क्राइम - अॅड. रिया करंजकर
गुन्हेगार कोणत्या स्वरूपात आपल्यासमोर वावरत असतील याचा थांबपत्ता कोणालाच नसतो. गुन्हे जरी वेगवेगळ्या पद्धतीचे असले तरी ते गुन्हेच आणि करणारा हा गुन्हेगारच असतो. गुन्हा याच वयात घडेल हे सांगता येत नाही. गुन्हेगाराकडून तो कोणत्याही वयात घडू शकतो. मात्र त्याचा त्रास आपल्या अवतीभवती असलेल्या कुटुंबाला होतो.
रवी हा १३-१४ वर्षांचा मुलगा. आई-वडील आणि एका भावासोबत राहत होता. एक दिवस अचानक त्याला आपले वडील सावत्र असल्याचं समजलं. ही गोष्ट त्याला त्याच्या नातेवाइकांकडून समजली होती. आजपर्यंत त्याला कोणीही ही गोष्ट कळू दिली नव्हती. त्यानंतर मात्र त्याच्या वागणुकीत बदल जाणवू लागला. तो व्यवस्थित शाळेत जात नव्हता, जर शाळेत गेला तो कुठल्या नाही कुठल्या मुलाला मारल्याशिवाय घरी येत नव्हता. नेहमी त्याच्या तक्रारी येऊ लागल्या. म्हणून त्याची शाळाही बंद झाली. घरात दिवसभर बसून तो फक्त मोबाईलवर गेम खेळू लागला आणि मोबाईल हातात नसताना तो वेडापिशासारखा वागत होता. आई किंवा वडिलांनी त्याच्या हातातला मोबाईल घेतला तर तो तीन तीन, चार चार दिवस घरातून गायब होत होता आणि मग घरातल्या लोकांना त्याला शोधावं लागत होतं. रवी जिथे जायचा तिथे तो मोबाईल चोरून पळू लागला. वडिलांकडे त्याच्या तक्रारी येऊ लागल्या. वडील मुलगा आहे म्हणून कसेतरी ते प्रकरण मिटू लागले. कारण तो लहान आहे या वयाच्या त्याची तक्रार केली तर त्याचे पूर्ण आयुष्य बरबाद होऊ शकतं असं म्हणून ते त्याला सोडून आणू लागले. याचाच फायदा रवीने घेतला आणि आपण काहीही केलं तरी आपले प्रकरण आपले वडील मिटवतायेत यावर त्याचा पूर्ण विश्वास बसला. या सर्व गोष्टीला वैतागून रवीच्या वडिलांनी आपल्या मित्राजवळ गोष्ट व्यक्त केली की या मुलामुळे मला खूप त्रास झालेला आहे आणि मी अक्षरश: वैतागलो आहे. त्यावेळी त्यांचे मित्र सुरेश त्यांना म्हणाले मी अनेकांना सुधरवलं आहे. तुझ्याही मुलाला मी सुधरवेन. मी त्याला काही दिवस माझ्याकडे घेऊन जातो. म्हणजे तुमच्या पासून लांब राहिला तर तो सुधारेल. ह्या हेतूने सुरेशने रवीला आपल्या सोबत नेलं. पण रवीचे वडील शामराव यांनी रवीच्या चोरीच्या गुणाचा जराही थांगपत्ता सुरेशला लागू दिला नाही. शामरावांना वाटलं की इतर मुलांसारखा तो त्यांच्याकडे राहिला आणि आई-वडिलांपासून दूर राहिला की सुधारेल. त्यांनी त्याला आपल्या नवीन सुरू केलेल्या कारखान्यात कामाला ठेवलं. त्यांच्या घरी तरुण मुली होत्या. त्यामुळे त्यांनी रवीला आपल्या घरी न ठेवता ते ज्या ठिकाणी कारखान्यात काम करत होते त्या ठिकाणी ठेवलं.
चार दिवस रवी व्यवस्थित राहिला. त्यांना कामामध्ये थोडी मदत करू लागला. शामराव यांना बाहेर जायचं होतं म्हणून त्यांनी आपला भाचा उत्तम याच्याकडे त्याला एक दिवस ठेवण्यास सांगून, दुसऱ्या दिवशी घेऊन जाईन असं सांगितलं. आपला मामा बोलला आहे म्हणून उत्तम याने रवीला एक दिवसासाठी आपल्या ठिकाणी ठेवले. चांगले जेवण दिले. कदाचित त्याच्या अंगावर जे मारले गेलेले वळ होते ते वडिलांनी त्याला मारले त्याचे होते. त्याच्यासाठी त्याने औषध आणले आणि आपल्या कारखान्यात कसं ठेवणार म्हणून उत्तमने आपल्या मित्राच्या कारखान्यात त्याला झोपण्यासाठी नेले. त्याचा मित्र राजेश याने आपल्या मित्राच्या शब्दांखातर त्याला ठेवून घेतले आणि अचानक रात्री राजेशला जाग आली तर तिथे रवी नव्हता. त्याने सगळीकडे बघितले पण त्याला रवी दिसला नाही आणि त्याचा मोबाईलही गायब होता. साडेतीन वाजता रवी तिथून पळाला होता. त्याच्यासोबत तो मोबाईल घेऊन पळाला होता. त्याच्या खिशातील ८ हजारांची कॅश त्याने नेली होती एवढेच नाही तर साडेतीनला निघालेला मुलगा सहा वाजेपर्यंत त्याने मोबाईलचा पासवर्ड बदलून गुगल पेने इतर लोकांना दहा हजार रक्कम परस्पर ट्रान्सफर केली होती. राजेश यांनी प्रथम बँकेत जाऊन आपलं अकाउंट बंद केलं. त्या अगोदर फोन करून राजेशने आपला मित्र उत्तम याला सांगितले. उत्तम यांनी आपला मामा शामराव याला सांगितलं आणि शामराव यांनी ही गोष्ट रवीचे वडील सुरेश यांना सांगितली. कारण हा रवी राजेशचे इंस्टाग्राम अकाउंट आपला लॉगिन आयडी टाकून वापरू लागला होता आणि त्याच्या मैत्रिणीला वाईट मेसेज पाठवू लागला होता. पण ही गोष्ट शामराव यांनी सुरेशला सांगितल्यावर सुरेशने हात वरती केले. तू मुलगा सुधारण्यासाठी नेला आहेस, तू आणि मुलगा काय करायचं ते करा. आमचा काय संबंध नाही असे म्हणत त्यांनी अंग झटकून टाकले.
राजेश यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली त्यावेळी सुरेश यांनी माझा त्या मुलाशी काही संबंध नाही असं सांगून मोकळे झाले आणि दुसरीकडे मात्र ते सिम बंद करू नका सीम चालू असेल तर मुलाला शोधता येईल असे म्हणू लागले. पण ते सीम असे चालू असेपर्यंत तो त्या सीमचा चुकीचा वापर करत होता. पंधरा दिवसांनी रवीने स्वतःहून उत्तमला फोन केला तेव्हा उत्तमने त्याला सरळ सांगितलं, बाबा तू कुठे आहेस? तर त्याने उडवाउडवीची उतरं दिली आणि उत्तम याने राजेशचा फोन दे आम्ही तुला काहीही करणार नाही असं सांगितलं. तेव्हा तो सरळ बोलला, मला मोबाईल आवडलेला आहे म्हणून मी घेऊन गेलो आहे. माझ्या बापाकडून पैसे घ्यायचे. मी मोबाईल देणार नाही. स्वतःच्याच वडिलांना शिव्या द्यायला लागला. सुरेशने मुलाला शोधण्यासाठी नंबर चालू ठेवायला सांगितलं होतं पण त्या मोबाईलमध्ये असलेल्या काही गोष्टींचा तो चुकीचा वापर करू लागलेला होता.
एवढा मोठा गुन्हा त्याने केलेला होता आणि अशा प्रकारे अनेक लोकांचे मोबाईल त्यांनी चोरलेले होते तरी सुरेश आपल्या मुलाची पाठराखणच करत होता. शेवटी पोलिसांनी शामराव आणि राजेश याच्यामध्ये बॉण्ड बनवला आणि शामराव याला नुकसान भरपाई म्हणून राजेशला ५० हजार रक्कम द्यावी लागली. तरीही राजेश यांनी ऑनलाइन तक्रार दाखल केली. आणि यामध्ये उत्तम शामराव फसले गेले होते आणि रवीचा बाप सुरेश मात्र नामानिराळा होता. काही झालं तरी आपण फसायचं नाही असंच त्याने ठरवलं होतं. आपला मुलगा चुकीचा आहे, चुकीचा वागतोय जर त्याला पोलिसांनी पकडलं तर बालसुधारगृहात जाईल आणि तो तिथे सुधारेल याचाही विचार सुरेश करत नव्हता. उलट तो शामरावला बोलायला लागला की तू कशाला घेऊन गेलास, तू रवीला सुधरवशील असे म्हणाला होतास. उलट मीच आता तुझ्यावर केस करतो की माझ्या मुलाला जबरदस्तीने घेऊन गेला आणि त्याचं वय कमी असताना त्याला कारखान्यात कामाला लावलं असे कलम मी तुझ्यावर टाकीन आणि तुलाच अडकवीन असं सुरेश आपला मित्र शामराव याला बोलू लागला.
सुरेशचा मुलगा रवी अनेक गुन्हे करत होता. लहान वय आहे म्हणून लोक सोडून देत होते पण आज त्याची मजल मोबाईलमध्ये असलेल्या अनेक गोष्टींचा दुरुपयोग करण्यापर्यंत गेली होती. लोकांच्या खासगी गोष्टी तो इतरांना पाठवू लागला होता आणि हा गुन्हा साधा सुद्धा नव्हता तरीही सुरेश आपल्याच मुलाची बाजू घेऊन ज्याने त्याला सुधारण्यासाठी नेलं होतं त्याच्यावरच आळ घेत होता.
माझा मुलगा नाबालिक आहे, त्याला काही समजत नाहीये असं म्हणून तो शामराववर आरोप टाकत होता. नंतर कळालं की असेच गुन्हे त्याने यापूर्वी केलेले आहेत. सुरेशचे मित्र असेच फसलेले आहेत आणि आता आपण फसलो. याची जाणीव शामरावांना फार उशिरा झाली आणि आपल्या सोबत आपला भाचाही यात फसला. मित्रानेच आपल्याला त्याच्या मुलाबद्दल व्यवस्थित माहिती दिली नाही आणि आपण त्याचा मुलगा सुधारू असं वाटलं होतं पण जो मुलगा मुळातच गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे तो कधी सुधारणार नाही हे फार उशिरा शामराव यांना कळालं. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो तो नाबालिक असो किंवा प्रोढ असो त्याचा गुन्हा हा गुन्हाच असतो. (सत्यघटनेवर आधारित)