Friday, May 22, 2026

Metro 3 : मेट्रो ३ सेवा पूर्ववत, प्रशासनाने मागितली प्रवाशांची माफी

Metro 3 : मेट्रो ३ सेवा पूर्ववत, प्रशासनाने मागितली प्रवाशांची माफी
मुंबई : लोकल ट्रेन प्रमाणेच मेट्रो सेवेलाही मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जात आहे. आरे – कफ परेड मेट्रो ३ मार्गिकेवरील सेवा शुक्रवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली. मेट्रो ३ मार्गिकेच्या सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने डाऊन आणि अप मार्गावरील वाहतूक सेवा विलंबाने सुरू होती. परिणामी मेट्रो सेवा विस्कळीत झाली असून कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. मेट्रो ३ मार्गिका टप्प्याटप्प्यात सेवेत दाखल झाल्यापासून सातत्याने तांत्रिक अडचणी आणि इतर कारणाने सेवा विस्कळीत होण्याची मालिका सुरुच आहे. शुक्रवारी सकाळी मार्गिकेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि मेट्रो गाड्यांची गती मंदावली. अप आणि डाऊन मार्गिकेवर वाहतुकीला याचा फटका बसला. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, सकाळी ८.४५ च्या सुमारास मुंबई मेट्रो ॲक्वा लाईन सेवांमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यावेळी सीएसएमटी आणि आरे जेव्हीएलआर यांसारख्या प्रमुख स्थानकांवरून कफ परेडच्या दिशेने ३० मिनिटांपासून ते एका तासाहून अधिक वेळ एकही ट्रेन धावत नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तसेच कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेटमार्कही लागला. दोन्ही मार्गिकेवरील गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना कार्यालयात, इच्छितस्थळी पोहचण्यासही विलंब झाला. दरम्यान सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाडाची माहिती मिळाल्याबरोबर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) पथकाने तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेतले. सकाळी दहा वाजल्यानंतर दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आणि मेट्रो ३ ची वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती एमएमआरसीकडून देण्यात आली आहे. दरम्यान, तांत्रिक समस्येमुळे डाउनलाईन आणि अपलाईन दोन्ही मार्गांवरील ट्रेन सेवांना विलंब होत असून प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे मुंबई मेट्रोकडून सांगण्यात आले. मात्र या कालावधीत शेकडो प्रवासी स्थानकांवर अडकून पडले होते. तसेच अर्धा-पाऊण तास होऊनही कसलीच घोषणा न केल्यामुळे सोशल मीडियावर प्रशासनाविरुद्ध संतप्त तक्रारींचा पाऊस पडला. मेट्रो ३ सेवा पूर्ववत काही वेळानंतर मुंबई मेट्रो ३ची सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तांत्रिक कारणांमुळे किंवा तात्पुरत्या अडचणींमुळे ठप्प झालेली सेवा आता पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानकांवरील गर्दी कमी होत असून वाहतूक व्यवस्थाही सुरळीत होत असल्याचे दिसत आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >