मुंबईकरांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा वाहतूक पर्याय म्हणजे बेस्ट बस सेवा. दररोज लाखो प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचविण्याची जबाबदारी बेस्टवर आहे. मात्र गेल्या काही महिन्यांत बेस्टच्या बस अपघातांच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही केवळ प्रशासनासाठीच नव्हे, तर प्रत्येक मुंबईकरासाठी चिंतेची बाब बनली आहे. या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे एकच प्रश्न उपस्थित होत आहे—आता तरी बेस्टचे अपघात टळतील का?
काही वर्षांत बेस्टच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणावर कंत्राटी बस गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. आज बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या २०० च्या आसपास बस असून कंत्राटी बसची संख्या अडीच हजारच्या आसपास आहे. परिणामी, अपघातांच्या घटनांमध्ये कंत्राटी बसचे प्रमाणही अधिक दिसून येते. याचा अर्थ असा नाही की कंत्राटी चालक निष्काळजी असतात; परंतु वाढती बससंख्या, अनुभवी चालकांचा तुटवडा आणि कामाचा ताण या सर्वांचा परिणाम सुरक्षिततेवर होत असल्याचे चित्र दिसते.
कारगिलच्या शौर्याला अभिवादन; ऑपरेशन सिंदूर, वन रँक वन पेन्शनसह केंद्राच्या निर्णयांचे कौतुक कारगिल वॉर मेमोरियलसाठी ३ कोटींच्या लाईट अँड साऊंड शोची ...
कंत्राटदार चालकांना नियुक्तीपूर्वी प्रशिक्षण दिले जाते. वाहन हाताळणी, वाहतूक नियम, प्रवासी सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थिती याविषयी त्यांना मार्गदर्शन केले जाते. तरीही प्रत्यक्ष रस्त्यावरची परिस्थिती प्रशिक्षणापेक्षा अधिक आव्हानात्मक असते. मुंबईतील अरुंद रस्ते, वाढती वाहतूक, सतत बदलणारी सिग्नल व्यवस्था, पावसाळ्यातील खराब रस्ते आणि प्रवासाचा ताण या सर्वांचा सामना करण्यासाठी केवळ प्राथमिक प्रशिक्षण पुरेसे ठरत नाही. सातत्याने पुनर्प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन तितकेच आवश्यक आहे. आज बाजारात प्रशिक्षित बसचालक मिळणे ही मोठी समस्या बनली आहे. जड वाहन चालविण्यासाठी आवश्यक परवाना, अनुभव आणि शिस्त असलेले चालक कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक कंत्राटदारांना चालकांची भरती करताना अडचणी येतात. चालकांची कमतरता भरून काढण्यासाठी काही वेळा तुलनेने कमी अनुभव असलेल्या चालकांची नियुक्ती करावी लागते. अशा परिस्थितीत अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, बेस्टचे कायमस्वरूपी चालक अनुभवी आणि कुशल मानले जातात. मात्र त्यांचे वेतन, सेवा अटी आणि इतर खर्च कंत्राटी चालकांच्या तुलनेत अधिक असल्याने कंत्राटदारांसाठी त्यांची नियुक्ती आर्थिकदृष्ट्या अवघड ठरते. परिणामी, अनुभवी चालकांची कमतरता अधिक जाणवू लागते. हा प्रश्न केवळ कंत्राटदारांचा नसून संपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसमोरील गंभीर आव्हान आहे. गेल्या तीन-चार महिन्यांत घडलेल्या काही अपघातांच्या प्राथमिक माहितीनुसार अनेक घटनांमध्ये बसमध्ये मोठा तांत्रिक बिघाड आढळून आलेला नाही. काही प्रकरणांमध्ये मानवी चुका, चुकीचा अंदाज, वेगावरील नियंत्रणाचा अभाव किंवा रस्त्यावरील परिस्थितीचे योग्य मूल्यमापन न होणे ही कारणे पुढे आली. याचा अर्थ चालकांचे सातत्यपूर्ण कौशल्यवर्धन आणि मानसिक तयारी यावर अधिक भर देण्याची गरज आहे. आजच्या आधुनिक इलेक्ट्रिक आणि स्वयंचलित प्रणाली असलेल्या बस पारंपरिक डिझेल बसपेक्षा तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगत आहेत. अशा वाहनांमधील ब्रेकिंग प्रणाली, ऊर्जा प्रणाली, इलेक्ट्रॉनिक नियंत्रण यंत्रणा आणि सुरक्षा वैशिष्ट्यांची माहिती चालकांना सखोलपणे असणे आवश्यक आहे. वाहन चालविण्याचे कौशल्य जितके महत्त्वाचे आहे, तितकीच वाहनाच्या तांत्रिक प्रणालींची समजही महत्त्वाची ठरते.
मुंबई : कलर्स टीव्हीचा (Colors TV) लोकप्रिय कॉमेडी कुकिंग शो (Comedy Cooking Show) 'लाफ्टर शेफ्स सीझन 3' (Laughter Chefs Season 3) अखेर संपन्न झाला असून अभिनेता अली गोनी (Aly Goni) आणि अभिनेत्री ...
प्रत्येक चालकासाठी नियमित पुनर्प्रशिक्षण अनिवार्य केले पाहिजे. आधुनिक ड्रायव्हिंग सिम्युलेटरचा वापर, आपत्कालीन परिस्थितीतील सराव, मानसोपचार तज्ज्ञांकडून तणाव व्यवस्थापनाचे प्रशिक्षण, थकवा ओळखण्याचे मार्गदर्शन आणि सुरक्षित वाहनचालनावरील कार्यशाळा यामुळे चालकांची कार्यक्षमता वाढू शकते. त्याचबरोबर अनुभवी चालकांकडून नव्या चालकांना मार्गदर्शन करण्याची प्रभावी व्यवस्था उभारणेही आवश्यक आहे. याशिवाय चालकांच्या कामाच्या वेळेवरही लक्ष देणे गरजेचे आहे. सलग दीर्घकाळ वाहन चालविल्यास थकवा वाढतो आणि निर्णयक्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे पुरेशी विश्रांती, नियोजित ड्युटी, आरोग्य तपासणी आणि मानसिक स्वास्थ्य याकडेही तितकेच गांभीर्याने पाहिले पाहिजे. सुरक्षित प्रवासाची सुरुवात सुरक्षित आणि सक्षम चालकापासूनच होते.
बिहारमध्ये पेपरफुटी प्रकरणासह (Bihar) विविध मागण्यांसाठी विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या 'बिहार बंद' (Bihar Band) आंदोलनादरम्यान सिवान जिल्ह्यात हिंसक घटना ...
कंत्राटदार, बेस्ट प्रशासन आणि राज्य शासन यांनी संयुक्तपणे चालक प्रशिक्षणासाठी आधुनिक प्रशिक्षण केंद्रे उभारण्याची आवश्यकता आहे. नवीन चालक तयार करणे, विद्यमान चालकांचे कौशल्य वाढविणे आणि सुरक्षित वाहनचालनाची संस्कृती विकसित करणे ही काळाची गरज आहे. अपघातानंतर चौकशी करण्यापेक्षा अपघात होऊच नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय अधिक प्रभावी ठरतील. तंत्रज्ञानाचाही अधिक वापर करणे आवश्यक आहे. बसमध्ये चालक सहाय्यक प्रणाली, वेग नियंत्रण यंत्रणा, थकवा ओळखणारी साधने, डॅशकॅम, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सुरक्षा प्रणाली आणि नियमित तांत्रिक तपासणी यामुळे अपघातांचे प्रमाण कमी करण्यात मदत होऊ शकते. मात्र कोणतेही तंत्रज्ञान सक्षम आणि प्रशिक्षित चालकाची जागा घेऊ शकत नाही.
बेस्टची बस ही केवळ एक वाहनसेवा नसून मुंबईची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे प्रत्येक अपघात हा केवळ आकडा नसून एका कुटुंबाच्या आयुष्याशी जोडलेला असतो. सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड परवडणारी नाही. चालकांची कमतरता भरून काढणे, दर्जेदार प्रशिक्षण देणे, तांत्रिक ज्ञान वाढविणे आणि सुरक्षित वाहनचालनाला सर्वोच्च प्राधान्य देणे या उपाययोजना तातडीने राबविल्या गेल्या तर भविष्यातील अनेक अपघात टाळता येऊ शकतात. मुंबईकरांना वेगवान नव्हे, तर सुरक्षित प्रवास हवा आहे. आणि त्यासाठी सक्षम चालक, आधुनिक प्रशिक्षण आणि जबाबदार व्यवस्थापन यांच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. बेस्टला नेमके हेच करायचे आहे.






