Saturday, May 23, 2026

शपथ

शपथ

- नक्षत्रांचे देणे; डॉ. विजया वाड

बाबुराव नंबर वन बाहेरख्याली आहेत नलू.” “असेनात का? आपल्याला काय करायचं त्याच्याशी.” नलू तुटकपणे म्हणाली. “असं कसं? तुझा नवरा चोवीसपैकी बारा तास त्यांच्या सेवेत असायचा, तो आता बाबुरावांच्या बायकोच्या सेवेत असतो.” “मग गं” नलू हळवी झाली. “मग गं नंदा!” ती पुन्हा हळहळली. “मी लक्ष ठेवून असते.” “काही गैरवर्तन करतात का ग हे?” “काही नेम नाही. पुरुषाची जात. ताट आयतं वाढलेलं. उशापायथ्याशी कोणी नाही. पण मी कावळीच्या नजरेनं बघत राहाते.” “हे तू चांगलं करतेस.” “बाईसाहेब सारखं तुझ्या नवऱ्याला डोकं चेपायला बोलावतात.” “आणि तो जातो?” “हो गं नलू. बोलून चालून तो पडला सेवक.” “तू लक्ष ठेव. काही गैरप्रकार केला तर मला लगेच कळव.” “हो. गं नलू.” नंदिनीनं भरभरून होकार भरला. नलू किंचित चिंतित झाली. पण नंदा काही गैरप्रकार होऊ देणार नाही. कितीही झालं तरी तिच्या जीवाची मैत्रीण होती. अगदी बालपणापासून! “मग?” “सत्य सांगशील ना मला नंदा!” “हो गं सखी!” दोघी मैत्रिणी बिलगल्या. एकमेकींच्या मनात संशय पेरून. नवरा बारा तासांची ड्युटी करून घरी आला. “नंदा, कशी आहेस?” “मी कशी असणार? बरीच आहे.” “सारा दिवस निजून पडून असतेस. डोकं दुखतंय का गं?” “दुखत असलं तरी तुम्हांला त्याचं काय?” “नंदा, असं का गं टाकून बोलतेस?” “तुमच्याशी सरळ बोलावंसंच वाटत नाही..” तो न बोलता तिच्या पलंगावर बसला. शांतपणे तिचं डोकं चेपू लागला. तिला त्याचा स्पर्श हवासा नि नकोसा दोन्ही वाटला. “याच हातांनी सारा दिवस तिचं मेलीचं डोकं चेपता ना?” ती न राहून पुन्हा टाकून बोलली. “हे बघ, बाईसाहेबांचं डोकं सतत दुखतं ! माझा नाईलाज होतो. त्या चेपायला सांगतात, मी आज्ञापालन करतो. साहेब कामावर जातात. मग मीच उरतो... सेवक म्हणून.” “एवढं लांबलचक स्पष्टीकरण द्यायची काही गरज नाही. झोपा गपचिप्. “ तिनं कूस पालटली. त्याच्याकडे पाठ करून झोपली. तो हाताची घडी घालून पडून राहिला. “तिच्या जवळ जवळ जाऊ नका.” “मी आपणहून नाही गं जात बायको. फक्त आज्ञापालन करतो.” “आज्ञापालन म्हणजे? काय याचा अर्थ समजू मी.” “सारखं घालून पाडून बोलू नकोस. जेवून खाऊन सोळा हजार पगार देतात बाईसाहेब. आणि काम काय? तर फक्त देखरेखीची कामं.” “मला नकोत ते सोळा हजार.” “मग काय करू?” “सोडून द्या ती नोकरी.” “आणि दुसरी नाही मिळाली म्हणजे?” “मी धुण्याभांड्याची कामं करेन.” “नको गं नको. गरिबीत, पण तुला राणीसारखी ठेवलीय मी.” त्याने न बोलता खिचडी टाकली. पापड तळले. कांद्याची कोशिंबीर झटपट केली, आणि पानं वाढली. “चला, राणीसरकार चार घास खाऊन घ्या.” ती न बोलता उठली. खिचडी फारच चविष्ट झाली होती. तिने हवी तेवढी खाल्ली, पण नवऱ्याचे एका शब्दाने कौतुक केले नाही. दुसरा दिवस! नवरा वेळेवरती कामावर गेला. मालकीण बाई वाटच बघत होत्या. “माझं डोकं चेपून देतोस का रे?” मालकीणबाईनी विचारलं. “चेपतो की बाईसाहेब.” नंदाचं बारीक लक्ष होतं. ती डोळे मोठे मोठे करून पाहू लागली. बाईसाहेबांनी सेवकाचा हात हाती घेतला. त्याने तो काढून घेतला नाही. हळूहळू तो हात उरोभागावर बाईसाहेबांनी ठेवला. “ये जवळ.” बाईसाहेबांनी आर्जव केली. “नको बाईसाहेब. लग्नात मी शपथ घेतली होती. ‘नातिचरामी’ अशी तीन वेळा! मी शपथेला जागणारा पुरुष आहे.” “मग नोकरी गेली तरी चालेल?” “चालेल बाईसाहेब. पण मज हातून शपथभंग होणार नाही.” बाईसाहेब त्या नरपुंगवाकडे बघत राहिल्या.

Comments
Add Comment