माेरपीस-पूजा काळे
आकाशगंगा, सूर्य, चंद्र, तारा आणि या ताऱ्यात अवघा महाराष्ट्र झळकतोय सारा. निसर्ग सौंदर्याने बहरलेला, बुद्धिवंतांच्या चातुर्याने रंगलेला, साधुसंत, महंत, कलाकार यांची कर्मभूमी असलेला भगवा महाराष्ट्र नवोन्मेषशाली अाविष्काराचं भूषण आहे. महाराष्ट्रात भागवत धर्माची पताका संत नामदेव, संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या लेखणीतून अवतरली. त्यांनी अभंग, कीर्तनाच्या माध्यमातून ती पुढे चालवली. ही अद्भुत सामंजस्याची दिंडी उभारताचं दिंडीतून वारी घडली. वारी म्हणजे अभिगमनाचा एक उपासना वर्ग होय. आज शेकडो वर्षांचा इतिहास मागे ठेऊन जाणाऱ्या दिंड्या मैलोनमैल मार्गस्थ होत पाहताना आपल्याला स्फुरण चढतं. ‘धाव विठ्ठला धाव पाव विठ्ठला’ म्हणत आपण त्याला पुकारतो. आश्वासक प्रेरणा घेऊन उभी ठाकलेली दिंडीतील वारकऱ्यांच्या मनातली परमेश्वरा विषयीची भक्तीपर ओढ असावी. जग प्रवाहाच्या उलट दिशेने जायला संतांकडे शिकल्याने वारी परंपरा माऊली शब्द व्युत्पत्ती स्थितीची ओळख घडवतो. यामुळे भरीव बदल साधण्याचं काम साध्य होतं. इतर ज्येष्ठ संतांबरोबर संत कान्होपात्रा, मुक्ताबाई, जनाबाईंसारख्या संत स्त्रियांनी आपले मुक्त विचार परखडपणे मांडले. त्या काळात स्त्री संताचा हातभार हा मुख्यतः भक्तीचा कळस गाठून कौशल्य पणाला लावण्याचं कसबी काम होतं. खरा तोचि संत सोशी जगाचे आघात म्हणत माझ्याकरिता मी नसून मी या लोकांकरिता आहे तसचं माझ्याकरिता जग नसून मी या जगाकरिता आहे असे मानणारे संत या भूमीत जन्मले.
सध्या पावसाच्या सरीला मागे टाकत आषाढवारीचे दिवस जोर धरू लागलेत. देवाच्या भेटीगाठीसाठी निघालेल्या भक्त आणि वारकऱ्यांच्या दिंड्या या धार्मिक यात्रा नव्हेत, तर त्या आहेत एका मानवतेशी जोडलेल्या समतेच्या ओल्या मातीच्या जिवंत सेवाभावी परंपरा पुढे घेऊन जाणाऱ्या एकनिष्ठ दिंड्या. ज्या पंढरपूर वारीत एकमुखी नामाने ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर जगण्याची दिशा निश्चित करतात. हजारो, लाखो वारकरी तहानभूक विसरून घोषनाम संकीर्तनातून भक्तिभाव समानतेचा संदेश पंढरीच्या वाटेवरती तल्लीन होऊन सोडून देतात. आपल्या संतांच्या किमयागार बुद्धीची कल्पना करून पाहा! बरंच काही मागे ठेऊन जाताना बंधुता सेवाभावाच्या वारीत ते जोडले गेलेत. जोडण्याची जिवंत परंपरा म्हणजे आषाढ, कार्तिक वारी होय. तहानभूक विसरून लाखोंच्या संख्येने मुखी विठूचा गजरासह, नाम संकीर्तनाची आस तसेच मनात भरलेला भक्तिभाव, समानतेचा संदेश देत पावलं पंढरपुरीस ओढली जातात. माऊलीच्या भेटीची एकचं आस आणि एकचं ध्यास बाळगत वातावरण माऊलीमय होऊन जातं. वारीत सगळे माऊली होऊन जगतात आणि जगायला शिकवितात. वारकरी संप्रदायात स्त्री-पुरुष गरीब श्रीमंतीचा भेदभाव संपुष्टात आलेला असतो. काळाबरोबर समाजाची मानसिकता बदलत असली तरी वारीत परस्पर प्रेम, सहकार्याची भावना आणि सन्मानावर भर म्हणजे त्रिसूत्रीचा आदर होताना दिसतो. संत शिकवणुकीचा अध्याय पाळला जातो. समाजाला सत्याची ओळख करून देण्यात संतांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं असल्याने पंढरपूरची वाट दाखवणारे पुण्यवान संत आपल्यात नसले तरी आपल्या स्मरणात ते आजही आहेत. थोर संत सहवास याहून भाग्य दुसरे नाही खास. भारताला विशेषतः या महाराष्ट्राला संतांची मोठी गौरवशाली परंपरा लाभल्याने महाराष्ट्राची भूमी संतभूमी म्हणून ओळखली जाते ती याचं कारणास्तव. रत्नांच्या खाणीतून साहित्य संस्कृतीचा पाया रचला गेला. संतांच्या शिकवणुकीतून महाराष्ट्र चिंतनशील बनला. समाज प्रवर्तक सकारात्मक विचारांनी प्रामाणिक, बुद्धिवादी झाला. या पोषक वातावरण जात, पात, धर्म, पंथ, भाषा, परंपरा, साहित्य, संस्कार, वैचारिक जडणघडण बदलत गेली, जेणेकरून आपला थोर सांस्कृतिक वारसा पुढे गेला. या भूमीवर प्रत्यक्ष देवाधिदेवाला अनुभवणं कठीण असल्याने संतांना चालते बोलते देव म्हटले जाते ते याच कारणासाठी. ज्याचे चित्त वित्त भगवंताकडे असते, या गूढ मापदंडात जो बसतो तो खरा संत ठरतो हीच त्यांची ओळख ठरते, अशा शाश्वत सत्याची ओळख करून देणारी मराठी महाराष्ट्रातील संत परंपरा समृद्ध आणि महान आहे.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत एकनाथ यांसारख्या संतांनी मानवतेचा सहिष्णुता धर्म शिकवला. विविध अभंग, ओव्या, कीर्तन, भजन, भारूडातून सामाजिक समता प्रस्थापित केली, अंधश्रद्धा व जातीभेद दूर करत समाज प्रबोधन केले. संतांनी जगातली राज्ये मिळवली नाहीत पण त्यांनी जगावर राज्य केले म्हणून संतांना चालते फिरते ईश्वररूप मानले गेले. संतांचा भावुक दयाळूपणा अवगत करून आपले अवगुण घालवण्याचा सोपा उपाय संत संगतीत प्राप्त झाल्याने ना केवळ त्यांनी स्वतःचाच उद्धार केला, तर समस्त समाजाला भक्तीचा, प्रेमाचा आणि मानवतेचा मार्ग दाखवला, धर्म सांगितला. थोर संत शिकवण मानवी मूल्यावर आधारित असल्याने केवळ आज्ञा पालन करणे म्हणजे संतसेवा करणे नव्हे त्यावर तसे वागणे हा झाला शिरस्ता. संत लिखाणातल्या अभंगांतून ईश्वर सर्वांचा आहे हा संदेश स्पष्टपणे व्यक्त होतो, त्यामुळे पंढरीची वारी समाजातील भेदभाव मिटवणारी, माणुसकीची नाती दृढ करणारी अद्वितीय परंपरा ठरत आहे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ, नांदतो केवळ पांडुरंग, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल! कायम त्याच्या अवतीभवती फिरणारं शरीर पंढरपूर होतं तर अंतरंग विठ्ठलवासाने भरून पावतं. त्याच्यावरील अढळ श्रद्धेतून भक्ती जोम धरू लागते. या निर्गृण निराकाराची उपासना प्रत्येकाला जमेलच असं नाही. पण त्यातील सगुण उपासना म्हणजे भक्ती भगवंताचे रूप मानून मनात ठसवतो. मग वारीला निघताना देहभान विसरायला लावणाऱ्या अंतःकरणातील त्याच्या रूपाचा ध्यास वाढतो आणि कधी पाहिन त्या सर्वस्व रूपाला भाव प्रकट होतो. सर्वसामान्यांना ज्ञान नको असते तर दैनंदिन जीवनात एक आधार हवा असतो. आधार व्यक्तिनिष्ठ असल्याने त्याची उपासना होते. मानवी जीवन समस्याग्रस्त झाल्यावर ईश्वर हाच एक आधार असतो. ज्ञान आणि भक्ती एका नाण्याच्या दोन बाजू असल्याने ज्ञान दानाच्या ठिकाणी भक्तीची ओढ असायला पाहिजे अशी शिकवण देणारे संत आपल्या महाराष्ट्रात जन्मले आहेत. ज्यांनी या महाराष्ट्राचा विकास साधला. नुसती भक्ती अंधश्रद्धेला वाव देते पण ज्ञानयुक्त भक्तीतून डोळस श्रद्धा वाहू लागते ही शिकवण आपल्या संतांनी शिकवल्यामुळे ज्ञानमार्गाने जाणाऱ्या संत तत्त्वज्ञानाला भक्तीची जोड मिळता अध्यात्मिक प्रगतीची वाटचाल जोमाने होते. संतांच्या ग्रंथांचा अर्थ कृतीनेच कळतो. साहित्याची सेवा घडताना भाषेची सेवा करायला संत विसरले नाहीत. शुभदिनी शुभप्रसंगी भाषेचा करू सन्मान, माझी मायबोली मराठी महान. मायेचा नाद प्रसवणारी मायबोली म्हणजे मराठी भाषा अनंत शाखांनी बहरली. तिच्या शब्दातले कोमल भाव गारूड घालतात मनावर. भाषा म्हणजे अभिव्यक्त होण्याचं माध्यम. या हृदयीचे त्या हृदयाला पोहोचवण्याचं सामर्थ्य म्हणजे भाषा.
मातेसमान प्रिय असणाऱ्या मधुर भाषेला संत तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर,
शब्दची आमुच्या जीवनाचे जीवन |
शब्द वाटू धन जन लोका |
गतीमान मराठी भाषेच्या व्युत्पत्तीमुळे या जीवनात क्रांतीपूर्ण बदल झाले. सातवाहनांच्या काळात देवतांचा स्तुतीपर असलेल्या वारकरी संप्रदायातील संत तुकाराम महाराजांच्या गाथा याचं कारणास्तव प्रसिद्ध झाल्या. संस्कृत भाषेनंतर सामान्यांची प्राकृत भाषा नावारूपाला आली. संत ज्ञानेश्वर महाराज लिहिते झाले. त्यावेळच्या समकालीन संतांनी ती भाषा पुढे नेली. आपल्या प्राकृत भाषेत मराठीचा गौरव करणारे ज्ञानेश्वर माऊली सांगतात.
माझा मराठीची बोलू कौतुके |
परि अमृतातेंही पैजासि जिंके|
ऐसीं अक्षरें रसिकें | मेळवीन ||
संत ज्ञानेश्वरांनी मराठीत भगवद्गीतेची टीका लिहून नव्या साहित्य पर्वाची सुरुवात केली. समाजाला वैचारिकतेची वाट दाखवत अज्ञान अंधकाराच्या कोषातून बाहेर काढले. त्यातून ज्ञानेश्वरीसारखा अमूल्य ठेवा महाराष्ट्राला लाभला. महाराष्ट्र भूमीच्या उत्कर्षासाठी संत वचनातील परीपूर्ण मार्गदर्शक तत्त्व उपयोगी पडली. संत ज्ञानेश्वरानंतर संस्कृत भागवतपुराण ग्रंथ मराठीत लिहणारे संत एकनाथ यांनी भावार्थ रामायण मराठीत आणले. त्यावेळेच्या मौखिक भाषेपेक्षा लिखित साहित्य अमर असल्याने मराठी सण उत्सव, व्यवहार संबंधित गोष्टी सर्व पातळ्यांवर राबविल्या गेल्या. संतांची महती थोर आहे. अशी थोर पुण्य संत परंपरा महाराष्ट्राला लाभली. त्यांचे अस्तित्व देहात नसून त्यांच्या वचनात असल्याने आपण त्या वचनाशी बांधिल आहोत. संत जसे बोलतात तसेच वागतात. समृद्धीच्या काळात मन कौमुदी कमळ पाकळ्यांप्रमाणे नाजूक असलेले संत अति कठीण परिस्थितीत पर्वतासारखे महाकाय होतात हे मान्य करता परिस धातूपेक्षा संतांचे महत्त्व अधिक जाणावे कारण परिस लोखंडाचे सोने करतो तर संत सामान्यांचे असामान्य भल्या सूज्ञ माणसात रूपांतर करतात. आत्मज्ञान, सद्गुण, भक्तीमार्ग ज्यांनी अनुभवलेला असतो तोच खरा संत होय. थोर संत विषयात देव पाहातात तर आपण देवात विषय पाहतो हा फरक असल्याने काम, क्रोध, मद, मोह, मत्सर जिथं संपतो तिथं संत जन्माला येतात. संतांचे विचारकार्य हे मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे असल्याने त्यांनी दिलेल्या नैतिक मूल्यांमधून महाराष्ट्रात समूळ संस्कृतीचे उत्तम संस्कार जनमानसावर झालेले आहेत. संतांचे कार्य पिढ्यान पिढ्या संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी राहील.