Sunday, May 24, 2026

Chandrapur Tiger Attack : अंधारात थरारक ऑपरेशन; ४ महिलांचा बळी घेणारी टी-2 वाघीण अखेर जेरबंद

Chandrapur Tiger Attack : अंधारात थरारक ऑपरेशन; ४ महिलांचा बळी घेणारी टी-2 वाघीण अखेर जेरबंद

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात चार महिलांचा बळी घेणाऱ्या टी-2 वाघिणीला अखेर वनविभागाने शनिवारी रात्री जेरबंद करण्यात यश मिळवले. गुंजेवाही जंगल परिसरात पार पडलेल्या या थरारक कारवाईनंतर स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक वाघिणीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. (Chandrapur Tiger Attack)

">शुक्रवार २२ मे रोजी गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या १३ महिलांच्या गटावर टी-2 वाघिणीने अचानक हल्ला चढवला होता. दबा धरून बसलेल्या वाघिणीच्या हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मानवी जीवितहानी झाल्याची ही महाराष्ट्रातील दुर्मिळ आणि धक्कादायक घटना मानली जात आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने तातडीने कारवाई करून वाघिणीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत होती. (Chandrapur Tiger Attack)

या हल्ल्यानंतर वनविभागाने विशेष पथक तयार करून गुंजेवाही-पवनपार मार्गावरील खैरीचक जंगल परिसरात मोठी शोधमोहीम सुरू केली. संबंधित वाघिणीला पकडण्यासाठी आवश्यक परवानग्या घेत ट्रॅप आणि ट्रॅन्क्युलायझरची व्यवस्था करण्यात आली होती. वनअधिकाऱ्यांनी जंगलातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत ऑपरेशन युद्धपातळीवर राबवले. (Chandrapur Tiger Attack)

शनिवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने ट्रॅन्क्युलायझर डार्टच्या साहाय्याने एका वाघावर अचूक वेध घेतला. मात्र अंधारामुळे सुरुवातीला पकडण्यात आलेला प्राणी हल्लेखोर टी-2 वाघीणच आहे की दुसरा वाघ, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर वनविभागाने पडताळणी केली असता हीच चार महिलांच्या मृत्यूस कारणीभूत असलेली टी-2 वाघीण असल्याचे स्पष्ट झाले. रात्री आठच्या सुमारास तिला पूर्णपणे जेरबंद करण्यात आले. (Chandrapur Tiger Attack)

वनविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान वाघिणीसोबत तिचे बछडे आढळून आले नाहीत. त्यामुळे वाघिणीच्या हालचालींसह तिच्या बछड्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास आणि शोधमोहीम राबवली जाणार आहे. (Chandrapur Tiger Attack)

दरम्यान, टी-2 वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

कविता दादाजी मोहुर्ले (४५) अनिता दादाजी मोहुर्ले (४६) संगीता संतोष चौधरी (४०) सुनीता कौशिक मोहुर्ले (३५)

गावकऱ्यांनी वनविभागाच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले असले तरी परिसरात अजूनही भीतीचे वातावरण कायम आहे. वनविभागाने नागरिकांना जंगल परिसरात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. (Chandrapur Tiger Attack)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >