Friday, August 28, 2026

Nashik : पेठ तालुक्यातील ११ पर्यटक काठमांडूत अडकले, सुरक्षित परतीसाठी आवश्यक कार्यवाही सुरु

Nashik : पेठ तालुक्यातील ११ पर्यटक काठमांडूत अडकले, सुरक्षित परतीसाठी आवश्यक कार्यवाही सुरु

Nashik : नेपाळमध्ये भीषण महापुराने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. नेपाळमध्ये भारतातील अनेक नागरिक अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील 288 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. बचाव पथकांकडून बेपत्ता नागरिकांची शोधाशोध सुरू आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील (Nashik) पेठ तालुक्यातील ११ पर्यटक काठमांडू (Kathmandu) येथे अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.

11 पर्यटक काठमांडूत अडकले

पेठ तालुक्यातील 11 पर्यटक काठमांडू येथे अडकले असून हे सर्व पर्यटक पेठ नगरपंचायत हद्दीतील आहे. सध्या ते सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून (District Disaster Management Department) देण्यात आली आहे. पर्यटनासाठी नेपाळमध्ये गेलेल्या या ११ जणांचा नेपाळमधील भारतीय दूतावासाशी संपर्क झाला असून, त्यांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे. अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाकडून संकलित करण्यात आली असून, त्यांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही केली जात आहे. अडकलेल्या पर्यटकांमध्ये अर्जुन गणपत शिंदे, रोहित चंद्रकांत शिंदे, विशाल जालिंदर शिंदे, रुपेश मुकुंद घोंगे, अभिषेक राजेंद्र पवार, आकाश कृष्णा कोतुळकर, ओम राजेंद्र शिंदे, पीयूष विजय शिंदे, आयुष सोमनाथ शिंदे, करण शिवाजी शिंदे आणि शुभम भोलेनाथ शिंदे यांचा समावेश आहे.

37 भाविकांचा काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू

कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा इथं अडकलेल्या महाराष्ट्रातील 37 भाविकांचा काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर आणि महाराष्ट्र सरकारच्या भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी केलेल्या समन्वयानंतर भाविकांना पुढील प्रवासासाठी मार्ग मोकळा झाला. आज सकाळी 6 वाजता सर्व भाविक सागा इथून न्यालम चेक पोस्टच्या मार्गाने काठमांडूकडे रवाना झाले आहेत.

पुराचा धोका कायम

दरम्यान, नेपाळमधील पुरात आतापर्यंत 350 हून अधिक जणांचा बळी गेला आहे. यानंतरही नेपाळमधील महापुराचं संकट कायम आहे. नेपाळमधील भोते कोशी नदी परिसरात आता पुराचा धोका निर्माण झाला आहे. नेपाळ-चीन सीमेवर नदीचा प्रवाह अडला आहे. त्यामुळे या भागात मोठा तलाव तयार झाला आहे. हा तलाव फुटल्यास पुन्हा पाण्याचा लोंढा येऊ शकतो. नेपाळच्या जलविज्ञान आणि हवानविभागाला चीनने धोक्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर छोछेन खोला आणि पुरेपु त्सांग्पो नद्यांच्या संगमाजवळही तलाव तयार झालाय. नदीचा प्रवाह अडल्याने तयार झालेला तलाव कधीही फुटण्याची शक्यता आहे, अशी भीती चीनच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >