Monday, July 27, 2026

Nitesh Rane: ससून डॉक आणि मरोळ मच्छीमार मार्केटच्या विकासकामांचा नितेश राणेंकडून आढावा

Nitesh Rane: ससून डॉक आणि मरोळ मच्छीमार मार्केटच्या विकासकामांचा नितेश राणेंकडून आढावा

मुंबई: मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबईतील ससून डॉक आणि मरोळ मच्छीमार मार्केटच्या विकासकामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. मंत्रालयात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत ससून डॉक येथे झालेल्या सामंजस्य करारानंतर सुरू असलेल्या कामांची प्रगती, मच्छीमारांसाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधा आणि पायाभूत विकासकामांचा आढावा घेण्यात आला. करारानुसार विविध कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.

याशिवाय मरोळ मच्छीमार मार्केटच्या विकासकामांनाही गती देण्यावर भर देण्यात आला. बाजारातील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि मच्छीमारांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना मंत्री राणे यांनी दिल्या.

मच्छीमार महिलांच्या सुरक्षिततेचाही बैठकीत विशेष उल्लेख करण्यात आला. मासळी विक्री आणि हाताळणी करताना त्यांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी हॅन्ड ग्लोव्हज आणि गमबूट उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. मच्छीमार समुदायाच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रभावीपणे कार्यवाही करावी, असे निर्देश नितेश राणे यांनी दिले.

मच्छीमारांच्या अडचणी कमी करून त्यांच्या कामकाजाला अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर वातावरण उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्राधान्य असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. ससून डॉक आणि मरोळ मच्छीमार मार्केटमधील विकासकामे पूर्ण झाल्यानंतर मच्छीमारांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या बैठकीला मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, आरसीएफ कंपनीचे प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >