दी लेडी बॉस-अर्चना सोंडे
एखादी कल्पना नीटपणे अमलात आणली तर छोट्याशा गुंतवणुकीतूनही कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभा राहू शकतो. पंजाबच्या जालंधरची पलक मिधाची कहाणी याचाच जिवंत पुरावा आहे. अवघ्या ५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू झालेला ‘पलक नोट्स’ हा हेल्थ आणि वेट लॉस सप्लिमेंट्स ब्रँड आज दरमहा १५ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करणारा यशस्वी व्यवसाय ठरला आहे.पलक मिधा हिने जालंधरमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर रुरकी येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगची पदवी घेतली. पुढे पुण्यातून एमबीए पूर्ण केले. कॉलेजमध्येच तिची ओळख परीक्षित यांच्याशी झाली. दोघांचे २०१० मध्ये लग्न झाले. पतीच्या नोकरीमुळे ती जर्मनीत स्थायिक झाली. जर्मनीमध्ये तिने अनेक नामांकित कंपन्यांमध्ये सेल्स इंजिनीअर आणि व्यवस्थापकीय पदांवर काम केले. मात्र, करिअर उत्तम सुरू असतानाच आवड निर्माण झाल्यामुळे ती आरोग्य आणि पोषणशास्त्राकडे वळली. तिने सप्लिमेंट्स आणि न्यूट्रिशनचे विशेष शिक्षण घेतले. ती प्रमाणित सल्लागार बनली. पलकने सर्वप्रथम आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या कुटुंबासाठी केला. तिच्या वडिलांना स्पॉन्डिलायटिसचा त्रास होता, तर आईला ऑटो-इम्यून थायरॉईडची समस्या होती. योग्य आहार, जीवनशैलीतील बदल आणि स्वतः विकसित केलेल्या सप्लिमेंट्समुळे दोघांच्या आरोग्यात मोठी सुधारणा झाली. वडिलांनी वयाच्या ५८व्या वर्षी नवीन व्यवसाय सुरू केला, तर आईची थायरॉईडची समस्या नियंत्रणात आली. लठ्ठपणाशी झुंज देणारा तिचा धाकटा भाऊ प्रणवही तब्बल ४० पाउंड वजन कमी करण्यात यशस्वी झाला. याच यशातून व्यवसायाची बीजे रोवली गेली.
२०१८ पासून पलकने फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडीओ तयार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ती ब्लॉग लिहायची. मात्र, लोक व्हिडीओ अधिक आवडीने पाहतात हे लक्षात आल्यानंतर तिने व्हिडीओ कंटेंटवर भर दिला. हळूहळू तिची लोकप्रियता वाढत गेली. आज पलकच्या फेसबुकवर १० लाखांहून अधिक फॉलोअर्स, 'पलक नोट्स' यूट्यूब चॅनलवर ५ लाखांहून अधिक सदस्य आहेत. ‘Fit With Palak' या दुसऱ्या चॅनलवर हजारो फॉलोअर्स आहेत. हीच डिजिटल उपस्थिती तिच्या व्यवसायासाठी मोठी ताकद ठरली. नोव्हेंबर २०१९ मध्ये पलक आणि तिचा भाऊ प्रणव यांनी पलक स्टार्क प्रा.लि. 'Palak Stark Pvt. Ltd.' ची स्थापना केली. सुरुवातीला त्यांनी ADK (Vitamin A, D3 आणि K2) सप्लिमेंट बाजारात आणले. विशेष म्हणजे पहिली उत्पादन बॅच ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच पूर्ण विकली गेली. यामुळे कंपनीला आत्मविश्वास मिळाला आणि उत्पादनांची संख्या वाढत गेली. आज कंपनीकडे ४५ हून अधिक हेल्थ सप्लिमेंट्स, स्वतःची वेबसाइट, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीस्थान आणि देशभरातील लाखो ग्राहक अशी मजबूत व्यवस्था उभी आहे.
प्रणव अमेरिकेतून एमबीए पूर्ण करून भारतात परतला आणि त्याने कंपनीच्या विस्ताराची जबाबदारी स्वीकारली. आज कंपनीत १७० कर्मचारी, शेकडो प्रशिक्षित आहारतज्ज्ञ, ग्राहकांसाठी मोफत मार्गदर्शन, उत्तम प्रशिक्षण प्रणाली अशी भक्कम यंत्रणा कार्यरत आहे. कंपनीचा दावा आहे की, त्यांनी ६० हजारांहून अधिक लोकांना वजन कमी करण्यास मदत केली आहे. ५० हजारांहून अधिक ग्राहकांना थायरॉईडसंबंधी लाभ झाला आहे. हजारो महिलांनी PCOS आणि हार्मोनल समस्यांवर सकारात्मक परिणाम अनुभवला आहे. पलक आजही जर्मनीतच राहते. तिचा दिवस पहाटे ३ वाजता सुरू होतो. तीन तास ती चयापचयासंबंधी आजारांवर संशोधन करते. त्यानंतर भारतातील टीमसोबत ऑनलाइन बैठका घेते. त्यांच्या कंपनीत जर्मन कार्यपद्धती (SOPs), स्पष्ट जबाबदाऱ्या आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनाला विशेष महत्त्व दिले जाते. दुपारी ती व्यायाम करते, महिलांसाठी मोफत लाईव्ह फिटनेस सत्रे घेते आणि संध्याकाळी अध्यात्म व वाचनासाठी वेळ राखून ठेवते. पलक आणि प्रणव यांच्या नात्यात केवळ भावंडांचे नाते नाही, तर विश्वास, जबाबदारी आणि समान ध्येय आहे.
पलक कंपनीची रणनीती, संशोधन आणि उत्पादन विकास पाहते, तर प्रणव विक्री, मार्केटिंग, ऑपरेशन्स आणि टीम व्यवस्थापन सांभाळतो. दोघेही दररोज सकाळी ऑनलाइन बैठक घेऊन दिवसातील तीन प्रमुख उद्दिष्टे निश्चित करतात. ‘पलक नोट्स’चे सर्वात मोठे यश म्हणजे त्यांनी उत्पादन विकण्यापूर्वी लोकांचा विश्वास जिंकला. मोफत आरोग्यविषयक मार्गदर्शन, सातत्यपूर्ण व्हिडीओ, ग्राहकांशी थेट संवाद आणि वैज्ञानिक माहिती यामुळे त्यांच्या ब्रँडला मोठी विश्वासार्हता मिळाली. याच विश्वासामुळे छोट्या गुंतवणुकीत सुरू झालेला व्यवसाय आज देशातील वेगाने वाढणाऱ्या हेल्थ ब्रँडपैकी एक बनला आहे. पलक मिधाची कहाणी सांगते की, ज्ञान, सातत्य, संशोधन आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर यांची जोड मिळाली, तर जागतिक स्तरावर बसूनही भारतात यशस्वी उद्योग उभा करता येतो.