Thursday, May 21, 2026

पक्षसंघटनेची एकजुटीने मजबूत बांधणी करणार

पक्षसंघटनेची एकजुटीने मजबूत बांधणी करणार

प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांचा निर्धार

मुंबई; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व समज-गैरसमज दूर झाले आहेत. लवकरच पक्षसंघठनेच्या मजबूत बांधणी आणि विस्तृत विस्तारासाठी पक्षाचे सर्वजण एकत्रितपणे राज्यव्यापी दौरा करणार आहोत, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी आज दिल्ली येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात निवडणूक आयोगाला जे काही सुधारित पत्र द्यायचे आहे, ते येत्या काही दिवसांत दिले जाईल. त्यासाठी पक्षांतर्गत बैठकीत सर्व नेत्यांची सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. विलीनीकरणाबाबत पवार साहेबांच्या (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आदरणीय सुप्रियाताई यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे त्या विषयात आता काहीही शिल्लक राहिलेले नाही. असे खा. सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर चालणारा पक्ष आहे. तसेच, स्व. चव्हाण साहेबांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. आम्ही सर्वजण एकत्रितपणे चर्चा करतो. पक्षातील सर्व निर्णय एकमताने घेतले जातात. आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे. अशी स्पष्ट भूमिका खा. तटकरे यांनी या पत्रकार परिषदेत मांडली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकशाही विकास आघाडी ( एनडीए) मध्ये प्रमुख घटक पक्ष असून, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात काम करत आहोत. ही भूमिका कायम ठेवूनच पुढील काळात विकासाभिमुख कामांना अधिक गती देणार आहोत. असेही प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment