकेट सय्यद रफीक अहमद यांनी न्यायालयात सविस्तर युक्तिवाद करत तपास अद्याप सुरू असून अनेक महत्त्वाच्या बाबींचा उलगडा होणे बाकी असल्याचे सांगितले. आरोपीच्या इतर इलेक्ट्रॉनिक खात्यांचा शोध, व्हॉइस सॅम्पल तपासणी तसेच आर्थिक व्यवहारांची पडताळणी करणे आवश्यक असल्याने जामीन मंजूर करू नये, अशी मागणी त्यांनी केली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, उपलब्ध प्राथमिक पुराव्यांवरून आरोपीने फोटो व व्हिडीओच्या आधारे पीडितेला धमकावत पैशांची मागणी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तसेच तपासाच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक पुरावे, आर्थिक व्यवहार आणि इतर तांत्रिक बाबींची सखोल चौकशी आवश्यक असल्याने आरोपीस जामीन देणे योग्य ठरणार नाही.

यामुळे न्यायालयाने यश महेंद्रकुमार जैन याचा जामीन अर्ज फेटाळून लावत तपास यंत्रणेला पुढील चौकशी सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >