Tuesday, July 28, 2026

FDA Raid : सीसीआय', 'एमआयजी क्लब', जुहू जिमखान्यासह नामांकित क्लबवर 'एफडीए'ची कारवाई

FDA Raid : सीसीआय', 'एमआयजी क्लब', जुहू जिमखान्यासह नामांकित क्लबवर 'एफडीए'ची कारवाई

परवाने निलंबित; स्वयंपाकघरांमध्ये माश्या, झुरळांचा सुळसुळाट, बुरशी लागलेल्या भाज्या आणि अस्वच्छतेचे साम्राज्य

मुंबई : मुंबईतील अत्यंत उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या 'द क्रिकेट क्लब ऑफ इंडिया' (CCI), 'आर. के. जुहू जिमखाना' यांसारख्या नामांकित क्लब्सच्या स्वयंपाकघरांमध्ये माश्या, झुरळांचा सुळसुळाट, बुरशी लागलेल्या भाज्या आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (AFDA) तपासणीत उघडकीस आले आहे. अन्नसुरक्षेच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या या बड्या आस्थापनांविरुद्ध एफडीएने कठोर पाऊल उचलत त्यांचे परवाने तातडीने निलंबित केले आहेत. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली २४ ते २७ जुलै दरम्यान राज्यभरात विशेष धडक मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली.(Mumbai News)

एफडीएने २७ जुलै रोजी मुंबईतील ७ बड्या क्लब आणि रेस्टॉरंट्सची अचानक तपासणी केली. त्यापैकी ५ नामांकित संस्थांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले, तर एका आस्थापनेला कामकाज बंद करण्याचे आदेश देण्यात आले. चर्चगेट येथील 'द क्रिकेट क्लब ऑफ इंडिया'च्या स्वयंपाकघरात आणि कचऱ्याच्या जागेवर जिवंत झुरळे व माश्यांचा प्रादुर्भाव, ओट्यांवर झाडूचा वापर, बुरशी लागलेल्या भाज्या, मुदत संपलेले खाद्यपदार्थ आणि शाकाहारी-मांसाहारी अन्नाची एकत्रित अयोग्य व्यवस्था आढळून आली. तर, 'आर. के. जुहू जिमखाना' व 'द अपर्णा जुहू जिमखाना' येथे अन्न शिजवण्यासाठी अयोग्य तापमान, भिंती व छताचे पपडे अन्नात पडणे आणि गंजलेल्या उपकरणांचा वापर सुरू असल्याचे उघड झाले. याशिवाय, वांद्रे येथील 'एमआयजी क्रिकेट क्लब'मध्ये अनधिकृत संस्थेमार्फत बेकायदेशीर कामकाज सुरू असल्याचे आढळले, तर 'द विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब'मध्ये अस्वच्छता आणि गटारांची दुरवस्था दिसून आली. मालाड येथील 'गोरेगाव स्पोर्ट्स क्लब'मधील आस्थापनेकडे वैध परवानाच नसल्याने त्यांना व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली.

राज्यभरात कोट्यवधींचा भेसळयुक्त साठा जप्त

एफडीएने हॉटेल्स व क्लब्सवरच नव्हे, तर राज्यभरात अवैध गुटखा, बनावट दूध आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात व्यापक मोहीम राबवली. मुंबई, कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती विभागांतून ४६.५९ लाख रुपयांचा गुटखा व पानमसाला जप्त करून १८ गुन्हे दाखल करण्यात आले असून २२ जणांना अटक करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे पाम तेल व अज्ञात पावडरपासून म्हशीचे कृत्रिम दूध तयार करणारे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले, तर नाशिकच्या सिन्नरमधून २ हजार लिटर दुर्गंधीयुक्त गाईचे दूध जप्त करण्यात आले. जळगावमधून १६५ किलो संशयास्पद मावा आणि छत्रपती संभाजीनगरमधून ४४ हजार रुपयांचे भेसळयुक्त सोयाबीन तेल जप्त झाले. पुणे विभागातही निष्कृष्ट दर्जाचे ड्रायफ्रूट्स, बेकरी उत्पादने व मिठाईचा ४५.७० लाखांचा साठा जप्त करण्यात आला.

११ जणांचे परवाने निलंबित

या चार दिवसांच्या मोहिमेदरम्यान एफडीएने ८१ हॉटेल्स व क्लब्सची तपासणी करून ११ जणांचे परवाने निलंबित केले, तर १२ जणांना सुधारणा नोटीस दिली. तसेच १६ आस्थापनांमधून ५८.०३ लाख रुपयांचा २१ हजार ४३४ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला. नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबद्दल शंका असल्यास किंवा भेसळीचा संशय आल्यास त्यांनी तात्काळ टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर किंवा complaints.mahafda.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन एफडीए प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >