kokan: येवा कोकण आपलोच आसा!

खाचखळग्यातून जाणारी वाट कडेकपारी पार करत थेट सह्याद्रीच्या पायथ्याशी जाऊन मिळते, जिथे मातीचा कण न् कण धुरळा होत तांबड्या रंगात नहातो. घाटमाथ्यावरील सह्याद्री पर्वतराजीच्या हिरव्या वळणवाटा आडव्या तिडव्या रस्त्याला वाकुल्या दाखवत खेड्याकडे धाव घेतात. चाकरमान्यांना वर्षातून अनेकदा खुणावणारी कोकणातील रम्य गावखेडी शब्दात मांडणं कठीण, त्यासाठी अख्खा कोकण जगता यायला हवा. तृप्ती रस अनुभवण्यासाठी पर्यटकांची रिघ कोकणच्या समग्र सौंदर्यतेचं निशाण फडकवते. फिरण्याची जबरदस्त इच्छा असलेली मंडळी हिरव्या वळणाची कास धरतात तेव्हा कोकण त्यांना आपलसं करतो. नैसर्गिक संपदेने, जैवविविधतेने नटलेले विशाल किनारे, ताडामाडासोबत वाढलेली सुरंगीची बन, केतकीचे गंधाळ रान, पानवेली, औषधी झाडपाल्याच्या वनस्पती स्वागत करण्यास कायम सज्ज असतात. वसंतोत्सवाला तीट लावत, डोळ्यांचं पारणं फेडणारी आकर्षक रंगीत फुलांची बरसात म्हणजे सतरंगी इंद्रधनू आभास. गाभाळलेल्या मौसमातील रसरशीत चविष्ट करवंद, जांभूळ, करमलं, चिंच, बोरं सारखा रानमेवा पाहूनचं मन तृप्त होतं.


शेतातील आंबा-काजूची झाडं, दारासमोरील शेवंती, कळीमोगरा, शेवगा, फणस, निरफणस, वाफेतले अननस, लाल मिरच्या, पेरूची झाडं, केळीबागा, भातशेती, पाण्यावर पोसलेली पालेभाजी, सागाचेवृक्ष, गरम मसाले, विचित्र पक्षी, फुलंपाखरं, वन्यजीव, प्राणी, रानगवे, शिंगरू सारखे दुर्मिळ प्राणी. सागरी मत्स्य व्यवसायाला पूरक उद्योगव्यवसायाची जोड, पोहा-तांदूळ पापड, कुरडया, कोकम, आवळा आगळयुक्त सरबत. गड, किल्ले, जलदुर्ग, नदी, नाले, पाट, धरण, बंधारे, सह्याद्रीच्या कुशीत मुरलेली वारा पावसाशी नातं सांगणारी कसदार माती, देवतांची, कुळं पुरुषाची पुरातन मंदिर, गावाबाहेरच्या वेतोबा, खेतोबासह टुमदार मंगळूरी कौलारू घरं आणि घरात राहणारी प्रेमळ माणसं इथली खासियत आहे. सर्वार्थाने प्रसिद्ध असलेल्या कारणाने पर्यटनाच्या दृष्टीने कोकण दौरा मनःशांती देणारा ठरतो. महाराष्ट्रात विविध जिल्हे आपली वेगळी ओळख राखतात तरी कोकणातल्या सौंदर्याची गोष्ट वेगळी आहे. कोकण म्हणजे स्वर्ग, कोकण म्हणजे देवसृष्टी. असा सुंदरतेचा मिलाप बघण्यासाठी, निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी कोकण तळकोकण समजून घेणं म्हणजे निसर्गाच्या भाषेला समजून घेण्यासारखं आहे. सह्याद्री पर्वतरांगेत येणाऱ्या गाव खेड्याला समजून घेताना प्रथम तिथल्या स्थानिक कोकणी माणसाचं हृदय जाणून घ्यावं लागेल.


गोमू माहेरला जाते हो नाखवा,
तिच्या घोवाला कोकण दाखवा.
कोकणची माणसं साधी भोळी,
काळजात त्यांच्या भरली शहाळी.


शहाळ्यासारखी मऊशार आणि मधासारखी गोड माणसं कोकणची शान आहेत. शेतीमातीच्या कवितेतून कोकणासह तिथल्या माणसाच्या भव्य दिव्यतेची ओळख होते. आंबा पिकतो, रस गळतो कोकणचा राजा झिम्मा खेळतो याच गाण्यातून कोकण वासियांच्या संपन्नतेची दुसरी सुंदर बाजू दिसून येते. खडतर स्थितीत असलेल्या कुटुंबातल्या नेटक्याचं पण सुशेगाद जीवन गोडीला कायमचं बहर असतो. उत्सवात खेळले जाणारे झिम्मा, फुगड्या, दशावतार, बाल्यांचा रोमहर्षक खेळ इथल्या जीवनमानावर प्रकाश टाकतात. ज्यामध्ये संस्कृतीशी निगडीत भाषा साहित्यावर विचारांचं आदान प्रदान असतं. परंपरेशी नात सांगणाऱ्या फळाफुलांचं कौतुक असतं. कलेचा जागर असतो. विश्वात नंबर वन ओळखला जाणारा हापूस कोकणची शान असल्याने आंब्यात आंबा हापूस आंबा म्हणत जगभर त्याचा डंका वाजतो. नैसर्गिक संपत्ती, सुखसमृद्धी, सांस्कृतिक वलय आणि ढासून भरलेल्या परंपरा इथल्या सोंदर्याबरोबर आंब्याचं मधाळ, रसाळ रूप मोहिनी घालतात. आम्र खाण्याची लालसा वाढते. अभिरुची वाढून खाणारे तुटून पडतात फळावर. आंबे मोहोराचं घमघमणारं मोहळ, शेतीभाती, नारळी पोफळीच्या बागा, समुद्राची अथांगता, संपन्नतेची खाण आणि किनारपट्टीच्या वैभवात भर घालणारी तिथली साधी माणसं ही कोकणची ओळख अजूनही कायम आहे. परशुरामाचा वरदहस्त असलेल्या भूमीवर काळ्या तांबड्या आईची कृपा होते. निसर्गाच्या हाळीला ओ देत शिगमा, पालखी सोहळा, रथयात्रा, छत्रोत्सव, गौरीगणपती, दिवाळी सारखे सण हातात हात घालून नांदतात. वैशाख महिन्यात आंब्यावर मोहोराचं रान पेटतं तर वसंतात उन्हं शेकवत केशरी रंग झळाळून उठतो. कलमावर वसंत बहरतो. नव्याचं नवपणं घेऊन वृक्षाला डोहाळे लागतात. पान्हा फुटावा तशी फुलं मोहरतात, पानासंगे हिरवीगार होत कळ्या खुलतात. लगडलेल्या अवस्थेत छोट्या कैऱ्या फांद्यांवर दाटीवाटीने स्थिरावतात.



क्षृधा क्षमवणाऱ्या तृप्तीरसाची निर्मिती व्हायला अवकाश असल्याने सकस पाणसाठ्यावर झाडं पोसली जातात. तापलेल्या आमराईत गोडाची रसयात्रा भरू लागते. आयुष्यासारखचं निसर्गाचं देणं एकदाचं मिळतं. त्याला सार्थकी लावणं म्हणजे प्रयत्न करणं होय. मेहनतीच्या जोरावर मातेसमान असलेल्या निसर्गाच्या संवर्धन संरक्षणाची जबाबदारी सूचक भूमिकेतून निभावण्याचं काम वेळोवेळी केल्याने निसर्ग खुलतो. पशूपक्षांना आमंत्रण देतो. आमराईत उष्णता वाढू लागते. कोकिळ पंचम गाऊ लागतो. याचवेळी देवगड हापूस जन्माला येतो. सगळ्यांचा बापूस देवगड हापूसाची उत्तम वेळ म्हणजे रखरखीत असलेला एप्रिल मे महिना. हापूस आंबा म्हणजे कोकण मातीतील एक अमृताचा ठेवा ज्याच्या येण्याने कोकणात दरवळ सुटून कोकणी माणसाचा आनंद गगनात मावेनासा होतो. एकदा का देवगड हापूस चाखला की, इतर आंबे त्याच्यापुढे फिके वाटतात. त्याच्या रूपकांतीची तुलना न केलेलीच बरी. कारण नुसत्या सुवासानेचं मंतरल्यासारखं होण्याचा त्याचा गुण त्याला इतरांपेक्षा वेगळा ठेवतो. हापूसच्या कलमी झाडांना लगडलेले, हाताला लागणारे हापूस आंबे पाहाताना मिळणारा आनंद अच्युतम ठरतो. हे सुख ज्याच्या भाग्यात येतं तो त्यावेळचा राजा ठरतो. निसर्गाची मेहेरनजर ज्याच्यावर आहे तो कोकणी माणूस जगात सर्वात सुखी आहे. मौसमी आंब्या फणसाच्या गोतावळ्यात मुरलेल्या कोकणी माणसाचा पाहुणचार हा दिमाखदार म्हणावा लागेल. आंब्याक बघून ज्याचा कालीज नुस्ता पिलवटता त्योचं खरा कोकनी मानूस. बोलीभाषेच्या उपरांत केला तुका आणि झाला माका म्हणत आयुष्यातला आनंद वेचताना इथली माणसं दमत नाहीत. मासे खायला, सौंदर्य पहायला, दाखवायला कोकण पुरे पडतो. पावसाळ्यात पुरामुळे पन्नासहून अधिक गावांचा संपर्क तुटला तरी चालेल. रत्नागिरी, चिपळूण, दापोली अर्धी पाण्याखाली गेली तरी चालेल. सावित्री, पाताळगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली तरी चालेल. कोकणचो कॅलिफोर्निया कधी होईल? त्याची देवाक काळजी. संकट स्थितीत आम्ही सक्षम आहोत. नैसर्गिक आपत्तीला तोंड देत उभा राहिलेला कोकणी माणूस तुमच्या सेवेशी हजर राहिल्याची उदाहरणं साक्ष देतील. न संपणारं हे पर्व कोकणाच्या मातीशी मूळ राखून आहे.


_पूजा काल
Comments
Add Comment

वकिली सेवा पुरवणारी ‘रेस्ट द केस’

शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी कधी चढू नये, असं म्हटलं जातं. कारण कोर्ट-खटला यामध्ये खूप वेळ जातो. सर्वांत

खादी ग्रामोद्योगाची सुवर्ण कामगिरी

भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उत्पादन,

Narendra Modi : सोने खरेदी नंतर; देश प्रथम

भारतीयांना सोन्याचे आकर्षण पूर्वीपासूनच आहे. पण मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या सोन्याच्या खरेदीमुळे देशाचे परकीय

वेदनेचा हुंकार

अंधारल्या दिशांना दु:खाची सल सलीला घायाळ जखमांचे भय भयाला भयावह अनामिक चिंता चिंतेच्या

आईच्या काळजीतून बनला ‘विल्व्ह’ ब्रँड

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे कोईम्बतूरमधल्या एका आईला आपल्या लहान मुलीच्या त्वचेची काळजी वाटली. तिच्या त्वचेची

सौर ऊर्जा निर्मितीचा वेग आणि ग्रीडची कसोटी

भारत आज स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेकडे मोठ्या वेगाने वाटचाल करत आहे, केंद्र सरकारने जागतिक स्तरावर पर्यावरण