Friday, May 29, 2026

Legislative Council : महायुतीत विधानपरिषदेच्या १५ जागांचे वाटप ठरले ? छत्रपती संभाजीनगरचा तिढा कायम

Legislative Council : महायुतीत विधानपरिषदेच्या १५ जागांचे वाटप ठरले ? छत्रपती संभाजीनगरचा तिढा कायम

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांसाठी महायुतीमधील जागावाटपाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून, एकूण १६ पैकी १५ जागांचे वाटप अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना या एका जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये अजूनही जोरदार रस्सीखेच सुरू असून हा तिढा अद्याप सुटलेला नाही. १ जून रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने, रविवारपर्यंत या उर्वरित जागेचा तिढा सोडवून महायुतीचा अंतिम जागावाटपाचा फॉर्म्युला अधिकृतपणे जाहीर केला जाण्याची दाट शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींच्या आकडेवारीचा विचार करता राज्यातील १४ ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट वर्चस्व आहे. असे असूनही, महायुतीमधील मित्रपक्षांना सोबत घेण्यासाठी भाजपने काही जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ जागांपैकी भाजप ११ जागांवर, शिवसेना ४ जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यानुसार शिवसेनेच्या वाट्याला ठाणे, यवतमाळ, नाशिक, आणि परभणी-हिंगोली या चार जागा जाण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग (कोकण) या दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे.

नागपूरच्या पोटनिवडणुकीसह भाजप १२ जागांवर ठाम

उर्वरित सर्व महत्त्वाच्या जागांवर भाजप स्वतःचे उमेदवार उभे करणार आहे. यामध्ये सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती आणि धाराशिव-लातूर-बीड या जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत विजयी झाल्यामुळे त्यांनी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे जाहीर झालेली नागपूरची पोटनिवडणूक ही भाजपची हक्काची जागा असून, ती देखील भाजपच्याच वाट्याला गेली आहे.

छत्रपती संभाजीनगरवरून रस्सीखेच

जागावाटपाचे हे सर्व गणित जुळले असले, तरी छत्रपती संभाजीनगर-जालना या मतदारसंघावरून अद्यापही तिढा कायम आहे. या जागेवर शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी ताणून धए असून, स्थानिक पातळीवरील समीकरणे लक्षात घेता कोणतीही बाजू माघार घेण्यास तयार नाही. पुढील २४ तासांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये होणाऱ्या अंतिम चर्चेत या जागेचा फैसला होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >