Monday, July 27, 2026

SIR : 'एसआयआर' प्रक्रियेत नाव वगळल्यास मतदाराला मिळणार पुन्हा संधी

SIR : 'एसआयआर' प्रक्रियेत नाव वगळल्यास मतदाराला मिळणार पुन्हा संधी

१७ ऑगस्टला प्रारूप यादी; १६ सप्टेंबरपर्यंत पुनर्नोंदणीची मुदत

मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत ८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज न दिल्याने किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे प्रारूप यादीतून नाव वगळले गेल्यास मतदारांना घाबरण्याचे कारण नाही. अशा मतदारांना पुन्हा आपले नाव नोंदवण्यासाठी आणि त्रुटी दूर करण्यासाठी पुरेसा वेळ व संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीनंतर १६ सप्टेंबरपर्यंत पुनर्नोदणीची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.(Mumbai)

सध्या सुरू असलेल्या पुनरीक्षण मोहिमेत मतदारांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले स्वाक्षरी केलेले गणना अर्ज गृहभेटीस येणाऱ्या बीएलओंकडे जमा करणे आवश्यक आहे. या प्राप्त अर्जांच्या आधारे १७ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाईल. मात्र, लोकप्रतिनिधीत्व अधिनियमातील तरतुदींनुसार एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव असलेल्या मतदारांचे नाव एकाच ठिकाणी ठेवून इतर ठिकाणी ‘आधीच नोंदणीकृत’ असा शेरा मारून वगळले जाणार आहे.(Voting Card)

ज्या पात्र मतदारांची नावे १७ ऑगस्टच्या प्रारूप यादीत समाविष्ट नसतील किंवा जे नवीन मतदार आहेत, त्यांना १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे आणि हरकती नोंदवता येतील. या एका महिन्याच्या मुदतीत नवीन नाव नोंदणीसाठी नमुना ६, नोंदींमधील दुरुस्तीसाठी नमुना ८ आणि चुकीच्या नोंदी वगळण्यासाठी नमुना ७ भरून अर्ज सादर करता येईल. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र मतदारांची अंतिम मतदार यादी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.(Election)

खोटी माहिती दिल्यास शिक्षा

नाव समाविष्ट करताना अथवा दुरुस्ती करताना खोटी माहिती दिल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियमानुसार एक वर्षाचा कारावास किंवा दंडाची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, १९ ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही नाव नोंदणीची प्रक्रिया थांबणार नाही. मतदार नोंदणी ही निरंतर अद्यतन प्रक्रिया असल्याने प्रत्यक्ष निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापर्यंत पात्र नागरिकांना नमुना ६ भरून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करता येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >