IPL 2026 : वानखेडेवर राजस्थानचा 'रॉयल' विजय

मुंबई हरली ; पंजाब - कोलकाताचेही स्वप्न तुटले :


मुंबई (प्रतिनिधी) :
आयपीएल २०२६ च्या अंतिम टप्प्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात राजस्थान रॉयल्सने यजमान मुंबई इंडियन्सला ३० धावांनी धूळ चारली. राजस्थानच्या फलंदाजांनी सामूहिक कामगिरीच्या जोरावर उभारलेल्या २०५ धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना मुंबईची फलंदाजी गडगडली. सामनावीर जोफ्रा आर्चरच्या (३/१७) धारदार गोलंदाजीपुढे सूर्यकुमार यादवची (६० धावा) एकाकी झुंज अपयशी ठरली. यासह राजस्थान रॉयल्सचा संघ हा आयपीएल २०२६ स्पर्धेतील प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरला आहे.



प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली होती. वैभव सूर्यवंशी (४) आणि कर्णधार रियान पराग (१४) स्वस्तात परतले. मात्र, यशस्वी जैस्वालने १७ चेंडूंत २७ धावा करत डावाला गती दिली. त्यानंतर ध्रुव जुरेल (३८ धावा) आणि दासुन शनाका (२९ धावा) यांनी मधल्या फळीत उपयुक्त खेळी केली. ध्रुव जुरेल बाद झाल्यावर आरआरच्या संघाने जोफ्रा आर्चरला फलंदाजीत बढती दिली. अखेरच्या षटकांमध्ये जोफ्रा आर्चरने अवघ्या १५ चेंडूंत ३ षटकार खेचत ३२ धावांची वादळी खेळी केली, तर रवींद्र जडेजाने नाबाद १९ आणि नांद्रे बर्गरने अवघ्या ३ चेंडूंत नाबाद १० धावा कुटल्या. यामुळे राजस्थानने २० षटकांत ८ बाद २०५ धावांचे विशाल आव्हान उभे केले. मुंबईकडून शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.



मुंबईची खराब सुरुवात२ ०६ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा पहिल्याच षटकात जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्यापाठोपाठ नमन धीर (६), रायन रिकलटन (१२) आणि टिळक वर्मा (३) झटपट बाद झाल्यामुळे मुंबईची अवस्था ४ बाद ३८ धावा अशी बिकट झाली होती.



चार धक्के बसल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्स (३३ धावा) यांनी पाचव्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी करत मुंबईचा डाव सावरला. सूर्याने अवघ्या ३२ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. विल जॅक्स बाद झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने मैदानात येत १५ चेंडूंत ३४ धावांची (३ चौकार, २ षटकार) आक्रमक खेळी करत मुंबईच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, जोफ्रा आर्चरने हार्दिकला बाद करत मुंबईच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. सूर्या ६० धावा करून बर्गरच्या चेंडूवर बाद झाला आणि मुंबईचा डाव २० षटकांत ९ बाद १७५ धावांवर मर्यादित राहिला. राजस्थानकडून आर्चरने ३, तर नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा आणि यशराज पुंजा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.



सामन्याचा संक्षिप्त धावफलक :


राजस्थान रॉयल्स : २० षटकांत २०५/८ (ध्रुव जुरेल ३८, जोफ्रा आर्चर ३२, यशस्वी जयस्वाल २७; शार्दुल ठाकूर २/४१, दीपक चहर २/४३)
मुंबई इंडियन्स : २० षटकांत १७५/९ (सूर्यकुमार यादव ६०, हार्दिक पंड्या ३४, विल जॅक्स ३३; जोफ्रा आर्चर ३/१७, ब्रिजेश शर्मा २/२६, नांद्रे बर्गर २/४३)
निकाल : राजस्थान रॉयल्स ३० धावांनी विजयी



सूर्यवंशीचा आणखी एक विक्रम :


आयपीएल २०२६ चा संपूर्ण हंगाम आपल्या फलंदाजीने गाजवणारा राजस्थान रॉयल्सचा अवघ्या १५ वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने लीगच्या शेवटच्या साखळी सामन्यात एक मोठा इतिहास रचला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात वैभवला मोठी धावसंख्या उभारता आली नसली (६ चेंडूंत ४ धावा) तरी, या छोट्या खेळीदरम्यान त्याने कोणत्याही एका टी-२० स्पर्धेत किंवा मालिकेत सर्वाधिक धावा करणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू बनण्याचा बहुमान मिळवला. या ऐतिहासिक कामगिरीपूर्वी हा विक्रम भारताच्या देवदत्त पडिक्कलच्या नावावर होता. पडिक्कलने २०१९-२० च्या 'सय्यद मुश्ताक अली' टी-२० स्पर्धेत कर्नाटककडून खेळताना १२ सामन्यांत ५८० धावा कुटल्या होत्या. मुंबई विरुद्ध खेळायला उतरण्यापूर्वी वैभवला हा रेकॉर्ड मोडण्यासाठी अवघ्या २ धावांची गरज होती. सामन्याच्या सुरुवातीला पहिल्या चेंडूवर खाते उघडल्यानंतर, त्याने विल जॅक्सच्या गोलंदाजीवर दुसरी धाव घेताच पडिक्कलचा हा ६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. १५ व्या वर्षी जगातील सर्वात कठीण लीगमध्ये केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे वैभव सध्या आयपीएल २०२६ च्या 'ऑरेंज कॅप' म्हणजेच सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर विराजमान आहे.

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील