Wednesday, May 20, 2026

Shashikant Shinde : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर यापुढे कोणतीही चर्चा नाही

Shashikant Shinde : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर यापुढे कोणतीही चर्चा नाही

शशिकांत शिंदे; आमच्यासाठी विषय संपला

मुंबई : गेल्या काही काळापासून राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चेत असलेल्या 'दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा' विषय आता पूर्णपणे संपला असून, यापुढे या मुद्द्यावर कोणतीही चर्चा केली जाणार नाही, अशी मोठी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बुधवारी केली. मुंबईत पार पडलेल्या शरद पवार गटाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विलीनीकरणाच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. शशिकांत शिंदे म्हणाले, "दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणासंदर्भात आणि विलीनीकरणाबाबत यापूर्वी निश्चितच काही हालचाली किंवा चर्चा झाल्या असतील. अजित पवार यांच्या गटातील नेतेही याविषयी वेगवेगळ्या स्तरांवर बोलत आहेत. मात्र, आता आमच्या पक्षाने हा विषय कायमचा बंद केला आहे. मूळ चर्चा करणाराच नेता आता समोर राहिलेला नाही, त्यामुळे आम्ही आता कोणत्याही प्रकारच्या 'जर-तर'वर चर्चा करण्यात वेळ वाया घालवणार नाही. या विषयावर आम्हाला आता कोणतेही अधिकचे भाष्य करायचे नाही."

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बुधवारी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या प्रमुख नेत्यांची, आजी-माजी आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. विधान परिषद निवडणुकांचे जागावाटप आणि राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती यावर या बैठकीत विस्तृत मंथन झाले. या अंतर्गत बैठकीत पक्षाच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी विलीनीकरणाच्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचा सूर लावला होता. त्यानंतरच, बैठकीतून बाहेर पडताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाची अधिकृत आणि अंतिम भूमिका जाहीर करत विलीनीकरणाचा विषय थांबवल्याचे स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >