Sunday, May 24, 2026

Tech Layoffs : AI च्या वाढत्या प्रभावामुळे नोकऱ्यांवर संकट? Meta, LinkedIn नंतर Cisco कडूनही हजारो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता

Tech Layoffs : AI च्या वाढत्या प्रभावामुळे नोकऱ्यांवर संकट? Meta, LinkedIn नंतर Cisco कडूनही हजारो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता

मुंबई : Meta, LinkedIn, Oracle यांच्यानंतर आता Cisco Systems नेही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नव्या तंत्रज्ञानाकडे वेगाने वळणाऱ्या टेक इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा नोकरकपातीची मोठी लाट पाहायला मिळत आहे.

अमेरिकेतील नेटवर्किंग आणि सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी Cisco Systems तब्बल ४ हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. विशेष म्हणजे, कंपनीने हा निर्णय आर्थिक संकटामुळे नव्हे तर AI आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये मोठी गुंतवणूक करण्यासाठी घेतल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास ५ टक्के कर्मचारी प्रभावित होणार आहेत.

Cisco चे CEO Chuck Robbins यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “AI च्या युगात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपन्यांना सतत आपल्या गुंतवणुकीचे प्राधान्य बदलावे लागणार आहे.” त्यामुळे कंपनी आता पारंपरिक क्षेत्रांऐवजी AI-केंद्रित प्रकल्पांवर अधिक भर देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, Cisco ने नुकत्याच जाहीर केलेल्या तिमाही आर्थिक अहवालात तब्बल १५.८४ अब्ज डॉलर्सचे विक्रमी उत्पन्न नोंदवले आहे. हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १२ टक्क्यांनी अधिक आहे. तसेच AI इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित ५.३ अब्ज डॉलर्सच्या ऑर्डर्स कंपनीला मिळाल्या असून, आर्थिक वर्षअखेर हा आकडा ९ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या पुनर्रचनेअंतर्गत Cisco आता AI, सायबर सिक्युरिटी, सिलिकॉन चिप्स, ऑप्टिक्स आणि डेटा सेंटर नेटवर्किंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आहे. यासाठी कंपनी जवळपास १ अब्ज डॉलर्स खर्च करणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

गेल्या काही महिन्यांत Meta, IBM, Salesforce आणि इतर अनेक टेक कंपन्यांनी AI-केंद्रित धोरणांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. त्यामुळे जागतिक टेक इंडस्ट्रीमध्ये नोकरीची असुरक्षितता वाढताना दिसत आहे. एकीकडे AI मुळे कंपन्यांचे उत्पन्न आणि शेअर बाजारातील कामगिरी मजबूत होत असताना, दुसरीकडे हजारो कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

विशेष म्हणजे, कर्मचारी कपातीच्या घोषणेनंतर Cisco च्या शेअर्समध्ये १६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. यावरून गुंतवणूकदार AI-केंद्रित रणनीतींना सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >